व्यापारी तुपाशी अन शेतकरी उपाशी
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
गेल्या काही दिवसांत बाजारातील भाज्यांचे चढे दर पाहिले तर त्याबद्दल खेद न वाटता थोडे समाधानाच वाटले. कधी नव्हे ते शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो हे पाहून फार बरे वाटले. दोनेक महिन्यांपूर्वी दहा वीस रुपये किलोने मिळणारा कांदा तर अद्याप शंभर ते दीडशे रुपये किलोच्या घरात आहे. किरकोळ बाजारामध्ये सध्या जवळपास सर्वच भाजीपाल्यांचे दर ८० ते १०० रुपये किलोच्या घरात आहेत. मात्र प्रत्यक्षात हा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याला इतका दर मिळतो का हा खरा प्रश्न आहे. याची शहानिशा करन्याच्या फंदात आपण पडत नाही उलट शेतकऱ्याच्या नावानेच सर्वत्र ओरड सुरू आहे. गेले काही दिवस टीव्ही व वर्तमानपत्रातील बातम्या बघितल्यावर मात्र भाज्यांच्या ह्या चढ्या दराचा फायदा शेतकऱ्यांना अजिबात होत नसल्याचा निष्कर्ष मी काढलेला आहे व तो खरादेखील आहे. मग शेतकरी ते बाजार आणि बाजार ते ग्राहक असा शेतमालाचा प्रवास बघितला असता मग हा मूनाफा नेमका होतो तरी कुणाला व पैसे जातात तरी कुठे असा गहन प्रश्न निर्माण होतो. कांद्यासारख्या सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातल्या वस्तूने सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणल्याची सध्या ओरड सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचा दर प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांच्या मधोमध फिरत आहे. कांद्याबरोबरच इतर भाजीपाल्यांचेसुद्धा भाव वाढले आहेत. भाजीपाल्यांच्या चढ्या दराने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले असून, ओरड मात्र फक्त शेतकऱ्यांच्याच नावाने होत आहे. परंतु, शेतकऱ्याला मात्र काहीच फायदा मिळत नसल्याचे वास्तव स्वीकारण्यास आपण तयार नाही असेच दिसून येते. शेतकऱ्याकडून कमी दराने खरेदी केलेला कांदा काही दिवस साठवून उत्पन्न कमी झाल्यानंतर बाजारात आणणे व तो अवाच्या सव्वा दराने लोकांना विकणे हा एककलमी कार्यक्रम व्यापारी व दलालांचा झालेला आहे. आज व्यापारी तुपाशी तर शेतकरी उपाशी आहेत. शेतकरी कमी दर मिळत असल्यामुळे, तर ग्राहक दरवाढीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे मधल्यामध्ये हा पैसा व्यापारी व दलालांच्या खिशात जात आहे. शेतकऱ्याकडून दहा वीस रुपये किलोने घेतलेला भाजीपाला आज वीस ते पंचविस रुपये पाव ने विकला जात आहे सर्वसामान्य लोक मात्र शेतकऱ्यांच्या नावाने बोटे मोडत तो विकतही घेत आहे याला काय म्हणावे? सध्या बाजारात वांगी व्यापाऱ्याला पडतात १२ ते १५ रुपये किलो, पण बाजारात वांग्याचा दर दहा ते पंधरा रुपये पाव किलोला आहे. दुधीभोपळा व्यापाऱ्याला पडतो १० ते १२ रुपये किलो, परंतु मार्केटमध्ये दुधीभोपळा पडतो २५ ते ३० रुपये किलो, पालकाचे भाव बाजारात २५ ते ३० रुपये किलो आहेत, तर तेच पालक शेतकऱ्यांपासून व्यापारी अगदी १० ते १५ रुपये किलोने खरेदी केले जाते. मेथी ५ रुपये किलोने व्यापाऱ्यांना पडते व ग्राहकांना मेथीसाठी प्रति किलो ४० रुपये मोजावे लागतात. टोमॅटो घाऊक बाजारात १५० ते २०० रुपये कॅरेट, म्हणजे २० किलो, अर्थात ७ ते १० रु किलो आहे, परंतु किरकोळ बाजारात हा टोमॅटो ग्राहकांना ४० ते ५० रुपयांमध्ये विकत घ्यावा लागतो. फुलकोबी शेतकरी व्यापाऱ्यांना ५ ते १० रुपये किलोने विकतात, तर मार्केटमधून ग्राहक ४० रुपये किलोने घेतात. हिरव्या मिरचीचे भाव बाजारात ३० ते ४० रुपये किलो असले, तरी शेतकऱ्यांकडून मात्र व्यापारी ती १२ ते १५ रुपये किलोने विकत घेतात. अशा प्रकारची मोठी तफावत भाजीपाल्यांच्या खरेदी-विक्रीत आढळून येते. यामुळे एकीकडे महागाईच्या नावाने म्हणजेच पर्यायाने शेतकऱ्यांच्या नावाने ओरड होते आणि शेतकऱ्यांची चांगले दिवस आले असे आपण म्हणतो, मात्र खरी मजा मधले व्यापारी आणि दलालच करतात. सर्वार्थाने सजा मात्र ग्राहकाला होते. ही वस्तुस्थिती आपण समजून घेणे गरजेचे आहे. कारण आपण भाजीपाल्यासाठी मोजत असलेला चढा दर शेतकऱ्यांच्या नाही विक्रेत्यांच्या पदरी पडत आहे. या सगळ्यावर जागोजागी शेतकरी बाजार भरवणे हा चांगला पर्याय आहे, ज्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल. मात्र आज त्याबाबतीतदेखील विदारक चित्र आहे. आज बाजारपेठेत शेतकरी माल घेऊन गेला तर त्याला तेथून हुसकावून लावले जाते किंवा तेथील प्रस्थापित विक्रेते व दलाल त्याचा विविध प्रकारे छळ करून भंडावून सोडतात. याकरिता शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला आपला शेतमाल नागरी बाजारपेठांमध्ये वा हवा तिथे विकण्यासाठी सरकारी संरक्षण दिले गेले पाहिजे. तरच ग्राहक व शेतकऱ्यांमध्ये एक आपुलकीचा बॉण्ड तयार होईल व भाज्यांसाठी ज्यादा पैसे मोजल्याचे शहरी ग्राहकांना समाधान लाभेल. भाजीपाला, फळे व अन्य माल शेतकऱ्यांच्या बांधावरूनच किंवा शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करणे हा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांच्या फायद्याचा मार्ग आहे. मात्र हा मार्ग तयार होण्यासाठी दलाल आणि भाजीविक्रेते यांची अभद्र युती आणि हितसंबंध झुगारून खरेदीदारांनी शेतकरी उत्पादकांशी आपले नाते जोडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वास्तविकता उद्योगधंद्यात विविध वस्तू निर्माण करणारे उत्पादक विक्रीचा दर ठरवतात. त्यास शेतमाल अपवाद आहे. बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर दलाल, खरेदीदार शेतमालाचा भाव निश्चित करतात. नाशवंत माल परत घेवून गेल्यास संबंधित शेतकऱ्यांचेच जबर नुकसान होते, त्याचा गैरफायदा घेतल्या जातो. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही म्हणून तो आत्महत्या करतो. यामुळे शेतकरी आणि खरेदीदार यांचे नाते तयार व्हावे असे वाटते. कांदा दरवाढीवर होणारी बोंबाबोंब आणि त्यामुळे निर्यातबंदी व आयात खुली यासारखे उपाय हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आणि नैसर्गिक न्यायाविरुद्ध आहेत. ग्राहकांनी आता शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेणे गरजेचे असून स्वफायद्यासाठी तरी थेट शेतकरी ते ग्राहक बाजारपेठांची मागणी लावून धरायला हवी. साठेबाज व्यापारी व त्यांच्या दलालांपासून मुक्ती मिळण्यासाठी वाढलेल्या दरांचा शेतकऱ्यांना खरेच फायदा होतो का हे तपासायला हवे. प्रसंगी साठवून ठेवलेल्या मालाची विशिष्ट काळात चढ्या दराने विक्री होत असल्यास त्यावर बहिष्कार टाकण्याची तयारी ठेवायला हवी तरच शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे माजोड व्यापारी व विक्रेते वठणीवर येतील.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps


Comments
Post a Comment