आरोग्य कर्मचाऱ्यांचा पूरग्रस्त भागाला मदतीचा हात
आरोग्य भवन कर्मचाऱ्यांचा संवेदनशील उपक्रम
सालाबादप्रमाणे या वर्षीदखील आरोग्य सेवा आयुक्तालयामध्ये सत्यनारायण महापूजेचे आयोजन आज शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने करण्यात आले. दरवर्षी अधिकारी व कर्मचा-यांच्या वर्गणीतुन पूजेसाठी मनमोहक आरास, विदयुत रोषणाई, कर्मचा-यांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था, गुणवंत पाल्यांसाठी पारितोषिके व कर्मचा-यांच्या कलागुणांना वाव देणारे मनोरंजनात्मक कार्यक्रम अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मात्र यंदा कोल्हापूर, सांगली परिसरात उदभवलेल्या पूरस्थतीच्या पार्श्वभुमीवर कर्मचा-यांनी महापूजेचा कार्यक्रम अगदी थोडक्यात उरकण्याचा निर्णय घेतला. पूजेसाठी कर्मचा-यांच्या वर्गणीतुन जमा झालेल्या रक्कमेतून पूरग्रस्त भागातील संसार उध्वस्त झालेल्या लोकांना मदतिचा हात देण्याचा निर्णय कर्मचा-यांनी घेतला आहे. आज या महापूजेसाठी विभागाचे आयुक्त डॉ. अनूपकुमार यादव सर, संचालक डॉ. साधना तायडे मॅडम, अतिरीक्त अभियान संचालक डॉ. सतिश पवार सर यांनी उपस्थिती दर्शवत आयोजक मंडळींचा उत्साह वाढवला. कार्यालयातील सहायक अधिक्षक श्री राजेश भंकाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पूजेसाठीच्या वर्गणीतून व अधिकारी-कर्मचार्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून जमा झालेल्या जवळपास एक लक्ष इतक्या रक्कमेद्वारे पूरग्रस्त भागातील आपत्तीग्रस्त लोकांना प्रत्यक्ष मदत दिली जाईल. यासाठी जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणांशी संपर्क साधून मदत न पोहोचलेल्या गावाची निवड करण्यात येईल व आरोग्य भवनमधील कर्मचाऱ्यांच्या एका टीमद्वारे स्वखर्चाने प्रवास करून ही मदत गरजूंपर्यंत पोहोचवली जाईल. यासाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. कोल्हापुर सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या अत्यंत दयनीय अवस्थेनंतर येथील लोकांना आपले संसार पुन्हा उभे करण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ वाहत असताना आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या ह्या संवेदनशीलतेने शासकीय सेवेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे एव्हढे नक्की.
वैभव



Great
ReplyDeleteGreat
ReplyDeleteMasta Sir उपक्रम अणि लेखन
ReplyDelete