घणसोली रेल्वे स्थानक वाहतूक कोंडीत
घणसोली रेल्वे स्थानकासमोर पश्चिमेस गेल्या आठवडाभरापासून नवरात्री हॉटेलच्या बाजूच्या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे ज्याचा विपरीत परिणाम येथील वाहतुकिवर झालेला आहे. अगोदरच हा परिसर रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे व सततच्या वाहतूक कोंडीमुळे खूप चर्चेत असतो. या ठिकाणी अनेकदा बस चालक, पादचारी व रिक्षा चालकांमध्ये वादाचे प्रसंग उदभवले आहेत. आता तर या गोंधळात अधिकच भर पडली आहे. एका बाजूचा रस्ता कामासाठी पूर्ण बंद केल्यानंतर त्या बाजूची वाहतूक विरुद्ध बाजूस वळवण्यासाठी चक्क दुभाजक तोडून येण्याजाण्याचा रस्ता जोडण्यात आला आहे. त्यामुळे स्टेशनसमोरील चौकात अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. स्टेशनसमोरून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, स्टेशनमधून बाहेर पडणारे प्रवाशी, दोन्ही बाजूंकडून येणाजाणारी वाहने यामुळे हा चौक सतत जॅम असतो. दोन ते तीन मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल पंधरा ते वीस मिनिटे लागत आहेत. पादचारी व दुचाकीस्वारदेखील या गर्दीतून मार्ग काढू शकत नाहीत इतकी भीषण अवस्था या चौकाची आहे. दर मिनिटाला इथे वाहनचालकांचे व पादचाऱ्यांचे खटके उडताना दिसत आहेत. गेले आठ ते दहा दिवसांपासून हा प्रकार सुरू असतानादेखील इथे कुणीही वाहतूक पोलीस नेमण्यात येत नाही याचेच अप्रूप वाटते. इथली मूळ समस्या बेशिस्त रिक्षावाले हीच आहे. रिक्षा स्टँडची रचना व नियंत्रण योग्य पद्धतीने केल्यास आणि चौकात सिग्नल यंत्रणा बसवल्यास त्याचबबरोबर स्टेशनपासून रहिवाशी संकुलामध्ये येण्यासाठी पादचारी पूल बांधल्यास ही समस्या बऱ्याच अंशी कमी होईल. प्रशासनाने याची उचित दखल घ्यावी.


Comments
Post a Comment