घणसोली रेल्वे स्थानकासमोर रहदारीची समस्या
घणसोली रेल्वे स्टेशन परिसरात रहदारीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बेशिस्त रिक्षावाले आणि हतबल प्रवाशी यांचा संगम म्हणजे घणसोली रेल्वे स्टेशन समोरील चौक. रिक्षाचालकांच्या अरेरावीमुळे या ठिकाणी बस व खाजगी वाहने चालवणे किती अवघड झाले आहे हे एकदा संध्याकाळच्या वेळी येथे येऊन पाहायला हवे. सिडकोने येथील दुचाकींचे पार्किंग दर्ग्याजवळ हलवले पण तरीदेखील रिक्षाचालकांना शिस्त लागत नाही हा प्रकार दुर्दैवी आहे. मनाप्रमाणे रिक्षा उभ्या करणे, वाटेल तसे प्रवाशी भरणे, आडव्या तिडव्या प्रकारे त्या चालवणे यामुळे घणसोलीकराना अक्षरशः जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागतो. स्टेशनसमोरील दोन वाईन शॉप असलेल्या इमारतीच्या आजूबाजूला नेहमीच वाहनांची वर्दळ व रस्त्यावर दुचाकीस्वार आपल्या गाड्या पार्क करत असल्यामुळे येथील ट्रॅफिकची समस्या अधिकच बिकट झाली आहे. स्टेशनपासून हावरे चौकापर्यंत एखादा स्काय वॉक तयार झाला तर ते स्थानिक नागरिकांसाठी एक वरदानच ठरेल. असाच एक फूटओव्हर ब्रिज तिकीटघरासमोर नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून सेंट्रल पार्क समोरील जागेत जाण्यासाठी तयार झाला तर तर सेक्टर 1 ते 4च्या लोकांना त्याचा मोठा फायदा होईल. घनसोलीत व्यवसाय करणाऱ्या सर्वच रिक्षाचालकांना वेळीच शिस्त लावणेदेखील आवश्यक आहे अन्यथा इथे उद्या बजबजपुरी व रिक्षावाल्यांची दादागिरी वाढेल जी आवरणे फार कठीण होईल. रिक्षाव्यवसाय हा लोकांसाठी आहे की रिक्षावाल्यांच्या सोयीसाठी हेच कळत नाही. परवा सकाळी खूप पाऊस सुरू असल्यामुळे आशापुरा चौकातील रिक्षा स्टँडवरून सेक्टर सहाला जाण्यासाठी मुलीसह रिक्षा बघत होतो तर मुश्किलीने एक रिक्षावाला तयार झाला त्याला पुन्हा स्टेशनला परतण्यासाठी दोन मिनिटे थांबण्याची विनंती केली. मात्र सदर अमराठी रिक्षावाला त्यासाठी तयार झाला नाही व उद्धट वर्तन करून निघून गेला. पावसापाण्याच्या दिवसांत मुलांना शाळेत सोडण्यासाठीदेखील रिक्षावाले जवळचे भाडे नाकारत असतील तर कशाला हवेत असले रिक्षावाले असा प्रश्न घनसोलीत कायमच पडतो. स्टेशन परिसरात उद्भवलेल्या वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून सिडकोने, आरटीओने किंवा रेल्वे पोलिसांनी या ठिकाणी कायमस्वरूपी दोन सुरक्षारक्षक तैनात करणे अवश्यक आहे. बेकायदा पार्किंगवर पालिकेने व आरटीओ ने नियमित कारवाई करावी. रिक्षा स्टँडचा वापर काटेकोरपणे करण्यात यावा. स्टँडच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर कारवाई व्हावी जेणेकरून रिक्षांची अतिरिक्त भाऊगर्दी होणार नाही. रेल्वे परिसरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षांची संख्या निश्चित करावी. यासाठी रिक्षांची व त्यांच्या युनियन्सची नव्याने नोंदणी होणे गरजेचे आहे. शेअर भाड्याचे दर निश्चित करून देण्यात यावेत. दुचाकी व चारचाकी पार्किंगसाठी सिडकोने ठराविक व सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अनधिकृत फेरीवाले हटवण्यात यावेत. पालिकेच्या सहा सात वार्डचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घणसोली नोडमधील ही महत्वपूर्ण व जिव्हाळ्याची समस्या सोडवण्यासाठी व घनसोलीकराना सुरक्षित प्रवास मिळण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनीधिनी एकत्रितपणे रेल्वे, आरटीओ, सिडको अधिकारी व पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून एखादा अपघात, अनुचित घटना घडण्याआधी हा प्रश्न निकाली काढावा असे वाटते.


Comments
Post a Comment