ईव्हीएम बाबत जनप्रबोधन आवश्यक
गेल्या काही वर्षांत ईव्हीएम घोटाळ्यामुळे भाजप सरकार देशात व विविध राज्यांमध्ये एकतर्फी सत्ता मिळवत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. वस्तुतः ईव्हीएम हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्यामुळे त्या मशीनमध्ये फेरफार करता येणार नाही असे म्हणणे थोडे धारीष्ट्याचे ठरेल. मात्र मागील एक दोन वर्षांमधले काही राज्यांमधले निकाल व नुकताच जाहीर झालेला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल पाहिला तर ईव्हीएम मॅनेज करणे म्हणावे तितके सोपे व शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ईव्हीएम ही बदलत्या व आधुनिक काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रांत प्रभावी प्रवेश केलेला असताना मतदानासारख्या संवेदनशील क्षेत्रात ईव्हीएम सारख्या मशीनचा उपयोग रास्तच आहे. मात्र यांत्रिकीकरणात मानवी हस्तक्षेपाद्वारे मनासारखे बदल घडवणे अशक्य अजिबात नाही हेदेखील समजून घेतले पाहिजे. त्यामुळे निवडणुकीसारख्या भारतीय घटनेतील सर्वोच्च नागरी अधिकारामध्ये ही पारदर्शकता टिकून राहणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी इव्हिएमचे कार्य, त्यातील तांत्रिक बाबी, फेरबदलाच्या शक्याअशक्यता व त्याची गरज लोकांसमोर परिणामकारकरीत्या मांडून प्रबोधन गरजेचे आहे. तूर्तास ह्या इव्हिएम मशिननेच महाराष्ट्रातील विरोधी पक्ष प्रबळ बनवलेला असल्याने त्याच्यावर शंका घेणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिलेलाच बरा!


Comments
Post a Comment