आरोग्य विभागामार्फत "जागतिक योग दिन" उत्साहात साजरा
'योग' ही भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे असे म्हटले जाते. आणि त्यामुळेच २१ जून रोजी भारतात साजरा होणारा 'जागतिक योग दिवस' आज जगभरात साजरा केला जात आहे. काल २१ डिसेंबर २०१९ रोजीदेखील हा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा झाला. रांची येथील प्रभात तारा मैदानात देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिन साजरा झाला तर महाराष्ट्रात देखील नांदेड येथे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस व योग गुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत हा दिवस साजरा करून हजारो लोकांनी सामुदायिक योगासने केली. मुंबईत आरोग्य विभागामार्फत देखील आरोग्य आयुक्तालयाचे मुख्यालय असलेल्या आरोग्य भवन येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आरोग्य आयुक्त डॉ अनूप कुमार यादव सर, नामांकित योग प्रशिक्षक डॉ सतीश पाठक, आरोग्य सेवेतील अधिकारी श्री संजय पतंगे, डॉ तानाजी माने, डॉ घोलप, डॉ मारुळकर, डॉ खरात आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाचा आरंभ केला गेला. तद्नंतर आयुष विभागाचे सहाय्यक संचालक डॉ घोलप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. त्यांनतर आयुक्त डॉ अनूप यादव सरांनी योग दिनाचे महत्व विषद करून उपस्थितांना आंतराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रसिद्ध योग प्रशिक्षक डॉ पाठक सर यांचे योगावर मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान झाले. त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योगाची काही प्रात्यक्षिके दाखवत त्यांच्याकडुन योगाचे काही प्रकारदेखील करवून घेतले. याप्रसंगी आरोग्य भवनमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य विभागातील श्रीमती अजिता जोशी यांनी केले.
आज आपल्या आजूबाजूला विविध आजारांनी, व्याधींनी त्रस्त असणारे रुग्ण आपल्याला पावलोपावली दिसतात. ओसंडून वाहणारी रुग्णालये व दवाखान्यांमधील गर्दी याची साक्ष आपल्याला देतील. पारंपरिक आजारांची व उपचारांची जागा आता संसर्गजन्य व अससंसर्गजन्य आजार अशा नव्या आधुनिक नावांनी घेतली आहे. त्यावरील निरनिराळ्या उपचार पद्धती व शस्त्रक्रिया जर आपण पहिल्या तर त्यासाठीच्या वैद्यकीय खर्चाचे आकडे पाहूनच गरगरायला होते. अशातच आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करत आहोत असे माझे मत आहे. घर ते कार्यालय यामधील प्रवासात व कामात आपण इतके गुरफटलेले आहोत की मानसिक तणाव व शारीरिक व्याधी आपल्यामध्ये कधी घर करतात हे आपल्याला कळतही नाही. लहान मोठ्या व्याधींसाठी जवळपासच्या किंवा ओळखीच्या डॉक्टरकडे जाऊन जुजबी औषधोपचार करून घेतो व हा औषधोपचार असंख्य वैद्यकीय चाचण्यांसह वर्षानुवर्षे तसाच पुढे चालू ठेवतो. याचा परिणाम शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होण्यात तसेच मानसिक संतुलन ढासळण्यात होतो हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. बळावणारा आजार हा गरीब, श्रीमंत, उच,नीच, जाती, जमाती असा कोणताही भेदभाव करत नाही त्यामुळे त्यातून कुणीही सुटत नाही. आता तुम्ही म्हणाल यावर उपाय काय? आजार जडला किंवा प्रकृती अस्वास्थ्यासाठी डॉक्टरकडे जाणार नाही तर काय कुठल्या बुवा-बाबाकडे? यावर एक सोपा व हक्काचा उपाय आपल्याकडे उपलब्ध आहे, तोही कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय. हा उपाय म्हणजे "योग". माणसाला जडणाऱ्या बहुतांश व्याधींवर एकमेवाद्वितीय, प्रतिबंधात्मक, कमी खर्चिक, घरात-कार्यालयात बसल्याबसल्या करता येण्याजोगा, मनोबल-आत्मविश्वास-व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत करणारा उपाय म्हणून योगाकडे पाहण्यास हरकत नाही या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो आहे. 'योग' साधनेची उत्पत्ती भारतात झाली व आज जगभराने योगाचे महत्व जाणून मोठ्या प्रमाणावर योग धारणेला स्वीकारले आहे. त्यामुळे 'योग' ही भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे असे म्हटले जाते. 21 जून रोजी भारतात साजरा होणारा 'जागतिक योग दिवस' आज जगभरात साजरा केला जातो यावरूनच योगाचे वैश्विक महत्व लक्षात येईल. आज शहरी भागात काम करणाऱ्या बहुतांशी नोकरदारांना पाठ, मणके, गुढगे, सांधे, मानसिक तणाव, अशांती आशा विकारांनी ग्रासलेले आहे. त्यांच्यासाठी योग साधनेतील विविध थेरपी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत व त्याही कोणत्याही साईड इफेकटशिवाय. 'योग' हा विषय अत्यंत व्यापक स्वरूपाचा असून परदेशी लोक त्यामध्ये अधिक रुची दाखवत असताना आपल्या देशात मात्र त्याचा पाहिजे तितका प्रसार अजून झालेला नाही ही शोकांतिका आहे. भारतातील योग प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन विदेशी प्रशिक्षणार्थी आपापल्या देशात योगाचा प्रसार व व्यवसाय करतात. यामुळे उद्या परदेशी संस्था व प्रशिक्षक आपल्या देशात येऊन आपल्याच देशात उत्पन्न झालेल्या या थेरपिवर आपणाला प्रशिक्षण देऊ लागले तर नवल वाटू नये. योगाचे महत्व देशाच्या पंतप्रधानांनी देखील ओळखून जागतिक पातळीवर त्याचा विस्तार करण्याचा तसेच आयुष मिशन सारखे मोठे अभियान देशात सुरू करण्याचे महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. अनेक असाध्य आजारांना ऑलोपॅथीशिवाय पर्याय नसला तरी या आजारांबाबत उचित दक्षता व शारीरिक हालाचालींद्वारे नियंत्रण मिळवण्यासाठी योग साधना खूप मोठी भूमिका बजावू शकते हे विसरून चालणार नाही.
वैभव मोहन पाटील






















Comments
Post a Comment