घणसोलीच्या सेंट्रल पार्कचे दरवाजे कधी उघडणार


सिडकोने वसवलेल्या नवी मुंबई या सुनियोजित शहरात महानगरपालिकेने प्रत्येक नोडमध्ये उद्याने निर्माण करण्याचे धोरण आखले आहे. सद्यस्थितीमध्ये २०० पेक्षा जास्त उद्याने व हरित क्षेत्र तयार केली आहेत. शहरातील वंडर्स पार्क, रॉक गार्डन, आर. आर. पाटील उद्यान, मँगो गार्डन व इतर सर्व भव्य उद्याने परिमंडळ एक मध्ये आहेत. मात्र वाशी, नेरुळ व सीबीडी परिसराच्या तुलनेमध्ये घणसोली ते दिघा दरम्यान चांगली उद्याने नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हा असमतोल कमी करण्यासाठी महापालिकेने घणसोली सेक्टर ३ मध्ये जवळपास ३९ हजार हेक्टर जमिनीवर सेंट्रल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. १६ ऑगस्ट २०१४ रोजी उद्यानाचे काम सुरू करण्यात आले व साधारणतः दीड दोन वर्षांपूर्वीच हे काम पूर्णदेखील झाले आहे. याठिकाणी ओपन जीम, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, मिनी फुटबॉल कोर्स, आकर्षक मानवी पुतळे अशी उद्यानाची रचना असून हे सर्वच काम जवळपास पूर्ण झाले आहे. आबालवृद्धांबरोबरच तरुणांना देखील या उद्यानाच्या उदघाटनाची प्रतीक्षा आहे. मात्र अद्यापि ह्या उद्यानाचे लोकार्पण करण्यास प्रशासनास व लोकप्रतिनिधींना वेळ मिळत नसल्याने ह्या उद्यानाचा लाभ नागरिकांना मिळत नाही. उलट गर्दुल्ले, मद्यपी व प्रेमी युगुलेच त्याचा जास्त वापर आपल्या कार्यभारासाठी करताना दिसतात. उद्यानाचे लोकार्पण लवकरात लवकर करावे अशी मागणी नागरिकांनी व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही केल्यानंतरदेखील अजून त्याबाबतीत उदासीनताच आहे.
मुळात हे सेंट्रल पार्क सावली गावच्या जागेवर उभारण्यात आले आहे. उद्यानासाठी भूखंड मोकळा करताना सिडको व महापालिकेने प्रकल्पग्रस्तांची काही जुनी घरेही पाडली. पुनर्वसनाचा प्रश्न सर्वप्रथम मार्गी लावण्यात यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्त नागरिक व संस्थांनी केली आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावरही बैठकांचे आयोजन करण्यात आले. शासन व सिडकोबरोबर झालेल्या बैठकांमध्ये सिडकोने पुनर्वसनासाठी 2400 चौ मीटरचा भूखंडदेखील उपलब्ध करून दिलेला असल्याचे समजते. मात्र त्यावर महापालिका व सिडकोने तातडीने निर्णय घेऊन पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. या सर्वांत अद्यापि हे उद्यान नागरिकांना वापरासाठी खुले करण्यात आलेले नाही. सेंट्रल पार्क हे परिमंडळ दोनमधील सर्वात मोठे उद्यान आहे. उद्यानाचे आकर्षक फोटो सोशल मीडियावरून व प्रसारमाध्यमातून व्हायरल होत असल्यामुळे नागरिकांमध्येही त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक नागरिक आपल्या लहान मुलांना घेऊन उद्यानाच्या प्रवेशद्वारापर्यंत येत आहेत. प्रवेशद्वारावरच मुले खेळत असल्याचे चित्रही अनेकदा पाहावयास मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले हे सेंट्रल पार्क धूळ खात पडून राहणे नवी मुंबईच्या वैभवाला नक्कीच शोभनिय नाही. त्यामुळे ह्या प्रकल्पाने बाधित स्थानिकांना लवकरात लवकर न्याय देऊन सेंट्रल पार्कचे दरवाजे नागरिकांसाठी खुले करावेत हीच अपेक्षा.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त