स्वच्छता व आरोग्य
आज १५ ऑक्टोबर. जागतिक पातळीवर हा दिवस 'हाताची स्वच्छता जागरुकता दिन' म्हणून साजरा केला जातो. स्वच्छतेचे महत्व आपल्या जिवनात अनन्यसाधारण आहे. आज बदलत्या जिवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्म घेत असुन त्यांवरील उपचार पध्दती व खर्चाची व्याप्तीदेखील वाढत आहे. हया आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी सर्वात मोठी काळजी घ्यावी लागेल ती स्वच्छतेची. वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता ही माणसाच्या आरोग्यावर विपरित व दुरगामी परिणाम करते. सार्वजनिक स्वच्छतेची सुरुवात वैयक्तिक स्वच्छतेपासून होते. प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे व स्वच्छता हा विकासाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या घरांची, गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्तीक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्येकाने करणे व त्यायोगे ``स्वच्छतेतून समृध्दीकडे'' ही संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे स्वच्छतेतून लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील असुन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना यांसारख्या योजनांमध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन स्वच्छतेचे महत्व पटविण्यात येत आहे. परदेशात जाऊन आल्यानंतर आपण तेथील शहरांची स्वच्छता पाहुन त्यांचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वछता, शिस्त, सौंदर्य, सृष्टी व हिरवळ वाखाणण्याजोगी आहे ती केवळ तेथे राहणाऱ्या लोकांमुळेच हेदेखील विसरता कामा नये. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, पण परिसराशी आपल्याला काही देणेघेणे नसते. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे. आज सार्वजनिक ठिकाणी बस, ट्रेन, इमारती, कार्यालये, उदयान, रस्ते या ठिकाणी आपल्याला अस्वच्छतेचे साम्राज्य दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेटची थोटके, खाद्यपदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्याकडील नदया व नाले या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होत आहेत. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपण केवळ वैयक्तिक स्वच्छतेवरच भर न देता सामुदायिक पातळीवर एकत्र येवून काम केल्यास आपले शारीरिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास व वृध्दींगत होण्यास मदत होईल. स्वच्छतेमुळे आपण केवळ वैयक्तिक स्वार्थ साधत नाहीतर, ती एक मोठी देश सेवा व निसर्ग सेवाही आहे.

Comments
Post a Comment