आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा
मुंबईत रस्ते असो वा रेल्वे मार्ग पावसाळ्यात दरवर्षी सर्वत्र पाणी भरते व वाहतूक खोळंबते. शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसात पुन्हा एकदा हा अनुभव आला. पालिका व रेल्वे प्रशासनाची मुसळधार पावसाला सामोरे जायची तयारीच नसल्याने मुंबईची वाहतूक कमालीची मंदावली व त्याचा फटका पुन्हा एकदा चाकरमान्यांना बसला. उशिरा दाखल झालेल्या पावसानंतरदेखील पावसाळापूर्व कामे अर्धवट अवस्थेत असतील तर ते मुंबईकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्थापन आखणे गरजेचे असते मात्र त्याकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते व पाणी थेट रस्त्यावर व रेल्वे ट्रॅक वर येते. मुंबईसारख्या हायटेक शहरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाळ्यात योग्य उपाययोजना आखायला हव्यात. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे मुंबईकरांची अवस्था रोज रडे त्याला कोण मरे अशी झाली आहे.

Comments
Post a Comment