प्रसाधनगृहात शुल्क कशासाठी ?

प्रसाधनगृहात शुल्क कशासाठी ?


मुंबई उपनगरांतील बहुतांशी रेल्वे स्थानकांवर प्रसाधनगृहांची प्रचंड कमतरता आहे. जी आहेत तीदेखील शोधत फिरावे लागते. यामुळे प्रवाशांचे मात्र खूप हाल होतात. यातच कहर म्हणजे प्रसाधनगृहांच्या वापरासाठी पैसे मोजावे लागतात. रेल्वे स्थानकांवरील अनेक प्रसाधनगृहांबाहेर पैसे जमा करण्यासाठी टेबल लावलेले असतात. हे पैसे कोण, कुणासाठी व कशासाठी जमा करतोय हे समजायला सर्वसामान्य प्रवाशांना अजिबात वाव नसतो. त्यामुळे प्रवाशी निमूटपणे पैसे देऊन निघून जातात. मात्र हजारो कोटींचा बजेट असणाऱ्या रेल्वेला प्रवाशांना प्रसाधनगृहासारखी मूलभूत सेवादेखील परवडेनाशी झालीय यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? हे पैसे जमा करण्यासाठी रेल्वेने ठेकेदार नियुक्त केलेले असतील तर तशी माहिती प्रत्येक प्रसाधनगृहाबाहेर रेल्वे प्रशासनाने लिहायला हवी. त्या ठेक्याचा कालावधी, उद्देश व स्वच्छतेचे निकषदेखील निश्चित करायला हवेत. मात्र स्वच्छ भारतचे नारे देऊन त्यासाठी करोडो रुपये गुंतवणाऱ्या केंद्र सरकारला रेल्वे स्थानकांतील प्रसाधनगृहातून लोकांकडून पैसे जमा करण्याची वेळ यावी हे अनाकलनीय आहे. बरं यातून जमा होणारे पैश्याचा हिशोबदेखील कुणी गंभीर्याने ठेवत असेल असेही वाटत नाही. सुट्टे एक दोन रुपये जवळ नसतील तर प्रवाशांनी करायचे काय हादेखील प्रश्न आहेच. कारण प्रसाधनगृहाचा वापर केल्यानन्तर प्रवाशांकडून सक्तीने पैशांची वसुली केली जाते. त्यामुळे हा प्रकार कुणाच्या स्वार्थासाठी सुरू असेल तर तो तात्काळ थांबवायला हवा. दररोज लाखो प्रवाशी ने आण करणाऱ्या उपनगरीय रेल्वे तोट्यात चालली आहे असे म्हणायलाही वाव नसल्याने प्रसाधनगृह देखभालीचा खर्च रेल्वेला परवडत नाही असे मानने अतिशयोक्ती ठरेल. प्रसाधनगृहासारखी मूलभूत व अत्यावश्यक सुविधा रेल्वेने प्रवाशांना मोफतच उपलब्ध करून द्यायला हवी. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त