प्रखर विरोधी बाणा सत्ताधाऱ्यांना एकत्र ठेवणार
सध्या अस्तित्वात आलेले महाविकास या नव्या कोऱ्या आघाडीचे सरकार वैचारिक नव्हे तर सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेल्या परिस्थितीने बनलेले सरकार आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सुरू असलेली घोडदौड व त्यामुळे प्रादेशिक पक्षांबरोबरच राष्ट्रीय पक्षांचादेखील कमी होत चाललेला प्रभाव हे कारण या अभूतपूर्व आघाडीमागे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजप पक्षाला जनतेने मोठा कौल देत सत्ता बहाल केली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पाच वर्षांमध्ये घेतलेले मोठमोठे निर्णय व त्याला मिळालेला जनाधार याचे ते फलित होते. मात्र सत्ता उपभोगताना घटकपक्ष व विरोधक यांना विश्वासात घेताना न जमलेला ताळमेळ यामुळे भाजप एकटा पडल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले. यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राजकीय व वैचारिक मतभेद असलेल्या पक्षांची मोट बांधून सत्तास्थापन करण्यात आली आहे. विधिमंडळात व राज्यात स्वतंत्रपणे विचार केला तर भाजपच मोठा पक्ष असल्यामुळे विरोधी कणा मजबूत झाला आहे. मात्र भाजपचा हाच प्रखर विरोधी बाणा महाविकास आघाडीतील पक्षांना घट्ट बिलगून राहण्यास कारणीभूत व टॉनिक ठरणार आहे. श्री उद्धव ठाकरे यांच्यासारखे संयमी मुख्यमंत्री सामंजस्य व अनेक तडजोडी स्वीकारून सत्ताधारी पक्षांची मोट बांधून ठेवण्यात यशस्वी होतील असा कयास आहे. बाकी घोडामैदान फार दूर नाही, खरी लढाई आता सुरू झाली आहे.

Comments
Post a Comment