महाराष्ट्रातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपाययोजना

मानवतेच्या भावनेतेतून आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य


कोल्हापूर सांगलीतील पूर आता ओसरत असून पूरानंतरचे मदतकार्य वेगात सुरु आहे. पूरपरिस्थितीनंतर सार्वजनिक स्वच्छता, कीटकजन्य व जलजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, पाणी शुध्दीकरणासाठीचे प्रयत्न, लेप्टो प्रतिबंधात्मक उपचार, पूरग्रस्त भागात आणि मदत छावण्यांमध्ये नियमित साथरोग सर्वेक्षण इत्यादी उपाययोजना युध्द पातळीवर सुरु आहेत.
सांगली आणि कोल्हापूरातील अनुक्रमे ८१ आणि २१६ गावे पूरग्रस्त असून सध्या सांगली मध्ये शहरी भागात ५३ तर ग्रामीण भागात ३६ मदत छावण्या सुरु आहेत. कोल्हापूरात १३७ मदत छावण्या सुरु आहेत. या दोन्ही जिल्ह्यात मिळून सुमारे १ लाख ७२ हजार लोक मदतछावण्यांमध्ये आहेत. मदतछावण्या आणि पूरग्रस्त गावे यांना आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात १४० तर सांगली जिल्ह्यात १८७ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

मानवतेच्या भावनेने कार्य

पूरग्रस्त भागांमध्ये आरोग्य सेवा देताना स्वतःच्या अडचणीकडे दुर्लक्ष करत मानवतेच्या भावनेने प्रेरित होऊन अनेकजण काम करताना दिसत आहेत. सांगली जिल्ह्यातील डॉ. सारिका कुंभार या वैद्यकीय अधिका-यांचे उदाहरण या बाबतीत बोलके आहे. हरिपूर गावाला पुराने वेढलेले असतानाही स्वतःच्या घराची काळजी न करता या महिला डॉक्टरने दहा दिवस या पूरग्रस्त गावात मुक्काम करुन हरिपूरच्या नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविली. माळवाडी चोपडेवाडी भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण कोडग हे स्वतः आजाराशी झुंजत असतानाही या पूरग्रस्त गावातून हलले नाहीत आणि अथक परिश्रम करत त्यांनी गरजूंना वैद्यकीय सेवा दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका श्रीमती जोशी यांनी स्वतःच्या घरातील सामानाची काळजी केली नाही पण आरोग्य केंद्रातील बहुमोल असा लसीचा साठा पूरामध्ये नष्ट होऊ नये, या करिता जीव धोक्यात घालून हा लस साठा सुरक्षित ठिकाणी हलवला.
जागोजागी अनेक गावांमध्ये वैद्यकीय अधिकारी, खाजगी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आपल्या कामाने मानव सेवेचा नवा आदर्श निर्माण करत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. सांगली जिल्ह्यात रिलायन्स फौन्डेशन मुंबई यांच्यावतीने सुमारे वीस लाखाची आवश्यक औषधे प्राप्त झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक निवृत्त डॉक्टर्स स्वतःहून पुढे आले आणि रुग्ण्सेवेसाठी पूरग्रस्त भागात आपली सेवा देत आहेत.


या पूरपरिस्थितीत आरोग्य विभागाच्या वतीने पुढील उपाययोजना करण्यात येत आहेत –
मदत छावण्यांसाठी वैद्यकीय पथकांची नेमणूक – दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येक मदतछावणीसाठी एक वैद्यकीय पथक नेमण्यात आलेले आहे. मदतछावणीतील विस्थापितांना रोज आरोग्य सेवा दिली जात आहे.


पूरग्रस्त गावात आरोग्य कर्मचा-यांची नेमणूक – प्रत्येक पूरग्रस्त गावासाठी आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले असून ते प्रत्येक गावात खालील कामे करत आहेत –

घरोघरी भेट देऊन साथरोग सर्वेक्षण
पाणी शुध्दीकरणासाठी क्लोरीन गोळ्यांचे वाटप
किटकनाशक औषधांची धुरळणी
गावातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी मदत व मार्गदर्शन
गंभीर रुग्णांना संदर्भ सेवा देण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकांची सोय

पुरेसा औषध साठा – विविध स्त्रोतांकडून येणारी औषध विषयक मदतीमध्ये एकसूत्रता रहावी, यासाठी उपजिल्हा रुग्णालय, क-हाड येथे येणारा औषध पुरवठा साठवला जात असून तो दोन्ही जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वितरित केला जात आहे.

लेप्टोस्पायरोसिस आजार टाळण्यासाठी अतिजोखमीच्या व्यक्तींना डॉक्सीसायक्लीन या औषधाचा प्रतिबंधात्मक उपचार देण्यात येत आहे.

सर्व आरोग्य केंद्रांमध्ये सर्प दंशावरील लसीची उपलब्धता – पूरानंतर या भागात सर्प दंशाचे प्रमाण वाढू शकते, हे लक्षात घेऊन दोन्ही जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्प दंशावरील लसीची उपलब्धता करण्यात आलेली आहे.

सार्वजनिक स्वच्छता तसेच मृत जनावरांची विल्हेवाट यासाठी तज्ञ पथके क्षेत्रिय पातळीवर कार्यरत आहेत.

जिल्हा स्तरावर २४ *७ नियंत्रण कक्ष सुरु आहे.

विस्थापित कुटुंबांसाठी आवश्यक तिथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकांची ( एन डी आर एफ ) मदत घेण्यात येत आहे.
साथरोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी जनतेला आरोग्य शिक्षण आणि जनजागृती करण्यात येत आहे.











Comments

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त