महाआरोग्य शिबिरांचा महायज्ञ

वैद्यकीय व दंत शिबिरांचे राज्यस्तरीय उदघाटन



सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या वतीने सातत्‍याने आरोग्‍य शिबीरे महाराष्‍ट्रभर भरवण्‍यात येतात ज्‍यांचा लाभ हजारो, लाखो गोरगरीब लोकांना होतो. राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान या केंद्र शासन पुरस्‍कृत योजनेच्‍या माध्‍यमातुन आदिवासी जिल्‍हयांमध्‍ये वैदयकीय व दंत आरोग्‍य शिबिरांचे आयोजन नियमितपणे करण्‍यात येत आहे. एखाद्या रोगावर उपचारापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाचा भर आहे. त्यासाठी राज्यात महाआरोग्य शिबीरे घेतली जात आहेत. या वर्षी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नांदेड या १६ आदिवासी जिल्‍हयांमध्‍ये एकाच वेळी वैदयकीय व दंतचिकीत्‍सा महा आरोग्‍य शिबिरांचे आयोजन करण्‍यात आले. नांदेड, धुळे, अमरावती व नोगपूर या जिल्‍हयांमध्‍ये सदर महाआरोग्‍य शिबिर २४ ऑगस्‍ट पासुन सुरु झाले तर उर्वरीत जिल्‍हयांमध्‍ये २६ ऑगस्‍ट पासुन सुरु करण्‍यात आले. सदरील महाआरोग्‍य शिबिराचे १२ जिल्‍हयांमधील राज्‍यस्‍तरीय उदघाटन डिजीटल पध्‍दतीने दिनांक २६ ऑगस्‍ट २०१९ रोजी ठाण्‍याच्‍या डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथुन युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. सदर उदघाटन समारंभामध्‍ये सर्व आदिवासी जिल्‍हे एकमेकांशी व्हिडीओ कॉन्‍फरंन्‍सींगच्‍या माध्‍यमातुन जोडण्‍यात आले होते. १२ जिल्‍हयांमधील महाआरोग्‍य शिबीरांचे डिजीटल पध्‍दतीने उदघाटन मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. या प्रसंगी जिल्‍हा रुग्‍णालय, गडचिरोली येथील सिटी स्‍कॅन मशीनचे उदघाटनसुध्‍दा डिजीटल पध्‍दतीने करण्‍यात आले. युवा नेते आदित्‍य ठाकरे व राज्‍याचे आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जिल्‍हास्‍तरीय अधिकारी व पदाधिका-यांशी व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सींव्‍दारे संवाद साधत शिबिरांमधील नोंदणीची माहिती घेत त्‍यांना महत्‍वपूर्ण सुचनादेखील केल्‍या. यावेळी व्‍यासपीठावर ठाण्याच्या महापौर श्रीमती मिनाक्षी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, पांडुरंग बरोरा, विलास तरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, अतिरीक्‍त अभियान संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड आदी उपस्थित होते.


१६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्‍यात आलेल्‍या हया शिबीरांमध्‍ये आबालवृद्धांच्या सर्व आरोग्य तपासण्या, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. आरोग्य विभाग सातत्याने शेवटच्या घटकापर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न करीत असून यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. राज्यात ११०० आरोग्यवर्धिनी केंद्र (Health Wellness Centers) सध्या सुरू करण्‍यात आले असून येत्या काळात एकूण ५२०० उपकेंद्रांचे रूपांतर आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये केले जाणार आहे. डायलिसीसची सुविधा, कर्करोगाची तपासणी, टेलिमेडिसीन अशा सुविधा देखील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत तसेच त्यानंतर आरोग्य विभागाच्या संपूर्ण यंत्रणेने उत्तम समन्वयाने सामूहिक प्रयत्नातून चांगली आरोग्य सेवा दिल्याबद्दल आरोग्‍यमंत्र्यांनी यंत्रणांचे कौतुक केले आहे. त्‍यामुळेच पूर ओसल्यानंतर संभाव्य साथीचे आजार रोखणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी अत्यावश्यक असल्याचे शिवसेना नेते आदित्‍य ठाकरे यांनी सांगितले. यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात, यांचा नागरिकांनी लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहनदेखील श्री आदित्य ठाकरे यांनी केले. घरोघरी व गावोगावी आरोग्य सेवा पुरविण्याच्या शासनाच्या प्रयत्नांची प्रशंसा करून पूर परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने केलेल्या कामाबद्दल त्यांनी विभागाची प्रशंसा केली. 





कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक करताना आरोग्‍य सेवेचे आयुक्‍त डॉ. अनूप कुमार यादव यांनी आरोग्‍य शिबीरांची रुपरेषा व महत्‍व विषद केले. प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी मनोगत व्‍यक्‍त करताना आरोग्याच्या अनेक क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असून जेथे सुधारणा आवश्यक आहे ती करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. तसेच ज्या जिल्ह्यात जे आजार आढळतात त्या गरजेनुसार नियमित आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आदिवासी आणि दुर्गम भागात विशेष लक्ष केंद्रीत केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. 
यावेळी कायाकल्प कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपजिल्हा रूग्णालय, शहापूर, स्त्री रूग्णालय उल्हासनगर, ग्रामीण रूग्णालय बदलापूर आणि ग्रामीण रूग्णालय टोकावडे यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आरोग्य उपसंचालक डॉ.गौरी राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. वैदयकीय व दंत शिबीरांचा लाभ राज्‍यातील हजारो लोक घेत आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला आरोग्य शिबिरांच्या या महायज्ञामध्ये बहुतांशी गरजेच्‍या आरोग्‍य सेवा व संदर्भ सेवा एकाच ठिकाणी उपलब्‍ध होत असल्‍यामुळे ही शिबिरे प्रचंड लाभदायक ठरताना दिसत आहेत. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई  

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा