आरोग्यमंथन - रस्ते अपघातांचे प्रमाण वाढतेय

रस्ते अपघातांचे प्रमाण वाढतेय 

आज  आपल्‍याला अवतीभोवती जिकडे बघावे तिकडे नुसती वाहनेच वाहने दिसुन येतात. सर्वत्र वाहनांच्‍या लांबच लांब रांगा व वाहतूक कोंडीत उभी असलेली वाहने दररोज वाढतच चाललेली आहेत. दरदिवशी नव्‍याने नोंदणी होणारी हजारो वाहने थेट रस्‍त्‍यावर येऊन वेगाशी स्‍पर्धा करु लागली आहेत. यातुन दररोज रस्‍ते अपघातांचे प्रमाणदेखील प्रचंड वाढले आहे. अपघात या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर वाहनांचे अपघात येतात. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे, पण पूर्वसूचनेशिवाय, ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा ‘अपघात’ या शब्दाचा सामान्य अर्थ होतो. मात्र रस्‍ते अपघातांची संख्‍या आज प्रचंड आहे.  जगात दरसाल १३ लाख लोक रस्त्यांवरील वाहनांच्या अपघातांत मृत्युमुखी पडतात. असे अपघात टाळावेत यासाठी गांभीर्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्‍याची गरज निर्माण झाली आहे. वाहतुक नियम कडक करण्‍यात आलेले असले तरी त्‍याची अंमलबजावणी फार  परिणामकारक व पारदर्शकपणे होत नसल्‍याने परिस्‍थीती अधिकच भयावह बनत चाललेली आहे. बेदरकारपणाने वाहने चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. रस्‍त्‍यांची अवस्‍थाही फार चांगली नाही. रस्त्यांची अवस्था वाहनांच्या अपघातांना निमंत्रण देणारी असतानाच दररोज हजारो वाहने नव्याने रस्‍त्‍यावर येत आहेत. यावर आजच  काही परिणामकारक उपाय आखले नाहीत तर २०३० सालापर्यंत अपघात बळींची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युनोने नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार हा वाहतूक अपघातांत बळी पडलेल्यांसाठी स्मरण दिन म्हणून पाळण्याचे ठरविले. रस्त्यांवर होणारे वाहनांचे अपघात कमी करणे आपल्या हातात आहे, म्हणून २०११ ते २०२० हे दशक या निमित्ताने जनजागृतीचे दशक म्हणून पाळले जात आहे. 
जगभरात होत असलेल्या अपघातात दरसाल ५ कोटी लोक गंभीर जखमी होतात आणि त्यांना अपंगत्व आल्याने त्यांचा उपजीविकेचा मार्ग खुंटून कुटुंबाची वाताहत होते. अपघात बळींत ९० टक्के बळी हे १५ ते २९ वर्षे वयोगटातले असल्याचे आढळून आले आहेच पण ५ ते ४५ वर्षे या वयोगटातल्या लोकांसाठी अपघात हे मृत्यूच्या तीन प्रमुख कारणांतील एक मोठे कारण ठरले आहे. म्हणजे या अपघातांत मरण पावणारे लोक हे प्रामुख्याने उत्पादक वयातले असतात ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. कारण त्यांचे असे अवेळी मृत्यू झाल्याने देशांतल्या उत्पादनाला फटका  बसतो.
जगाच्या ज्या भागात एकूण वाहनांपैकी ९० टक्के वाहने आहेत त्या भागात म्हणजे विकसित देशात १० टक्के अपघात होतात तर ज्या भागांत १० टक्के वाहने आहेत त्या भागात मात्र एकूण अपघातांच्या ९० टक्के अपघात होतात. हे प्रमाण पाहता जगभरातल्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अविकसित देशांत जनजागृती करण्याची किती गरज आहे हे लक्षात येईल. भारतात दरसाल १ लाख ८० हजारावर लोक रस्त्यावरील अपघातात मृत्युमुखी पडतात. हे मृत्यूचे प्रमाण दर चार मिनिटाला एक आणि तासाला १६ असे पडते. म्हणजे भारतात दर तासाला १६ जण कोठे ना कोठे अपघातात जीव गमावतात. देशात दररोजच सरासरी १२१४ अपघात होतात. यातले ६५ टक्के अपघात राष्ट्रीय महामार्गावर होतात. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू ही दोन राज्ये अपघातांबाबत आघाडीवर असली तरीही महाराष्ट्रही याबाबतीत मागे नाही. अपघातांची अनेक कारणे देता  येतील. मात्र मद्यप्राशन करून ड्रायव्हिंग करणे हे सर्वात मोठे कारण असल्याचे दिसते. शिवाय रस्त्यांची वाईट अवस्था, वाहनांची वाढती संख्या, वाहतूक नियमांच्या पालनाबाबतची उदासीनता, सार्वजनिक वाहतूक साधनांचा अभाव, वेगाने वाहने चालवण्याची हौस, सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष, गाडी चालवताना होणारा मोबाईलचा वापर, सलग अनेक तास गाडी चालवणे, सीट बेल्ट न बांधणे अशीही अनेक कारणे दिसून येतात. या गोष्टी आपल्या हातातल्या असल्‍यामुळे त्‍याचे भान ठेवून सर्वांनी काळजी घेतली तर अपघात बळींचे प्रमाण कमी करणे सहज शक्य आहे. रस्त्यावरच्या अपघातांमध्ये मरणा-यांपेक्षा नुसते जखमी होणा-यांचे प्रमाण पंधरापट आहे. अपघातांमधून वाचलेल्या अशा व्यक्तींमध्ये काही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन परिणाम राहतात. प्रत्येक अपघातात होणारी शारीरिक इजा कमी अधिक प्रमाणात असू शकते. काही अपघात किरकोळ म्हणून प्रथमोपचार करण्यासारखे असतात. त्‍यामुळे अपघात झाल्‍यानंतर प्रथमोपचार व इतर आपात्‍कालीन उपायांची माहिती असणेदमखील तितकेच महत्‍वाचे असते. रस्‍ते अपघातांमध्‍ये आपात्‍कालीन क्रमांकांबददल तसेच शासनाच्‍या १०८ हया सेवेबददल आपण अवगत असणे गरजेचे  आहे. अपघातग्रस्‍तांना प्रथमोपचार करून ताबडतोब रुग्णालयात पाठवणे आवश्यक असते. वेळीच मिळालेला प्रथमोपचार अगदी लाख मोलाचा ठरू शकतो. त्‍यामुळे वाहने चालवणा-या व वाहनाने प्रवास करणा-या प्रत्‍येकाने अशा आपत्‍तीग्रस्‍त व अपघाताच्‍या परिस्‍थतीत काय करायला हवे याचे ज्ञान व भान ठेवायला हवे.

वैभव मोहन  पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त