आरोग्यमंथनचे शतक

शतकीय आरोग्‍यमंथन  


कोणत्‍याही गोष्‍टीची शंभरी ही तिच्‍याशी संबंधित व्‍यक्‍तीसाठी अत्‍यंत आनंददायी बाब असते. क्रिकेटमधील शंभर धावा असो की वयाची शंभरी असो, त्‍या खेळाडू किंवा व्‍यक्‍तीसाठी तो काळ अभिमानास्‍पदच असते. "आरोग्यमंथन" हया आठवड्याच्या दर मंगळवारी प्रकाशित होणा-या आरोग्यविषयक लेखमालिकेच्‍या बाबतीतदेखील हा शंभरीचा टप्‍पा आज पार पडत आहे. साधारणतः दोन वर्षांपूर्वी मी दैनिक नवे शहर या वृत्तपत्रामधून सुरू केलेल्‍या आरोग्‍यमंथन या लेख मालिकेतील शंभरावा लेख आज प्रकाशित होत आहे. आपणा सर्व हितचिंतक व वाचकांच्या आशीर्वादाने ही मालिका आज शंंभरीपर्यंत येऊन पोहोचली आहे. आज आरोग्यमंथन या आरोग्यविषयक लेख मालिकेतील १०० वा लेख आपल्यासमोर ठेवताना मला मनस्वी आंनद होत आहे. साधारण वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या ह्या आरोग्य जागृतीविषयी मोहिमेचा १०० लेखांचा पर्यायाने १०० आठवड्यांचा प्रवास कधी संपला हे कळलेच नाही. आज महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक आरोग्य योजना राज्यभरामध्ये राबवण्यात येत आहेत. या योजना म्हणाव्या तितक्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने लोकांची आजही सरकारी आरोग्य सेवेबद्दल अनास्था पदोपदी दिसून येते. याला कारणीभूत अनेक घटक आहेत. प्रसारमाध्यमे हा त्यातलाच एक घटक. मात्र प्रसारमाध्यमांचे प्रशासकीय धोरणांशी फार सख्य नसल्यामुळे शासनाच्या कामकाजात कुठे त्रुटी मिळतात याच्या मागोव्यावर बरीचशी माध्यमे असतात. अनेक माध्यमे तर केवळ राजकीय घडामोडींनाच वाहिलेली असल्याचे दिसून येते. चुकीची व न पटणारी बाजू माध्यमांनी अवश्य जनतेसमोर आणावी मात्र सरकारच्या चांगल्या व लोकोपयोगी योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे हेदेखील माध्यमांचे कर्तव्य आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांनी ते प्रामाणिकपणे पाळले पाहिजे असे माझे मत आहे. मात्र सरकारच्या योजना व धोरणे ठामपणे व सरकारधार्जिन्या वृत्तीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारी प्रसारमाध्यमे फार अपवादानेच आढळतात. त्यामुळेच शासनाच्या आणि त्यातही आरोग्य विभागासारख्या अति संवेदनशील खात्याबाबत प्रसिद्ध झालेले चांगले व सकारात्मक लिखाण हे फार अपवादानेच आढळते. मीदेखील गेली अनेक वर्षांपासून अशा अनेक सकारात्मक-नकारात्मक बाबींवर विविध वृत्तपत्रे व मासिकांमधून सातत्याने लिखाण करतोय. कॉलेजला असल्यापासून जडलेला लिखाणाचा हा छंद बहुदा मला कायमचाच चिकटलाय. आजवर समाजात घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांवर माझे हजारो लेख विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित झालेत. समाजातील अनुचित व न रुचणाऱ्या घटनांबाबत मला प्रचंड चीड आहे व ती वेळोवेळी मी लेखणीतून सर्वांसमोर आणलीय देखील. मात्र गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या आरोग्य विभागात नोकरीस लागल्यापासून विभागासाठी काहीतरी प्रबोधनात्मक करण्यासाठी सातत्याने मी धडपडत आहे. सतत नकारात्मक बातम्यांमुळे आरोग्य विभागाची जनमानसांत ढासळत असलेली प्रतिमा उंचावण्यासाठी व विभागाच्या कामाचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. राज्य व केंद्र सरकार आज करोडो रुपये या आरोग्य योजनांसाठी व यंत्रणेसाठी खर्च करत आहे. त्याचा उचित व विधायक विनियोग तळागाळातील लोकांसाठी होणेेदेखील तितकेच आवश्यक आहे. यासाठी सरकारी प्रयत्न सुरू आहेतच मात्र समाजातील जाणकार व संवेदनशील घटकांनीदेखील या कामी हातभार लावणे गरजेचे असून जनजागृती हा घटक फार महत्वाचा आहे. यासाठी विविध सरकारी आरोग्य योजना लिखाणाच्या माध्यमातून कशा लोकांपर्यंत पोहोचवता येतील हा ध्यास मी गेल्या काही वर्षांपासून घेतलेला आहे. प्रसारमाध्यमांच्या शासनाप्रति असलेल्या नकारात्मक भावनेनंतरही अनेक वृत्तपत्रे व त्यांचे संपादक शासकीय कामांबाबत सहानभूतीदर्शक व चांगल्या भावनेतून पाहत असल्याची बाब नक्कीच समाधानकारक व पत्रकारितेवरील विश्वासार्हता टिकवणारी आहे. खरेतर शासन राबवत असलेल्या अनेक चांगल्या योजना व उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रसारमाध्यम हे एक उत्तम, उदात्त व समाजाभिमुख माध्यम आहे. मात्र दुर्दैवाने शासनाचे मोजके दुर्गुण प्रदर्शित करून शंभर चांगल्या गोष्टींना फाटा दिला जातो हे खेदाने नमूद करावेसे वाटते. मात्र याला अपवाद अनेक वृत्तपत्रे व त्यांचे संपादक आहेत ही बाब आशादायक व धीर देणारी नक्कीच आहे. नवी मुंबईतून गेल्या अनेक दशकांपासून नियमित प्रकाशित होणारे दैनिक नवे शहर हे वृत्तपत्र त्यातलेच एक म्हणावे लागतील. नवी मुंबईवर गेली अनेक वर्षे राज्य करणाऱ्या व नवी मुंबईचा आरसा बनलेल्या दैनिक नवे शहरमध्ये विविध विषयांवर सतत लिखाण करत असताना कुठल्याही एका विशिष्ट विषयावर स्तंभलेखन करण्याबाबतची विचारणा मला संपादकांनी केली. त्यांनतर माझ्यासमोर दोन पर्याय होते. एक म्हणजे माझा आवडीचे पर्यटनविषयक लिखाण ज्यात मी भटकंती केलेल्या अनेक ठिकाणांबाबत प्रवासवर्णने लिहिली आहेत आणि दुसरे म्हणजे मी काम करत असलेल्या आरोग्य विभागाच्या विविध योजनांबाबत लिखाण करणे. यातून दुसऱ्या पर्यायाची निवड करत मी आरोग्य विभागाची ध्येय, योजना, उद्दिष्टे दैनिक नवे शहराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. आरोग्याची उजळणी करणाऱ्या ह्या लेखमालिकेस "आरोग्यमंथन" हे नाव अगदी समर्पक बसले व त्यांनतर नियमितपणे सुरू झालेला या मालिकेचा प्रवास आज शंभरीपर्यंत येऊन ठेपलेला आहे. हा शंभर लेखांचा म्हणजेच शंभर आठवड्यांचा प्रवास माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी व आत्‍मविश्‍वास वाढवणारा ठरला. आरोग्याच्या अनेक योजना, त्‍यांची माहिती व विपुल लिखाण या निमित्ताने मला जवळून अनुभवता आले आणि वाचन क्षमता वाढवणारे ठरले व मुख्य म्हणजे या लिखाणाच्या माध्यमातून माझा एक जाणकार वाचकवर्गदेखील तयार झाला आहे. सध्या दर मंगळवारी नवे शहरमधून प्रकाशित होणाऱ्या ह्या आरोग्यमंथन चे आज अनेक नियमित वाचक बनलेले आहेत. सोशल मिडियाद्वारे मी माझ्या अनेक व्हाट्सएप ग्रुप्सवर व फेसबुकवर देखील हे लेख अनेकांपर्यंत पोहोचवत असल्याने वाचकसंख्येत भरच पडत आहे. लेखांबाबत अनेक चांगल्या प्रतिक्रिया, सूचना, सुधारणा सातत्याने मला जाणकारांकडून मिळत असतात ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंददायी व उत्साहवर्धक बाब आहे. यातून लिखाणाची खरोखरच दखल घेतली जात असल्याचे समाधान तर मिळतेच पण नव्या लिखाणासाठी उत्साहदेखील वाढतो. आरोग्य हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे आरोग्य हा अत्यंत महत्वाचा घटक असून तितकाच संवेदनशील देखील आहे. आरोग्य चांगले असेल तर स्वभाव व कौटुंबिक वातावरणदेखील प्रफुल्लित राहते. त्यामुळे कामातील उत्साह व कूटुंबातील स्वास्थ्य टिकवून ठेवायचे असेल तर प्रत्येकाने आपले आरोग्य जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न हे केलेच पाहिजेत. आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. डॉक्टर, रूग्णालये हे आपल्या आरोग्याच्या वाटचालीतील महत्वपूर्ण घटक आहेत. त्यांच्या सल्ल्यानेच आपण उपचारांची वाट चोखळत असतो. आजदेखील अनेक गरीब, गरजू ,दुर्बल व दुर्गम घटकांपर्यंत आरोग्य शिक्षण पोहोचलेले नाही ही खरी बाब आहे. जनजागृतीचा अभाव व लोकांमधील निरुत्साह हीेदेखील कारणे त्यासाठी देता येतील. शासकीय रुग्णालयांबद्दल तर लोकांची अनास्था स्पष्ट दिसून येते. मात्र आज सरकारी आरोग्य व्यवस्थेत अनेक अमूलाग्र बदल घडून येत असून खाजगी आरोग्य संस्थाच्या बरोबरीने ''आरोग्‍यवर्धिनी'' परिक्रमेने सरकारी रुग्णालये व दवाखाने वाटचाल करत आहेत असे म्हटले तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. हीच बाब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आरोग्यमंथन चा अट्टाहास केला व त्यात बऱ्याच अंशी सफलदेखील झालो. आरोग्यमंथनच्या प्रवासाचे अर्थात लेखमालिकेचे एखादे पुस्तक काढून ते आपल्यासमोर ठेवण्याचादेखील विचार आहे. आरोग्य विभागाचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य पत्रिका या मासिकातदेखील आरोग्याचे लेख नियमित प्रकाशित होत असतात. मात्र आरोग्यमंथन या मालिकेतून मला मिळालेले लिखाणाचे समाधान मी कदापि विसरू शकणार नाही. आरोग्यमंथनच्या आजवरच्या वाटचालीत योगदान देणारे सर्व वाचक, हितचिंतक, दैनिक नवे शहरचे संपादक, कार्यालयीन व्यवस्थापक, डीटीपी - संगणक ऑपरेटर व मला लिखाणास वेळोवेळी प्रोत्साहन देणारे माझे कुटुंबीय, मित्र-स्नेही, कार्यालयीन सहकारी व वरिष्ठ या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या सहयोगाने आरोग्यमंथनचा हा प्रवास शक्य तितक्या दूरपर्यंत घेऊन जाण्याचा माझा मानस आहे

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त