स्वच्छतेत नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय सरस

स्वच्छ रुग्णालयाच्या बाबतीत नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयास केंद्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार
स्वच्छतेच्या बाबतीत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या सरकारी रुग्णालयांना दरवर्षी केंद्र शासनाच्या वतीने "कायाकल्प" ह्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येते. स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. शुक्रवार 18 ऑक्‍टोबर 2019 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला ‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय आणि पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात रूग्णालय व रूग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात केंद्र शासनाच्या मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशातील रुग्णालयांना ‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कार 2018-19’ने गौरविण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि विभागाच्या सचिव प्रिती सुदान यावेळी मंचावर उपस्थित होत्या. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत देशभरातील रूग्णालये, संस्था आणि विविध राज्यांतील रूग्णालयांना एकूण 90 पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. तसेच देशातील एकूण 11 खाजगी रूग्णालयांना यावेळी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातून तीन रुग्णालयांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्र शासनाच्या स्वच्छता मानकांची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातून प्रथम ठरले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखील सैदाने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 50 लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटूब कल्याण मंत्रालयातर्फे आयोजित राष्ट्रीय कायाकल्प पुरस्कार 2019चे दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात "कायाकल्प' योजनेतंर्गत 50 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार गेल्या मे 2019 मध्ये जाहीर झाला होता. नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयास 2017 मध्येही कायाकल्पचा प्रथम पुरस्कार पटकावला आहे. तर यावेळी ग्रामीण जिल्हा रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या 1 लाख पुरस्कारातही नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयांतर्गत 11 ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. 2019 च्या कायाकल्पच्या स्पर्धेतही पुन्हा जिल्हा रुग्णालयाने सहभागी होत, जिल्हा रुग्णालयातील साफसफाई, जैविक कचऱ्याची विल्हेवाट, रेकॉर्ड, रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधा, वाहनव्यवस्था, औषधांचा साठा यासह विविध 250 मुद्यांच्या तपासणीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावली. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, प्रशासकीय अधिकारी व्ही.डी. पाटील यांच्यासह वैदयकीय अधिकारी, परिचारिक, कर्मचारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली होती. कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानेच रुग्णालयास दुसऱ्यांदा कायाकल्पाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. शासकीय आरोग्य सुविधांची गुणवत्ता वाढावी व अधिकारी- कर्मचाऱ्यांना जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असते. त्याचा चांगला परिणाम महाराष्ट्रातील आरोग्य सेवेवर दिसून येत असून स्वच्छता व इतर सुविधांच्या बाबतीत सरकारी रुग्णालये स्वयंपूर्ण होताना दिसत आहेत. शासकीय आरोग्य सेवांप्रति लोकांची विश्वासार्हता वाढणेकामी नक्कीच याचा फायदा होणार आहे. पुरस्कारासाठी नव्हे तर इतरांपेक्षा चांगले काम करून दाखवण्यासाठी एक आरोग्यदायी स्पर्धा आता विविध जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणांमध्ये लागली असल्याने येत्या काळात त्याचा सकारात्मक परिणाम आरोग्य सुविधांवर दिसून येईल व महाराष्ट्रातील आरोग्य संस्था खाजगी रुग्णालयांशी नक्कीच स्पर्धा करू लागतील अशी आशा आहे. आज कायाकल्प पुरस्काराने सन्मानित नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे यांनी मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. स्वच्छतेच्या बाबतीत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नाशिक व इतर पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांचे मनःपूर्वक अभिनंदन व इतरांना शुभेच्छा..

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त