एक्झिट पोलचे आकडे येतात कुठून?
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान संपल्यासंपल्या विविध चॅनेलवाल्यांनी एक्झिट पोलचे आकडे दाखवण्यास सुरुवात केली. बहुतांशी सर्वच चॅनेलनी महायुतीला दोनशेपार जागा मिळतील असा तर्क लावून विरोधकांचा पार धुव्वा उडेल असे चित्र उभे केले आहे. देशातील व राज्यातील सध्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता हे अंदाज अपेक्षितच होते. मात्र एक्झिट पोलची ही आकडेवारी नेमकी येते कुठून व कशाच्या आधारे याचा एकदा शोध लावला पाहिजे. लोकशाहीत गुप्त मतदानाला महत्व असल्यामुळे लोकांनी केलेले मतदान कुठल्या एक्झिट पोलद्वारे माहिती केले जाते हे पाहणे रंजक ठरेल. बरं मतदान केंद्रांबाहेर किंवा घरोघरी चॅनेलवाले कधी, कुणी कुणाला मतदान केले हे विचारल्याचे पाहण्यात नाही. त्यामुळे हा सर्व्हे नेमका कुठल्या भागांत व मतदारांमध्ये केला जातो हे अनाकलनीय आहे. मागील काही निवडणुकांचा अनुभव पाहता लोकांचा कल भाजप शिवसेनेकडे अधिक असल्याचे दिसून येत असले तरी एक्झिट पोलचा खेळ व चॅनेलमधील स्पर्धा ही हवेचा रोख पाहून अंदाजे हवेत मारलेले दगड तर नाहीत ना?


Comments
Post a Comment