पुस्‍तक परिक्षण - योगाभ्‍यास डॉक्‍टरी चष्‍म्‍यातून

योगाभ्‍यास डॉक्‍टरी चष्‍म्‍यातून - डॉ. सतीश पाठक 



प्राचीन काळी ऋषी मुनींनी अध्‍यात्मिक व आरोग्‍यविषयक संशोधनाचे एक तांत्रिक शास्‍त्र निर्माण करुन त्‍याला योगशास्‍त्र हे नाव दिले. योग ही शरीराला संतुलित  प्रसन्‍न ठेवण्‍यासाठीची एक क्रिया आहे. आपण आपल्‍या शरीराकडे वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. हे टाळून निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग्य व्यायाम व आहार महत्वाचा ठरतो. या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करत डॉ. सतीश पाठक यांनी ''योगाभ्‍यास - डॉक्‍टरी चष्‍म्‍यातून'' या पुस्‍तकाव्‍दारे योगाभ्‍यासाविषयी मार्गदर्शन केले आहे. वैदयकीय अभ्‍यासक्रमात एमएस, एफसीपीएस व एमएनएएमएस पदवी मिळवलेले व मुळचे सर्जन असलेल्‍या डॉ. पाठक यांनी  योगासने व प्राणायाम हा सर्वांत स्वस्त व मस्त व्यायाम प्रकार आहे हे सांगून विविध व्याधींमध्ये उपयुक्त आसनांची माहिती दिली आहे. नेत्रस्‍नान, ब्रम्‍हमुद्रा, नमनमुद्रा, योगमुद्रा, जलनेती, जलधौती, कपालभाती, उज्‍जायी , शीतली, वायुसार, अग्‍नीसार, उछदीयान, नौली, नौलीचालन, शंखप्रक्षालन, प्राणधारणा, क्रियायोग, ओम, गायत्री, आसन, षटच्रक्र, शवासन, त्राटक, वज्रासन, पदमासन या प्रकारांची माहिती पुस्‍तकात कृतीसह देण्‍यात आलेली आहे. कोणत्‍या आजारात कोणते आसन करावे याबाबतची माहितीदेखील पुस्‍तकात आहे. ह्रदयरोग, अॅसीडीटी, मनोविकार, जडत्‍व, मुतखडा, असथमा, उच्‍चरक्‍तदाब, बध्‍दकोष्‍ठता, मधुमेह, सर्दीपडसे, पाठदुखी यांसारख्‍या आजारांवरील उपयुक्‍त प्रकार पुस्‍तकात नमुद आहेत. अत्‍यंत सोप्‍या व ओघवत्‍या भाषेत विषद करण्‍यात आल्‍याने नव्‍याने योगाभ्‍यास करुन इच्‍छीणा-यांसाठी हे पुस्‍तक खुप उपयुक्‍त आहे. वास्‍ताविकतः डॉ. सतिश पाठक हे अॅलोपॅथीचे डॉक्‍टर. योगशास्‍त्राकडे त्‍यांना वळण्‍याचे कारण म्‍हणजे श्री आंबिका योग कुटीरमध्‍ये पू.श्री.निकम गुरुजी यांचेकडून त्‍यांना मिळालेले योग प्रशिक्षण. त्‍यातून प्रेरणा घेत त्‍यांनी मिळालेल्‍या ज्ञानाच्‍या आधारे योग प्रचार व प्रसाराचा वसा हाती घेतला आहे ज्‍याचा उपयोग हजारो लोकांना होत आहे. लोणावळा येथील जगप्रसिध्‍द योग प्रशिक्षण संस्‍था ''कैवल्‍यधाम'' येथे त्‍यांचे प्रशिक्षण वर्ग सातत्‍याने सुरु असतात. शासनाच्‍या आरोग्‍य विभागामार्फत कैवल्‍यधाम येथे आयोजित एका योग शिबिराच्‍या निमित्‍ताने माझा त्‍यांचेशी परिचय झाला जो उत्‍तरोत्‍तर दृढ होत गेला. योग साधनेचा सखोल अभ्‍यास केलेले डॉ पाठक यांनी अनेक सरकारी व निमसरकारी कार्यालयांमध्‍ये जाऊन अधिकारी व कर्मचा-यांमध्‍ये योगाविषयी प्रात्‍यक्षिकांसह जागृती केलेली आहे. विविध कार्यालयांमध्‍ये त्‍यांनी स्‍लाईड शोच्‍या माध्‍यमातून सातशेच्‍या वर प्रशिक्षणे घेतलेली आहेत. सुधा प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्‍या या  ''योगाभ्‍यास डॉक्‍टरी चष्‍म्‍यातून'' हया डॉ पाठक लिखीत पुस्‍तकास जे जे रुग्‍णालयाचे माजी अधिष्‍ठाता डॉ. रविंद्र इनामदार यांची प्रस्‍तावना लभलेली आहे. पुस्‍तकाच्‍या दोन आवृत्‍या प्रकाशित झालेल्‍या आहेत. डॉ पाठक यांनी त्‍यांच्‍या  प्रदीर्घ अनुभवातून हे पुस्‍तक लिहीले असुन सोप्‍या भाषेत समजावण्‍यात आलेल्‍या क्रिया, मुद्रा, आसने, ओमकार, गायत्रीमंत्र यांच्‍याव्‍दारे होणा-या लाभांच्‍या माहितीमुळे तसेच आकृत्‍या, फोटो व चित्रांमुळे पुस्‍तक अधिक आकर्षक झाले आहे. योगासनांसारख्‍या सोप्‍या व कधीही - कुठेही करता येणा-या उपायांनी औषधोपचारावरील बराचसा खर्च टाळता येतो व मनशांतीदेखील प्राप्‍त होते. वैदयकीय क्षेत्रातील लोकांसाठी तसेच  विविध आजारांनी ग्रस्‍त असलेल्‍या रुग्‍णांसाठी योगशास्‍त्राच्‍या माध्‍यमातून रोगांचे निवारण करण्‍यासाठी डॉ सतिश पाठक यांचे हे पुस्‍तक मार्गदर्शक ठरावे असेच आहे.

वैभव मोहन पाटील
नवी मुंबई

प्रकाशक - सौ. सुधा सतीश पाठक
फोन ९८६९०२४९३८

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त