कागदपत्रांना डिजिटल सुरक्षेएवजी बँकेतील पैसा सुरक्षित करा
बँक खातेधारकांच्या कागदपत्रांना डिजिटल सुरक्षा देणारी 'सहमत' योजना केंद्र सरकार राबवणार असल्याचे समजते. एकीकडे बँकेचे व्यवहार सुरक्षित करण्याची सरकारी धोरणे जाहीर करायची व त्यातून पळवाटा काढण्यासाठी पीएमसीसारख्या बँकेला वाट करून द्यायची असाच निष्कर्ष काढला जाऊ शकतो. खातेधारकांची कागदपत्रे सुरक्षित होतील मात्र पैशाचे काय? पीएमसी बँकेच्या खातेधारकांना अचानक स्वतःच्याच खात्यातील पैसे काढण्यास मज्जाव करून त्यांची खाती त्यांचा काहीही दोष नसताना गोठवण्यात आली. बँकेत अनेक वर्षांपासून सुरू असलेला गैरव्यवहार, बोगस कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आलेली हजारो बनावट खाती सोयीस्कररित्या दुर्लक्षित केली गेली व अचानक एके दिवशी खातेधारकांचीच गुंतवणूक काढता येणार नाही असे सांगितले गेले. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे झाले. घोटाळे बँकेने करायचे, त्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारी शिखर बँकेला आलेले अपयश मान्य न करता सरळ सर्वसामान्य लोकांची स्वकष्टाची कमाई अडकवून ठेवायची याला काय म्हणावे? महिनाभरात या बँकेच्या दहा खातेधारकांचा पैसे बुडतील या तणावाखाली मृत्यू झाला तरी सरकार त्यावर उपाययोजना करत नाही, हा सर्वसामान्य लोकांचा उपहासच आहे. त्यामुळे खातेधारकांच्या कागदपत्रांना डिजिटल सुरक्षा देण्याऐवजी त्यांचा बँकेत ठेवलेला पैसा कसा सुरक्षित राहील हे सांगितले तर बरे होईल.

Comments
Post a Comment