शद्बरसिक दिवाळी अंक 2019

"स्वच्छता" - निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली

स्‍वच्‍छतेचे महत्‍व आपल्‍या जिवनात अनन्‍यसाधारण आहे. आज बदलत्‍या जिवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्‍म घेत असुन त्‍यांवरील उपचार पध्‍दती  खर्चाची व्‍याप्‍तीदेखील वाढत आहे. हया आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी सर्वात मोठी काळजी घ्‍यावी लागेल ती स्‍वच्‍छतेची. वैयक्तिक व सामाजिक स्‍वच्‍छता ही माणसाच्‍या आरोग्‍यावर विपरित व दुरगामी परिणाम करते. सार्वजनिक स्‍वच्‍छतेची सुरुवात वैयक्तिक स्‍वच्‍छतेपासून होते. प्रत्‍येकाने आपले घर व परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे व स्‍वच्‍छता हा विकासाचा अविभाज्‍य भाग आहे. आपल्‍या घरांची,  गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्‍तीक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्‍येकाने करणे व त्‍यायोगे ``स्वच्छतेतून समृध्दीकडे'' ही संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे स्‍वच्‍छतेतून लोकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी शासनही प्रयत्नशील असुन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,  निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना यांसारख्‍या योजनांमध्‍ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटविण्‍यात येत आहे. परदेशात जाऊन आल्‍यानंतर आपण तेथील शहरांची स्वच्छता पाहुन त्यांचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वछता, शिस्त, सौंदर्य, सृष्टी व हिरवळ वाखाणण्याजोगी आहे ती केवळ तेथे राहणाऱ्या लोकांमुळेच हेदेखील विसरता कामा नये. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, पण परिसराशी आपल्‍याला काही देणेघेणे नसते. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे. आज सार्वजनिक ठिकाणी बस, ट्रेन, इमारती, कार्यालये, उदयान, रस्‍ते  या ठिकाणी आपल्याला अस्वच्छतेचे साम्राज्‍य दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेटची थोटके, खाद्यपदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्याकडील नदया व नाले या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होत आहेत. आपल्‍या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपण केवळ वैयक्तिक स्वच्छतेवरच भर न देता सामुदायिक पातळीवर एकत्र येवून काम केल्यास आपले शारीरिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास व वृध्दींगत होण्यास मदत होईल. स्‍वच्‍छतेमुळे आपण केवळ वैयक्तिक स्वार्थ साधत नाहीतर, ती एक मोठी देश सेवा व निसर्ग सेवाही आहे.

आपल्‍या सभोवतालचा परिसर स्‍वच्‍छ राखण्‍यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप गोष्‍टी करता येतात. आजकाल जागोजागी पसरलेल्‍या क-चयामध्‍ये सर्वात मोठया प्रमाणावर दिसणारा घटक म्‍हणजे प्‍लॅस्टिक. एकतर प्‍लॅस्टिकचे विघटन होत नाही व हा प्‍लॅस्टिकचा कचरा आरोग्‍यासाठी खूप घातक आहे. त्‍यामुळे आपण सर्वांनी प्‍लॅस्टिक पिशव्‍या व प्‍लॅस्टिकचे आवरण असलेले खादयपदार्थ वापरणे बंद करायला हवे तसेच प्‍लॅस्टिकचे विघटनदेखील योग्‍य मार्गाने करायला हवे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे, न थुंकणे या बाबीदेखील कटाक्षाने पाळल्‍या पाहिजेत. घरातील व सोसायटीतील   कच-याची योग्‍य त्‍या ठिकाणी ओला – सुका वर्गीकरण करुन विल्‍हेवाट लावली गेली पाहिजे. जमेल तशी व तेव्‍हा परिसराची स्‍वच्‍छता केली पाहिजे व इतरांनादेखील त्‍यासाठी प्रवृत्‍त करायला हवे. केंद्र शासनाने आणलेली स्‍वच्‍छ भारत संकल्‍पना देशाला अधिक समृध्‍द व सुंदर बनवणारी असुन यासाठी आपला सर्वांचाच सहभाग अत्‍यंत मोलाचा आहे.

आज सार्वजनिक कार्यक्रम व शाळा महाविदयालयांमध्‍ये स्‍वच्‍छतेची शपथ देऊन परिसर व घर स्‍वच्‍छ राखण्‍याचा संकल्‍प करायला हवा. स्‍वच्‍छतेचा वसा आपल्‍याला समृध्‍द व निरोगी आयुष्‍याकडे घेऊन जाणारा असुन त्‍याचा अंगिकार आपण सर्वांनी करायला हवा. स्वच्छता हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

http://bit.ly/ShabdRasik-2019

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त