बँकिंग क्षेत्र अविश्वासार्हतेकडे
सप्टेंबर महिन्यात निर्बंध घातलेल्या पीएमसी बँकेचे खातेदार दोन महिने उलटत आले तरी अजून स्वकष्टाच्या बँकेत गुंतवलेल्या पैशांसाठी झगडत आहेत. वृद्ध, महिला व असहाय खातेदारांकडून जवळपास दररोज निदर्शने सुरू आहेत तरी त्यांची किव करावीशी कुणाला वाटत नाही हे देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. १९८४ साली स्थापन झालेल्या या बँकेने सहकारी क्षेत्रात हळूहळु पाय रोवत निरनिराळ्या राज्यांत १३७ शाखा उघडल्या. आरबीआयच्या मानन्याप्रमाणे बँकेची स्थिती व पत चालू आर्थिक वर्षापर्यंत उत्तम होती. मात्र एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत असे काय घडले की अचानक आरबीआयला या बँकेत मोठी अफरातफर झाल्याचे अवगत झाले याचे उत्तर देण्याची तसदीदेखील अद्यापि आरबीआयने घेतलेली नाही. आरबीआयने आजवर केलेल्या लेखपरिक्षणामधील त्रुटी व कमतरतांचा हा परिपाक आहे. त्यामुळे या घोटाळ्याला जबाबदार घरभेदी अगोदर आरबीआयने शोधायला हवेत. बँकेचे लाखो खातेधारक अजूनही आपल्या आयुष्यभराच्या गुंतवणुकीच्या अपेक्षेत वाऱ्यावर व अधांतरीच आहेत. त्याबद्दल अधिकृतरित्या साधे दिलासा देणारे वक्तव्य करण्यासही यंत्रणा तयार नाहीत. उद्योगपती, शेतकरी यांना मदत देणाऱ्या केंद्र व राज्य सरकारला पीएमसी खातेधारकांचा टोकाचा संघर्ष महत्वपूर्ण का वाटत नाही हा मोठा यक्षप्रश्नच आहे. आश्चर्याची बाब हीच आहे की आपली स्वकमाई बुडण्याच्या चिंतेत दहा खातेदारांचा मृत्यू होवुनदेखील राजकीय पक्ष किंवा प्रसारमाध्यमे हा मुद्दा प्रभावीपणे उचलून धरत नाहीत. आज या खातेदारकांपैकी कुणाकडे उपचारासाठी पैसे नाहीत, कुणाकडे घरभाडे, शाळेची फी, घराचे हप्ते तर अनेकांकडे रोजचे दैनंदिन जीवन जगण्यासाठीही जमापुंजी नाही, जे काही होते ते सर्व ह्या बँकेतच. लाखो खातेधारकांची कष्टाची कमाई या बँकेत अडकून पडल्याने ते हवालदिल झाले आहेत. दररोज बँक शाखांवर व आरबीआयवर मोर्चे, आझाद मैदानात आंदोलने, मुख्यमंत्री निवासस्थानावर धडक असे पर्याय वापरुनदेखील त्याची कुणीही दखल घ्यायला तयार नाही. रातोरात एखादी बँक बंद करून खातेधारकांना त्यांचे पैसे काढण्यास नकार देऊन घरी पाठवणे म्हणजे बँकिंग क्षेत्रही हुकूमशाहीकडे झुकत चालल्याचे चित्र आहे. याने भारतीय बँकिंग व्यवस्था अविश्वासार्हतेकडे झुकत चाललेली आहे असेच म्हणावे लागेल. बँकेतील अधिकारी, लेखापरीक्षक व एखाद्या खाजगी कँपनीचे अधिकारी साटेलोटे करून सर्वसामान्य खातेदारांच्या पैशांची लूट करत असतील तर लोकांनी बँकांवर विश्वास तरी का ठेवावा? सर्व बँकांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय प्रतिनिधी म्हणून आरबीआयची असते. आरबीआय कडून अशा अनियमिततेचे ऑडिट नियमित होणे अपेक्षित आहे. मात्र अनेक वर्षे सुरू असलेल्या ह्या अराजकतेकडे आरबीआयचे अधिकारीदेखील कानाडोळा करत असतील तर त्यांनादेखील गुन्हेगारांच्या रांगेत का उभे करू नये? सर्वसामान्य खातेधारकांचा यात काय दोष? यापुढे लोकांनी आपापल्या जबाबदारीवर बँकेत पैसा ठेवावा असे एकदा सरकारने व आरबीआयने जाहीर करावे मग ह्या बँकगिरीची काय अवस्था होते ते पहा! यातून लोकांना पुन्हा एकदा रोखीच्या व्यवहारास व सावकारीकडे वळण्यास प्रवृत्त करण्याचा इरादा आहे का अशीही शंका येते. इतका मोठा हजारो कोटी रुपयांचा घोटाळा होतो, लाखो सर्वसामान्य देशवासियांची आयुष्याची कमाई पणाला लागते, लोक आक्रोश करत रस्त्यावर उतरतात, मानसिक धक्क्याने लोक मारताहेत मात्र तरीदेखील इथली व्यवस्था हलायला तयार नाही, कुणी चकार शब्द बोलायला तयार नाही. ना लोकप्रतिनिधी ना प्रसारमाध्यमे यात लक्ष घालत. पैसे बुडतील या धक्क्याने दहा खतेधारकांचा मृत्यू झाल्यानन्तर राज्य व केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थिती म्हणून तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून मार्ग काढायला हवा. मात्र या खातेदार नागरिकांना अद्यापि सापत्नच वागणूक मिळत आहे. जणू काही ह्या खातेदारांचाच बँक घोटाळ्यात सहभाग आहे वा ते देशाचे नागरिकच नाहीत अशी वागणूक त्यांना मिळत आहे. त्यांचा रोज रस्त्यावर सुरु असलेला आक्रोश ऐकण्यास कुणीच तयार नाही. या प्रकरणाने बँकिंग क्षेत्र आज संशयाच्या भोवऱ्यात आणून उभे केले आहे. इतर बँकांतील खातेधारकदेखील पीएमसी प्रकरणाचा प्रचंड धसका घेऊन असून ते आरबीआयविरुद्धच्या रोषात प्रत्यक्ष सहभागी नसले तरी सर्वांचेच बारीक लक्ष याप्रकरणी अंतिम भूमिकेकडे लागून राहिले आहे. बँकेच्या व सरकारी व्यवस्थेच्या विश्वासावर लोक बँकेत पैसा सुरक्षित राहील म्हणून गुंतवतात. मात्र एके दिवशी बँकेवर निर्बंध आणत असल्याचे सांगत खातेदारांना त्यांचेच पैसे काढण्यास मज्जाव करणे म्हणजे त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासारखे नाही तर काय आहे? वास्तविकता घोटाळ्यास जबाबदार सर्व लोकांवर कठोर कारवाई करून त्यांचेकडून घोटाळ्यातील सर्व पैसे वसूल करावेत मात्र खातेधारकांचा त्यात काहीही दोष नसल्याने त्यांना तात्काळ त्यांची गुंतवणूक परत मिळवून देण्यासाठी सरकारी प्रयत्न व्हायला हवेत. तरच लोकांची व्यवस्थेवरील विश्वासार्हता टिकून राहील. आज प्रसारमाध्यमे व सरकार मनात आणले तर काहीही करू शकतात. त्यांनी ठरवले तर ही बँक जगवणे व लोकांचा स्वतःच्या पैशासाठीचा आक्रोश थांबवणे सहज शक्य आहे. मात्र इथे मदतदेखील केवळ राजकीय सोय पाहून दिली जाते हे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. जिथे राजकीय मूनाफा नाही तिथे ना राजकारणी लक्ष घालत ना त्यांचेसाठी काम करणारा मीडिया. आज पीएमसी खातेदारांवर ओढवलेला प्रसंग उद्या इतर कुठल्याही बँकेवर ओढवू शकतो. मग त्यामधील खातेधारकांनीही असेच वणवण फिरायचे का? याचे उत्तर कुणाकडे असेल असे वाटत नाही. पीएमसी बँकेसंदर्भात पडलेला पायंडा देशातील करोडो बँक खातेधारकांच्या मुळावर उठणारा असून त्याने भारतीय बँकिंग व्यवस्था अविश्वासार्हतेकडे झुकत चालली आहे एव्हढे नक्की !


Comments
Post a Comment