देखाव्यांतून जनजागृती हवी



दरवर्षी गणेशोत्सव आला की महिनाभर आधी गणेशोत्सव मंडळांना गणेशमंडपासाठी सजावटीचे वेध लागतात. साधारणतः महिना दीडमहिना अगोदर ह्या सजावटीना सुरुवात होते. गणेशभक्तांना आकर्षित करण्यासाठी नवनवे देखावे साकारण्यात येतात. गणेशोत्सव मंडळ जितके मोठे तितकी तेथील आरासदेखील मोठी असते. मात्र हिंदूंच्या ह्या पवित्र उत्सवात साकारले जाणारे हे देखावे समाजप्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे असे वाटते. उत्सव कालावधीत सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने गणेशदर्शन व देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडत असल्याने प्रबोधनात्मक देखाव्यांच्या माध्यमातून मोठी जनजागृती करता येईल. यासाठी गणेशमंडळांनी पुढाकार घेऊन ज्वलंत सामाजिक प्रश्न घेऊन देखावे साकारायला हवेत. व्यसनमुक्ती, गुटखाबंदी, स्त्रीभ्रृण हत्या, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक, हुंडाबळी, पाणी वाचवा, वृक्षारोपण, अवयवदान, पार्किंग व रहदारी नियम अशा विविध विषयांवर जनजागृती केल्यास या उत्सवाचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल आणि सामाजिक जनजागृतीचे समाधानदेखील आयोजकांना लाभेल. आजची तरुण पिढी सोशल मीडिया, व्हिडिओ गेमस्, युट्युब व इंटरनेटच्या मायाजालात अडकून पडली आहे. बौद्धिक व मैदानी खेळ याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. भावी पिढीच्या भवितव्याचा विचार करता  सोशल मीडियातुन परावृत्त होऊन  शिक्षण, मैदानी खेळांकडे तरुणाईचे लक्ष केंद्रित होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. समाजात वाढते अत्याचार, गुन्हेगारी, असंवेदनशीलता, व्यसनाधीनता यावर गणेशोत्सवातील देखावे एक प्रभावी उपाय ठरू शकतील असे मत आहे. यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी  सामाजिक आशयाचे देखावे सकारावेत, मुलांच्या बुद्धीला प्रेरणा देणाऱ्या निबंध, वक्तृत्व यासारख्या स्पर्धा आयोजित कराव्यात, मैदानी खेळांच्या स्पर्धा भरवाव्यात, बॅनर्स, पोस्टर्सद्वारे जनजागृती मोहिम हाती घ्यावी. भावी पिढी कुसंगत, अविचार व व्यसनाधीनतेपासून दूर होण्यासाठी गणेशोत्सव मंडळाचे प्रयत्न समाजात सकारात्मक परिणाम घडवतील अशी आशा आहे. 














वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त