मोकाट कुत्र्यांची समस्या उग्र
मोकाट कुत्र्यांची समस्या आज सर्वच प्रमुख शहरांना भेडसावत आहे. भटक्या कुत्र्यंच्या जाचाच्या बातम्या रोज वर्तमानपत्रांत छापून येत आहेत. सर्वच शहरांमधील लोक या कुञयांपासून त्रस्त आहेत मात्र महानगरपालिका मात्र या कुत्र्यांवर वचक मिळविण्यात संपूर्ण अपयशी ठरत आहेत असेच सध्या दिसून येत आहे. नवी मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांनी अक्षरश उच्छाद मांडलेला आहे. दररोज अनेकांना ही भटकी कुत्री चावा घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी घणसोली येथील सेक्टर १ मध्ये राहणारी वैशाली पाटील ही महिला आपल्या मुलीला सिडको घरोनदा येथील शाळेत सोडण्यासाठी गेली असता रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांपैकी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिला चावा घेतला व त्यात ही महिला गँभिर जखमी झाली. तिला घणसोली प्रभागातील पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात दाखल करून इंजेक्शन व इतर उपचार करण्यात आले आहेत. घणसोलीत मोठ्या संख्येने असलेली ही कुत्री सातत्याने कुणालातरी आपले लक्ष बनवत असल्याचे येथील रहिवाशी सांगतात. मात्र पालिकेमार्फत या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. गेल्या वर्षी मा. सर्वोच्च न्यायालयाने या भटक्या कुत्र्यांचा मानव जातीस कोणताही उपयोग नसुन त्यांचे आयुष्य संपविण्याबाबत महत्वपूर्ण निरीक्षण व निर्णय दिलेला आहे. परंतु त्यानंतरदेखील रोज कुठे ना कुठे या भटक्या कुत्र्यांच्या दहशतवादाला मोठया संख्येने नागरिक बळी पडत असल्याचे दिसुन येत आहे. कोपरखैरणे, घणसोली, वाशी, तुर्भे, ऐरोली, सानपाडा, सीबीडी, दिघा परिसरात या भटक्या कुत्र्यांनी धुडगुस घातला असुन येथील नागरिकांना व दुचाकीस्वारांना मुख्यत्वे रात्रीच्या वेळी या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास जाणवतो. नवी मुंबईत अधिकृतरित्या 55000 पेक्षा अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या असुन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात 14000 च्या आसपास भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा केलेला आहे. परंतु रस्त्यावर दिसणारा भटक्या कुत्र्यांचा भस्मासुर पाहिला तर पालिकेच्या नसबंदी प्रक्रियेबाबत शंका येते. बरं नसबंदी प्रक्रियेनंतर बिनबोभाट भटकणाऱ्या या कुत्र्यांचा उपद्रव समाजास कसा कमी होऊ शकतो असा प्रश्न पडतो. नवी मुंबई पालिका हददीमध्ये दरवर्षी हजारो लोकांना श्वानदंश होत आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांच्या मागे लागल्याने त्यांचे होणारे अपघात व नागरिकांना या भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याने रात्रअपरात्री होत असलेला त्रासदेखील असहय झालेला आहे. या भटक्या कुत्र्यांची केवळ नसबंदी न करता त्यांची रस्त्यावरील संख्या कमी केली गेली पाहिजे. दररोज रस्त्यावर फिरणारा हा भटक्या कुत्र्यांचा भस्मासुर शालेय मुले, वृद्ध व महिलांना आपले लक्ष बनवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनीही या कुत्र्यांच्या उपद्रवाविरुद्ध आवाज उठवायला हवा. पालिकेकडे अनेक तक्रारी जावूनसुद्धा भटकी कुत्री पकडणारी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नसल्याने कुत्र्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. रस्त्यावर दिसणारा हा उपद्रव आता लोकांच्या घरापर्यंत येऊ लागला असून आतातरी जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. समाजातील या गंभीर समस्येला लगाम लावण्याची जबाबदारी आता नागरिक व प्रशासनाची असून येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्रतेने राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.



Comments
Post a Comment