आपला दवाखाना


राज्यातील गरीब, गरजू व दुर्बल घटकांपर्यंत मोफत व परिणामकारक आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्‍य सुविधा जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपलब्ध व्हाव्यात यासाठी देशभरासह महाराष्ट्रातदेखील 'आरोग्यवर्धिनी केंद्र' ही योजना राबविण्यात येत असून राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व शहरी भागातील नागरी आरोग्य केंद्रांचा या योजनेच्या माध्यमातून कायापालट करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यभरातील हजारो सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये महत्वपूर्ण व गरजेच्या अशा 14 प्रकारच्या आरोग्य सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून याद्वारे रुग्णांना आपल्या जवळपासच्या शासकीय दवाखान्यातच सर्व प्रकाराचे उपचार मिळू लागले आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता 'आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची आखणी व नियोजनदेखील पूर्ण झाले आहे. आपला दवाखाना हा उपक्रम म्हणजे सरकारचे आरोग्य क्षेत्रातील महत्वपूर्ण पाऊल असून त्यायोगे सार्वजनिक आरोग्य सेवेत क्रांती घडवण्याचा सरकारचा मानस आहे. शहरी भागातील अनेक नागरी आरोग्य केंद्रे ही आदिवासी, झोपडपट्टी भागापासून दूर अंतरावर असतात, त्यांच्या कामकाजाच्या वेळादेखील ठराविक असल्याने वेळेनंतर उपचार घ्यायला गेलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी निर्माण होतात. तसेच आज वाढलेले संसर्गजन्य-असंसर्गजन्य व साथीच्या आजार लक्षात घेता रुग्णांची संख्याही वाढली आहे, त्यामुळे सरकारी दवाखाने सदैव रुग्‍णांनी हाऊसफुल्ल असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर शहरी भागातील वाढत चाललेल्या स्थलांतरामुळे शहरी लोकसंख्या व पर्यायाने रुग्णसंख्याही प्रचंड वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर 'आपला दवाखाना' ही संकल्पना नागरिकांना आरोग्यासाठी एक प्रकारचा दुवा म्हणून काम करणार आहे. शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत अशा प्रकारचे १०० दवाखाने उघडण्यात येत असून प्रथमतः 60 आपला दवाखान्यांचे लोकार्पण मार्च महिन्यात राज्यस्तरीय कार्यक्रमात पार पडले. यावेळी मिशन मेळघाट, डायलिसिस युनिट, आरोग्यवर्धिनी, रक्तदाब तपासणी, कर्करोग तपासणी मोहीम या आरोग्य विभागाच्या लोककल्याणकारी योजनांचे लोकार्पणदेखील संपन्न झाले. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, पुणे, नागपूर, मालेगाव, अमरावती, औरंगाबाद, परभणी,नांदेड या 11 महानगरपालिकांमध्ये 60 ठिकाणी हे दवाखाने सुरु करण्यात येत आहेत. नागरी आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र म्हणून हे दवाखाने भूमिका निभावतील. त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून पुरवण्यात येईल. सकाळ व सायंकाळच्या ठराविक वेळेत हे दवाखाने शहरांतील झोपडपट्टी व दुर्गम भागात कार्यरत राहणार असल्यामुळे गरीब रुग्णांना आरोग्य सेवा आपल्या घराजवळ उपलब्ध होणार आहेत. या दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ उपस्थित राहणार असून रुग्णनोंदनी व औषध वितरणासाठी स्वतंत्र ऑनलाईन एप्लिकेशन पद्धत अंमलात आणण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरद्वारे प्रत्येक रुग्णाची नोंद, त्यांचा इतिहास, त्यांना देण्यात आलेले उपचार व औषधे यांची नोंद ठेवण्यात येईल. रुग्णाच्या प्रयोगशाळा चाचण्या व तपासण्यादेखील नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आशा, एएनएम याच्या मदतीने करण्यात येणार असल्यामुळे हा आपला दवाखाना रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. या दवाखान्यात कार्यरत डॉक्टरला रुग्णसंखेनुसार मोबदला अदा करण्यात येणार असल्यामुळे ह्या योजनेतील परिणामकारकता आणखी वाढणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत सर्व प्रकारची औषधे दवाखान्यातच वितरित करण्यात येणार असून या योजनेचा सकारात्मक परिणाम शहरी भागांतील झोपडपट्टी व गरीब वस्त्यांमध्ये दिसून येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हि योजना प्रायोगिक तत्त्वावर ठाणे शहरात महानगरपालिकेमार्फत यापुर्वींच सुरू करण्यात आली आहे. ठाण्यातील श्रीनगर, वारलीपाडा आणि कळव्यातील महात्मा फुलेनगर झोपडपट्टी येथे 'आपला दवाखाना' सुरू करण्यात आले आहेत.  आरोग्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांनी टप्प्याटप्प्याने ही संकल्पना राज्यभरात राबवण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले आहे. गोरगरीब रुग्णांना आरोग्यसेवा घराच्या जवळपास उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. वास्तवीकता दिल्ली सरकारने राजधानी दिल्लीत राबवलेल्या 'मोहल्ला क्लिनिक' या संकल्पनेच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे ज्याचा फायदा लाखो गोरगरीब, गरजू रुग्णांना होणार आहे. दिल्लीत या दवाखान्यांची संख्या हजाराच्या आसपास पोहोचली असली तरी आगामी काळात महाराष्ट्र देखील त्या दिशेने वाटचाल करेल यात शंका नाही. 



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त