अवयवदान श्रेष्ठ दान
जिवंतपणी रक्तदान तर मरणानंतर अवयवदान असे म्हटले जाते. अवयवदान हे मानवी आयुष्यातील सर्वात श्रेष्ठ दान असून या दानातून अनेकांना जगण्याची एक नवी उमेद मिळू शकते. याबाबत लोकांमध्ये जागृती येत असल्याने मुंबईसह राज्यात मोठया प्रमाणावर अवयवदानाच्या घटना पाहायला मिळू लागल्या आहेत. अशीच एक घटना नुकतीच नवी मुंबईत घडली. तीन ऑगस्ट रोजी एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर नवी मुंबईच्या अपोलो रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. कुटुंबीयांचे समुपदेशन करून त्यांना अवयदान करण्याची परवानी मागण्यात आली. त्यानुसार या व्यक्तीचे यकृत, दोन मूत्रपिंडे, हृदय दान करण्यात आले आहे. या व्यक्तीचे हृदय मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयाला देण्यात आले. यासाठी अपोलो ते फोर्टिस रुग्णालयामध्ये ग्रीन कॉरिडोर तयार करून हृदय पोहचवण्यात आले. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात ६ ऑगस्टला या ४० वर्षीय व्यक्तीने केलेल्या अवयवदानामुळे व त्याच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या सद्भावनेने चार जणांना जीवनदान मिळणार आहे. ब्रेन डेड अवस्थेमध्ये असलेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीचे अवयवदान करण्यात आले. मुंबईतील हे ५२ वे अवयदान आहे. अवयवदानाची अशी अनेक अत्यंत संवेदनशील व आदर्शवत उदाहरणे पुढे येत आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये मेंदूमृत (ब्रेनडेड) रुग्णांची नोंद केली जाते. ‘ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लान्ट’ कायद्यानुसार रुग्णालयातील प्रत्येक ‘ब्रेनडेड’ व्यक्तीची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’ने (झेडटीसीसी) देणे बंधनकारक असून, त्यांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असते, परंतु प्रत्यक्षात फार कमी माहिती या समितीला दिली जाते. अनेकदा नातेवाइकांकडूनही प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, फारच कमी ‘ब्रेनडेड’ दात्याकडून मिळालेल्या अवयवांचे प्रत्यारोपण होत असते. माणसाचे प्राण वाचवण्यासाठी अवयवदानाचे महत्व खूप मोठे असून त्याची मागणी व पुरवठा यांमधला फरकदेखील मात्र खूप जास्त आहे. त्यामुळे काळजावर दगड ठेवून अवयवदानासारखा निर्णय घेणाऱ्या कुटुंबीयांबद्दल नक्कीच अभिमान वाटतो. हजारो रुग्णांना अवयव मिळत नसल्याने मृत्यू देखील ओढवतो. आकडेवारीनुसार आपल्या देशात दीड लाख मूत्रपिंडाची गरज असताना केवळ पाच हजार मूत्रपिंड उपलब्ध होतात. ५० हजार हृदयांची गरज असताना १०-१५ मिळतात तर ५० हजार यकृताची गरज असताना केवळ ७०० उपलब्ध होतात. परिणामी, एकेका अवयवासाठी अनेक दिवस वाट बघत आयुष्य काढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे जी वस्तुस्थिती आहे. खरेतर मरणोत्तर अवयवदानाबद्दल बऱ्याच रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पुरेशी माहितीच नसते. त्यामुळे याबाबतची जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. अवयवदानासारखे दान जगात दुसरे कुठले नसून एखाद्या व्यक्तीच्या मरणानंतर त्याने दान केलेल्या अवयवदानातून अनेकांचे प्राण वाचवता येतात. कुणी जन्मताच अवयवरहित असतो, कुणाच्या अपघातात अवयव निकामी होतात, कुणाचे अवयव अचानक निकामी होतात, त्यांना वेळीच अवयव मिळाले नाही तर त्यांचे आयुष्य संपते. आयुष्याच्या प्रवासातील त्यांचे जगणे थांबून जाते. अशा वेळी ह्या अवयवांचे महत्व खूप वाढते. त्यांना एखाद्या अवयवदात्याचे अवयव प्राप्त झाले, त्याचे प्रत्यारोपण झाले तर त्याला नवे जीवन मिळू शकते, त्याचा जीवनप्रवास पुन्हा त्याच आनंदाने सुरू होतो, अवयव दात्याला देखील त्याच्या अवयवांच्या दानातून दुसऱ्या माणसाच्या शरीराच्या माध्यमातून जिवंत राहता येते. अवयवदानासारखे सुख इतर कशात नाही. मात्र आपल्या देशात अवयवदायाबाबत फारशी जागृती नाही. इतर देशांत म्हणजेच आॅस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिकेसारख्या देशांनी अवयवदान चळवळीचे महत्त्व पूर्वीच ओळखले. यासाठी वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणली. त्यामुळे आज परदेशांत अवयवदानातून हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत. भारतात अवयवदानाचा टक्का मात्र प्रति १० लाख लोकांमागे केवळ ‘३४’ टक्के आहे. अलीकडच्या काळात हा टक्का थोडाफार वाढल्याचे दिसून आले आहे मात्र त्याची टक्केवारी अधिक नाही हेदेखील तितकेच खरे आहे.

Comments
Post a Comment