अन्यथा लोक पून्हा सावकारीकडे वळतील


बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने पंजाब  अँड महाराष्ट्र या मुबंई स्थित बँकेवर आर्थिक व्यवहारांसाठी निर्बंध लादले आहेत. मंगळवारी अचानक एक परिपत्रक काढून सदर निर्बंध तात्काळ लागू करण्यात आले व लाखो खातेदारांना जबरदस्त धक्का दिला. गेली अनेक वर्षे सुरळीतपणे सुरू असणारे बँक व्यवहार तडकाफडकी बंद झाले व खातेधारकाना स्वतःच्याच खात्यातून पैसे काढण्यास मनाई करण्यात आली. वास्तविकता बँकेकडून होत असलेली ही अनियमितता आरबीआयला एका रात्रीत नक्कीच समजली नसणार. त्यामुळे बँकेवर निर्बंध लादले जाणार असल्याची कल्पना आरबीआयने आधीच लोकांना द्यायला हवी होती जेणेकरून लोकांनी आपल्या ठेवी सुरक्षित स्थळी हलवल्या असत्या. सहकारी बँकांमध्ये ठेवी ठेवणारे ग्राहक हे सर्वसामान्य लोक असतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा कष्टाचा पैसा गोठवून आरबीआयने काय साध्य केले हे समजन्यापलीकडे आहे. या निर्बंधामधून आरबीआयने  उलट बँकेलाच सवलती देऊन सर्वसामान्य खातेधारकाना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. खरेतर अशा वेळी बॅंकेला त्यांच्या ग्राहकांची देणी चुकती करण्याचे आदेश देऊन मगच कारवाई सुरू करायला हवी. बँकांमध्ये गुंतवलेली आयुष्यभराची कमाई गरजेच्या वेळी जर वापरता येत नसेल तर लोकांनी बँकिंग क्षेत्रावर विश्वास तरी कसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे येत्या काळात बँकांवरील लोकांचा विश्वास कमी व्हायला लागेल. बँक निवडीबाबतच्या मार्गदर्शक सूचना आता सरकारनेच लोकांना दयायला हव्यात नाहीतर बँकाऐवजी पुन्हा एकदा सावकारी पद्धतीकडे लोक वळायला वेळ लागणार नाही. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त