कोकणातील शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती
सध्या सर्वत्र सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांतील शेतकरी या पावसाने देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील मुख्य व्यवसाय असलेला भातशेतीचा व्यवसाय प्रचंड संकटात सापडला आहे. शेतातील उभी व कापलेली पिके नष्ट होताना शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावी लागत आहेत. कापणी केलेले पीक कुजण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कोकणातील बहुतांश शेतकरी उपजीविकेसाठी केवळ शेतीवर अवलंबून असतो. मे जून चा हंगाम पेरणी तर ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये कापणी व झोडपणी केली जाते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा यंदा मात्र खंडित झाली आहे. गर्मीच्या समजल्या जाणाऱ्या एन ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस पडू लागल्याने शेतकऱ्यांना पिके ठेवायची व साठवायची कुठे हा प्रश्न पडू लागला आहे. संपूर्ण हंगाम घामाने व काबाडकष्टाने राबून पिकवलेल्या भातशेतीला यावेळी अवकाळी पडलेल्या पावसाचा फटका बसला आहे. भात हे कोकणातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने कापणी करून ठेवलेली भातशेती ओली झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांत शेतकरी कापणी करण्यात व्यस्त असतात. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपले पीक कापणी करून ठेवले होते. ते या अवकाळी पावसामुळे भिजले असून भातपिकाचे लोंब कुजण्याची भीती त्यांना सतावत आहे. शेतात भाताचे तयार झालेले पीक कापल्यानंतर दोन किंवा तीन दिवस उन्हात पसरवून ठेवले जाते. त्यानंतर त्याचे झोडणीसाठी छोटे भारे बनविले जातात. हे भारे सध्या काही ठिकाणी बनवले असून तेदेखील भिजल्याने ते कुजण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक भागांत भातशेतीची कापणी झालेली नाही. पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने भातकापणी आणि झोडपणीसाठी उशीर होणार आहे. तसेच, भातशेतीची कापणी केल्यानंतर एकावर एक रचून ठेवलेल्या भाऱ्याना झाकून त्याचे पावसापासून किती काळ रक्षण करावे हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा या भागातील शेती उत्पन्नशून्य होण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांपासून अवकाळी पावसामुळे भातशेतीचे उत्पन्न कमी झाले आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम, अनियमित व अति पर्जन्यमान , खतांचा तुटवडा, मजुरांची कमतरता, वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव त्यामुळे भाताचे उत्पन्न कमी झाले आहे. मागील काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाचा व वाढत्या माहागाईसह मजूरटंचाईचा फटका येथील शेतकऱ्याला बसत असून दरसाल बळीराजा तोट्यातील भातशेती करत आहे. त्यातच अवकाळी पडलेल्या पावसाचा फटकादेखील त्यांना सहन करावा लागणार आहे. शेतजमिनीची मशागत करण्यासाठी लागणारा खर्चसुद्धा या येणाऱ्या उत्पादनातून निघणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे नुकसानभारपाईसाठी शेतकरी आक्रोश करतात मात्र कोकणात कधीही त्यासाठी फार मोठे आंदोलन उभे राहिल्याचे दृष्टिपथात नाही. कोकणातील शेतकरी शेतीसह जोडधंद्याद्वारे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी प्रयत्नशील असतो. मात्र यंदा त्याचे मुख्य पीक असलेल्या व वर्षभराची पोटाची भूक भागवणाऱ्या भातशेतीवरच टाच आल्याने तो हवालदिल झाला आहे. मुसळधार पावसात उभे राहिलेले चांगले पीक नाहीसे होत असल्याने शेतकरी कधी नव्हे इतका चिंताक्रांत झाला आहे. पदराचा पैसादेखील चांगले पीक मिळण्यासाठी खर्च झालेला असल्याने कुटुंबाचा वर्षभराचा उदरनिर्वाह करायचा कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये वृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. नवनिर्वाचित सरकारने कोकणातील शेतकऱ्यांच्या ह्या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा शेतकरी आत्महत्येचे लोण उद्या कोकणापर्यंत येऊन पोहोचले तर महाराष्ट्राची परिस्थिती अधिक भयावह बनेल हे नक्की !

Comments
Post a Comment