आजीची गाठ अन सुटकेचा निश्वास
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
मागील महिन्यात ४ सप्टेंबरला माझ्या आजोबांचे वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले आणि सर्व विधी उरकल्यानंतर गावाकडे राहणाऱ्या आजीला आम्ही नवी मुंबईत राहण्यास घेऊन आलो. आजीचे वय आज साधारणतः ८६ वर्षे आहे मात्र तिची प्रकृती मात्र कमालीची ठणठणीत आहे. पूर्वी शेतीसारखी कष्टाची कामे केलेल्या आजी - आजोबांचे वय आणि इतक्या वयानंतरदेखील त्यांची ठणठणीत प्रकृती व क्रियाशीलता अनेकांना विस्मयीत करणारी ठरली आहे. इतके वय झाल्यानंतरदेखील आजीची दृष्टी व श्रवणशक्ती आजही अतिशय तीक्ष्ण आहे. वृद्धपकाळात किरकोळ आजारपण वगळता कुठलाही मोठा आजार न जडलेल्या आजीला गेल्या काही महिन्यांपासून मात्र एका वेगळ्याच समस्येने जखडले होते. डोक्याच्या मागील बाजूस मानेच्या वरच्या भागावर केसांमध्ये एक चरबीची गाठ उगवली होती जी दिवसेंदिवस मोठमोठी होताना दिसत होती. सुरुवातीला फार जटिल न वाटणारी ही गाठ अलीकडल्या काळात मात्र उठून दिसायला लागली. ही विचित्र अशी गाठ दाबल्यानंतरदेखील दुखत नसली तरी झोपणे, केस विंचरणे, स्नान करण्यासारख्या दैनंदिन दिनक्रमात मात्र अडथळा ठरू लागली होती. तसेच गाठीच्या ठिकाणी सतत खाज येत असल्याचीदेखील तक्रार आजी सातत्याने करताना दिसत होती. एके दिवशी कामावर निघताना माझ्या आईने ही गाठ आजीला त्रासदायक ठरत असल्याचे निदर्शनास आणून त्यावर काहीतरी उपाय करण्यासाठी सांगितले. त्यानंतर मी त्या गाठीचा मोबाईलवर फोटो काढला व माझ्या कार्यालयातील काही वैद्यकीय अधिकार्यांसमवेत शेअर करून त्यांचा सल्ला मागितला. कार्यालयातील माझे निकटवर्तीय डॉ घोलप यांनी सदर गाठ Cebaceus cyst, Lyphoma, Abscess, Swelling, Alopecia यापैकी एखादी असल्याचा निष्कर्ष काढून त्याची अधिक चिकित्सा करण्याचा सल्ला दिला व त्यासाठी ते आवश्यक सर्व प्रकारचे साहाय्य देण्यासाठी तयार झाले. त्यानंतर त्यांनी वाशी, नवी मुंबई येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्यांचे मित्र असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपचाराची पुढील दिशा ठरवू असेदेखील सांगितले. दरम्यान आमच्या कार्यालयात मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याचे कामकाज सांभाळणारे डॉ अरुण यादव यांचेशी गाठ पडली व त्यांनादेखील मी आजीच्या त्या गठिबद्दल माहिती दिली. त्यांनंतर त्यांनी मला तातडीने नेरुळच्या डी वाय पाटील रुग्णालयात जाऊन आजीच्या आवश्यक तपासण्या करण्यास सांगितले. दुसऱ्याच दिवशी मी, भाऊ व वडील असे तिघे मिळून आजीला डी वाय पाटील रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे ओपीडी मध्ये आम्ही रुग्णालयाचे सर्जन डॉ कैलास जवादे यांना भेटलो. त्यांनी गाठीचे निरीक्षण केल्यानंतर एमआरआय करण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही दुपारपर्यंत एमआरआय करून घेतला मात्र रिपोर्ट मिळण्यासाठी उशीर होणार असल्याकारणाने आम्हाला घरी परत जाण्यास सांगण्यात आहे. या सर्व प्रक्रियेत आम्हाला मदत करणारे रुग्णालयातिलच कमळाकर चौगुले यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा Contrast एमआरआय करावा लागणार असल्याचे फोनवर सांगितले. त्यानुसार आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी नऊच्या सुमारास आजीला घेऊन रुग्णालयात पोहोचलो. Contrast एमआरआय झाल्यानंतर डॉ जवादे यांनी सदर गाठीचे संगणकीय निरीक्षण केले व आपल्या सहकारी डॉक्टरांसह सविस्तर चर्चा केली. बारीक परीक्षणाअंती, डोक्याच्या हाडांना अथवा Skull ला ती गाठ जोडलेली नसून स्वतंत्रपणे वाढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे डोक्याच्या इतर भागाला इजा न पोहोचवता सदर गाठ सर्जरीद्वारे काढता येऊ शकते असादेखील निष्कर्ष काढला. तसेच ही गाठ सकृतदर्शनी Lyphoma सदृश्य असल्याचेदेखील त्यांनी निरीक्षणात नोंदवले. त्यानंतर त्यांनी आजीला तातडीने रुग्णालयात दाखल करून ऑपरेशनआधीच्या सर्व आवश्यक चाचण्या करून घेण्यास सुचवले. त्यानुसार त्याच दिवशी शनिवारी म्हणजे ५ ऑक्टोबरला आम्ही आजीला डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. रक्त, एक्सरे, ईसीजी यासह आवश्यक सर्व चाचण्यांचे सोपस्कार पार पडले. त्यात थोडे हीमोग्लोबिन कमी म्हणजे ७.५ आढळले ज्यावर गोळ्या व सिरप सुरू करण्यात आले. Neurology विभागाने आजीचे वय बघता Brain MRI अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला त्यानुसार सोमवारी ती टेस्ट देखील करण्यात आली. याआधीचे बहुतांशी सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असल्यामुळे डॉ जवादे यांनी बुधवारी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णालयाच्या भुलतज्ञ विभागाने कार्डिओलॉजीमध्ये हृदयाचे ठोके अंशतः समप्रणात येत नसल्याने सामान्य भुलीद्वारे (GA) सर्जरी करण्यास असमर्थता दर्शवली व आमच्या मनात काहीसे भीतीचे व दडपणाचे काहूर उठले. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक उदभवलेल्या या पेचामुळे आम्ही सर्वच स्तब्ध झालो होतो. ऑपरेशनमध्ये काही प्रमाणात Risk निर्माण झाल्याचे समजल्यामुळे मलादेखील काय करावे हे सुचत नव्हते. त्यानंतर बुधवारी मी डॉ जवादे यांचेशी संपर्क साधला व चर्चा केली. त्यानंतर त्यांनीदेखील सात आठ दिवस थांबून औषधोपचारद्वारे ईसीजी निर्विघ्न होण्यापर्यत वाट पाहू व नंतर सर्जरी करू असे सुचवले मात्र तत्पूर्वी Brain MRI अँजिओचा रिपोर्ट आल्यानंतर पून्हा एकदा भुलतज्ञ विभागाशी रात्री चर्चा करतो असे सांगितल्याने आमच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. अखेर बुधवारी सायंकाळी Brain MRI अँजिओचा रिपोर्ट आला जो
अत्यंत सामान्य (Normal) होता. रात्री डॉ जवादे यांनी फोन करून उद्याच सकाळी ऑपरेशन करू असे संगीतल्यावर मनातील चिंतेची जागा आशेने घेतली आणि कधी एकदा गुरुवारचा दिवस उजाडतो असे झाले. ऑपरेशन सुरळीत पार पडण्यासाठी मनोमन प्रार्थना करू लागलो. ऑपरेशनची वेळ सकाळी नऊची होती, मी व भाऊ सकाळी आठलाच तिथे पोहोचलो सोबत मंगेश देवकर नावाचा माझा मित्रदेखील होता. आई आजीसोबच रात्री तिथेच असायची. थोड्या वेळातच डोंबिवलीचे काका, काकीदेखील पोहचले. कार्यालयातील डॉ घोलप व डॉ अरुण यादव हेदेखील आवर्जून तिथे सकाळी नऊच्या सुमारास उपस्थित होते. भुलतज्ञ विभागाच्या डॉक्टरांनी आम्हाला उदभवू शकणाऱ्या संभाव्य परिस्थितीची पूर्वकल्पना दिली. रुग्णाचे वय पाहता ऑपरेशनमध्ये गुंतागुंत निर्माण झाली तर आयसियु, रक्त अथवा तत्सम आपत्कालीन यंत्रणेची गरज पडू शकते याची पूर्वकल्पना दिली. Consent फॉर्म्सवर माझ्या व काकांच्या सह्या घेऊन सोपस्कार पाडण्यात आले. दरम्यान सामान्य भूल (GA) न देता Local Anesthesia देऊन सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता जो आम्हाला अपेक्षितच होता. या सर्व परिस्थितीत आजी मात्र कमालीची बिनधास्त होती. जणू काही घडणारच नव्हते असे दर्शवुन उलट आम्हालाच काळजी न करण्याचा सल्ला देत होती. डॉ जवादे यांनी पुन्हा एकदा सर्जरीची माहिती देऊन सर्वांना निर्धास्त केले व सर्जरीसाठी आजीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आले. डॉ जवादे यांचा आत्मविश्वासच आमच्यासाठी त्यावेळी आश्वासक होता. साधारणतः अर्ध्या पाऊण तासातच डॉ जवादे यांनी सर्जरी यशस्वीपणे पार पडून बाहेर येत काढण्यात आलेली गाठ दाखविली आणि सर्जरी उत्तमरीत्या पार पडल्याचे सांगताच आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. गेल्या काही तासंपासून सुरू असलेली मनाची घालमेल अचानक थांबली व आम्ही अगदी निवांत झालो. काही वेळातच आजीला आयसीयूमध्ये आणण्यात आले, तोवर भुलीचा परिणाम बऱ्यापैकी उतरला होता व तिथे सलाईनद्वारे इंजेक्शन वगैरे देऊन दुपारी साडेबाराच्या सुमारास तिला पुन्हा वॉर्डमध्ये आणण्यात आले. या सर्व प्रक्रियेत सर्वात मोठा वाटा उचलणारे डॉ जवादे यांचे आभार मानावे तितके थोडके आहेत मात्र नेहमीच रुग्णसेवेत स्वतःला वाहुन घेतलेले जवादे हे श्रेय आपल्या रुग्णालयातील टीमवर्कला देतात. आपल्या डीवाय पाटील रुग्णालयाबद्दल प्रचंड अभिमान बाळगणाऱ्या डॉ जवादे यांना रुग्णाला उत्तम सुविधा देणारी उत्कृष्ट टीम बनवायची असून रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉकटरवरील विश्वास खूप महत्त्वाचा असल्याचे ते आवर्जून सांगतात. डॉकटर व रुग्णाचे नातेवाईक यांचे सौहार्दपूर्ण संबंध वैद्यकीय उपचारामध्ये चांगला निकाल देऊ शकतात असेदेखील त्यांना वाटते. आजीच्या ऑपरेशन प्रक्रियेत आम्ही रुग्णालयातील निरनिराळ्या चाचण्या, उदभवणारी गुंतागुंत व रुग्णांशी हस्तमुखपणे बोलणारा एक मनमिळावू डॉकटर अनुभवला जो चिरकाल लक्षात राहणारा आहे. तसेच त्यासाठी आम्हाला मानसिकदृष्ट्या प्रबळ करून सहाय्य करणारे डॉ कैलाश जवादे, डॉ अरुण यादव, डॉ घोलप, कमळाकर चौगुले, मंगेश देवकर यांचे योगदान न विसरता येणारे आहे. आजीची गाठ सध्या पुढील चाचण्यांसाठी (Histopath) पाठवण्यात आली असली तरी ती काढेपर्यंत आमचा गुदमरलेला सुटकेचा निश्वास आम्ही कधीही विसरू शकणार नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Show quoted text
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment