आरोग्‍य विभागात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

आरोग्‍य भवनमध्‍ये जयंती कार्यक्रम

१९ व्‍या शतकातील आदिवासींचे महानायक बिरसा मुंडा यांची १५ नोव्‍हेंबर रोजी जयंती. बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. 19 व्या शतकात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते. अशा हया महान कतृत्‍वाची जयंती १५ नोव्‍हेंबर रोजी सर्वत्र उत्‍साहात साजरी केली गेली. सार्वजनिक आरोग्‍य आयुक्‍तालयाच्‍या आरोग्‍य भवन येथील तळमजल्‍यावरील सभागृहातदेखील आदीवासी जननायक बिरसा मुंडा यांच्‍या जयंतीचा कार्यक्रम अधिकारी व कर्मचा-यांच्‍या उपस्थितीत शुक्रवार दिनांक १५ नोव्‍हेंबर २०१९ रोजी पार पडला. याप्रसंगी विचारमंचावर उपस्थित अधिका-यांनी बिरसा मुंडा यांचे कार्य व योगदान उपस्थितांसमोर विषद करत भारतीय इतिहासातील त्‍यांचे महत्‍व अधोरेखित केले. आरोग्‍य सेवेतील सहायक संचालक डॉ. दुर्योधन चव्‍हाण या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रशासकीय अधिकारी श्री. नगराळे यांनी केले तर सहायक संचालक डॉ. दुर्योधन चव्‍हाण, लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष श्री विजय बोरसे व कक्ष अधिकारी श्री वैभव पाटील यांनीदेखील आपली मनोगते व्‍यक्‍त करत बिरसा मुंडा यांचे कार्य प्रेरणादायी असल्‍याचे मत मांडले. 


भारतीय स्‍वातंत्र्यलढयात बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्‍हेंबर, १८७५ रोजी रांची जवळील लिहतू खेडेगावात सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्‍पत्‍याच्‍या पोटी झाला. याच बालकाने लढवय्या न्‍याय हक्‍कासाठी मोठा लढा उभारुन वंचित घटकांसाठी अतुलनिय कार्य केले जे वर्षानुवर्षे विसरता येणारे नाही. त्‍यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा किताब जनतेनेच बहाल केला.  त्‍यांचे वडील शेतमजूर होते. घरच्‍या गरीबीमुळे त्‍यांना इंग्रजी माध्‍यमाच्‍या चाईबासा इंग्लिश मिशनरी स्‍कूलमध्‍ये शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्‍यांच्‍यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्‍यांना भारतीय संस्‍कृतीचा मनस्‍वी अभिमान होता व तो त्‍यांनी निरंतर जपला. ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्‍या राजवटीमध्‍ये आदिवासींच्‍या वनसंपत्तीवर असलेल्‍या अधिकारावर बाधा येण्‍यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळ, कंदमूळ, लाकुड्फाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासींच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्‍याकरीता आदिवासींनी न्‍यायालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्‍थापित करण्‍याची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्‍यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला. सन १८९४ मध्‍ये बिहार राज्‍यात भीषण दुष्‍काळ पडला होता. या दुष्‍काळामध्‍ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्‍यावेळी बिरसा मुंडा यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्‍वार्थी अंतःकरणाने सेवा केली. ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्‍काळावर मात करण्‍याकरिता त्‍यांनी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्‍या शोषणाविरुद्ध होते. १८९५ मध्‍ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्‍यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले. त्‍यामुळे सरकारविरुद्ध असंतोष वाढत गेला व ब्रि‍टिश सत्ता उखडून टाकण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्‍यानंतर आदिवासींच्‍या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्‍वातंत्र्याची आवश्यकता त्‍यांनी ओळखली. त्‍यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्‍यासाठी प्रयत्‍न करुन त्‍यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्‍वातंत्र्यलढा पुकारला. सन १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्‍या नेतृत्‍वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करुन त्‍यांना जेरीस आणले. त्‍यांनी पारंपारिक शस्‍त्रांद्वारे म्‍हणजे धनुष्‍यबाण, भाले इत्‍यादींच्‍या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढवले. ब्रिटिश सरकारकडे अत्‍याधुनिक शस्‍त्रास्‍त्रे होती. तरीदेखील १८९८ मध्‍ये तांगा नदीच्‍या काठावर बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशसैन्‍याला नामोहरम केले. नंतर अतिरिक्‍त कुमक आल्‍यामुळे ब्रिटिशांनी आदिवासी नेत्‍यांना रोखण्‍यात यश मिळवले. त्‍याप्रसंगी सुमारे ४०० आदिवासी शहीद झाले.  यात लढयात बिरसा मुंडा यांचे योगदान मोठे होते. सन १९०० मध्‍ये बिरसा मुंडा डोमबाडी पहाडांमध्‍ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करीत असताना, ब्रिटिश सैन्‍याने हल्ला चढविला व त्‍या ठिकाणी भीषण लढाई झाली. त्‍यांना चक्रधरपूर येथे बंदी करुन रांची कारागृहात त्‍यांची रवानगी करण्‍यात आली. २० मे १९०० रोजी बिरसा मुंडाला एकांत कोठडीत एकटे ठेवले होते. बिरसाने जेवण करणे नाकारले. त्याच दिवशी ते न्यायालयात बेशुध्द पडले. न्यायालयातून कारागृहात आणले. औषधोपचार सुरु केला. जेल अधिक्षक एंडरसनच्या औषधोपचाराने बिरसाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. सात जून पर्यंत बिरसा ठिक होते. मात्र दि. ९ जून १९०० रोजी बिरसाला रक्ताची उलटी झाली ते बेशुध्द पडले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. त्‍यांच्‍या मृत्‍यूबाबत नंतर बरीच चर्चा झाली. मात्र बिरसाच्या आंदोलनामुळेच इ.स.१९०० मध्ये सरकारने छोटा नागपुर क्षेत्रात जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले तसेच बिरसा मुंडा यांच्यामुळे मुंडा आदिवासी शिक्षण, खेळ, विज्ञान, राजकारण अशा अनेक विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली. बिरसा मुंडाने आपल्या नैसर्गिक हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय बदलाची प्रक्रिया होती. सामाजिक, वैज्ञानिकतेचे ते प्रसारक होते. समाज बदलाचा बिरसा मुंडा यांचा विद्रोह हा एक आदिवासींच्या पुर्ण स्वातंत्र्याचा विद्रोह होता.

आपल्‍या २५ वर्षाच्‍या अल्‍पजीवन कालाधीमध्‍ये त्‍यांनी आदिवासींमध्‍ये स्‍वदेशी व भारतीय संस्‍कृतीच्‍या प्रतीजी प्रेरणा जागवली ती अतुलनीय आहे. आजसुद्धा झारखंड, बिहार, ओरिसा, पिश्चिम बंगाल, मध्‍यप्रदेश मधील आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपले आदय दैवत मानतो. बिरसा मुंडा यांनी त्रिस्‍तरीय पद्धतीने समाजाच्‍या शोषणाचे मूळ, परकीय राजकीय व्‍यवस्‍थेत असल्‍याची बाब बिरसा मुंडा यांनी ओळखून त्‍याविरुद्ध आदिवासी समाजास संघटित करुन ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी आंदोलन पुकारले. आदिवासी समाजाचा आर्थिक स्‍तर उंचावण्‍यासाठी त्‍यांनी प्रचलित असलेल्‍या जमीनदारी व जहागिरदारी पद्धतीविरुद्ध लढा पुकारला.


कुठलाही समाज किंवा देश प्रबोधनाशिवाय खऱ्या अर्थाने प्रगत तसेच क्रीयाशील होत नाही. बिरसा मुंडांच्या विद्रोहामध्ये विचारधारेचा प्रभाव होता. त्‍यामुळे शिक्षण, स्वच्‍छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर विशेष भर देऊन त्‍यांनी समाज प्रबोधन केले. एकंदरीत बिरसा मुंडा यांचे जिवन व व्‍यक्‍तीमत्‍व समाजाला समर्पित करणारे होते आणि आजच्‍या पिढीला ते मार्गदर्शक असेच आहे. त्‍यांच्‍या कार्यकतृत्‍वाला सलाम.

वैभव मोहन पाटील






Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त