निवडणुकांच्या वेळी बालाकोट?
बालाकोटमधून दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची लष्करप्रमुखांची माहिती देशवासीयांसाठी धक्कादायकच आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर चवताळलेला पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो, त्यांचा हुकुमी एक्का समजला जाणारा दहशतवादी हल्ला घडवून आणू शकतो हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ह्या संभाव्य हल्ल्याकडे कानाडोळा करून त्याचे राजकीय भांडवल करणे योग्य नाही. केंद्र सरकार व लष्कर ह्या दोन यंत्रणा परस्परांशी संलग्न असल्या तरी निर्णयप्रक्रियेसाठी स्वतंत्र आहेत. त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांच्या विधानांचा किंवा कृतीचा संबंध सरकारशी जोडणे वस्तुस्थितीपूरक नाही असे वाटते. निवडनूकांच्या वेळीच बालाकोट, पुलवामाच्या घटना पुढे आणल्या जात असल्याचा आरोप होत असला तरी त्याला राजकीय पार्श्वभूमीची किनार आहे. महागाईसारख्या विषयावर आज देश झुंजत असताना त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. देशाची सुरक्षा व आतंकवादाशी लढाई हा विषय देशाच्या सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने प्राधान्याचा असून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे उचित नाही असे वाटते.


Comments
Post a Comment