राजकीय घडामोडी आकलनापलीकडल्या


राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडले गेलेल्या आहेत. कधी नव्हे इतके राजकीय डावपेच परस्परांविरुद्ध टाकले जात आहेत. कोण कुणाच्या मागे उभा आहे व कधी कुणाचा गेम करेल याचा काही भरवसा राहिलेला नाहीय. एकीकडे सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार उदयास येईल असे वाटत असताना राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी नाट्यमय पद्धतीने अचानक उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन अवघ्या देशाच्या राजकारणाला जबरदस्त हादरा दिला. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व राजकारणातील चाणक्य शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष भाजप सोबत जाणार नसल्याचे स्पष्ट करून आणखी एक भूकंप घडविला. आता नव्याने उदयास आलेल्या भाजप सरकारला आपल्या मागे विरोधी पक्षांचे किती आमदार उभे राहतील याचे अंकगणित ठाऊक नसणार हे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. बरं अजित पवार यांच्या भरवश्यावर भाजपने शपथविधीची खेळी केली असेल तर तेदेखील मनाला पटत नाही. कारण गेली अनेक वर्षे राज्याच्या व देशाच्या सत्ता पटलावर आपले महत्व अबाधित राखणाऱ्या पवार घराण्यात इतक्या सहजासहजी फूट पडेल हेदेखील केवळ अशक्यच. सद्यस्थितीत भाजप बहुमत सिद्ध करू शकेल अशी शक्यता धूसर असल्याचे सर्वांसमोर असतानादेखील शपथविधी व सत्ता स्थापनेची खेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वच्या रणनितीचा एक भाग आहे हे न समजण्याइतपत राजकीय अपरिपक्व कुणी नक्कीच नाही. 'सत्तेसाठी काहीही' या उक्तीप्रमाणे आज महाराष्ट्र राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत सापडला असून याचे फलित काय निघेल हे पाहण्यासाठी काही दिवस तरी वाट पाहावी लागेल. 






वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त