खराखुरा नटसम्राट हरपला



मराठी चित्रपट सृष्टीचे नटसम्राट म्हणून ओळखले जाणारे श्रीराम लागू यांचे त्यांच्या ९२ व्या वर्षी मंगळवारी दुखद निधन झाले. डॉ श्रीराम लागू हे केवळ अभिनेते नव्हते तर सामाजिक भान जोपासणारे एक जेष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होते. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकीर्द गाजलीच पण हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांनी ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक गाजलेल्‍या सिनेमांमध्ये काम केलं. ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका लोकांनी डोक्यावर घेतली. त्यांनी भूमिका केलेली नाटके अजरामर झाली. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे व नाट्यरसिकांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. कृत्रिमतेचा कुठलाही लवलेश नसलेला त्यांचा सहज सुंदर अभिनय एका कसलेल्या अभिनेत्‍याचा होता. डॉ लागू यांनी १०० हुन अधिक मराठी व हिंदी चित्रपटांमध्‍ये काम केले आणि विविध भाषांमधील ४० हुन अधिक नाटकांमध्‍ये काम केले आहे. शिवाय त्‍यांनी 20 नाटकांचे दिग्‍दर्शनही केले आहे. डॉ लागू हे डॉक्‍टरी पेशात कान, नाक, घसा तज्ञ होते. आफ्रिकेमध्‍ये त्‍यांनी काही काळ प्रॅक्‍टीसदेखील केली. लमाण नावाचे त्‍यांचे आत्‍मचरित्र प्रसिध्‍द आहे. असे हे चतुरस्‍त्र व्‍यक्‍तीमत्‍व हरपल्‍याने समस्‍त मराठी नाटय व चित्रपटसृष्‍टीमध्‍ये एक पोकळी निर्माण झाली आहे. आपल्‍या अभिनयाने लाखो चाहत्‍यांच्‍या मनात अनेक दशकांपासुन घर केलेला एक महान अभिनेता व खराखुरा नटसम्राट हरपला आहे. डॉ. श्रीराम लागू यांना ह्रदयपूर्वक मानवंदना.  

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त