अवयवदानात महाराष्ट्र प्रथम
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
अवयवदानात महाराष्ट्र अवल
माणूस आपले अवयव निर्माण करु शकत नाही मात्र हेच अवयव तो दान करु शकतो. जगात अनेक लोक असे आहेत जे विविध अपघातांमध्ये अवयव निकामी झाल्याने किंवा जन्मताच अवयवांच्या अभावामुळे अत्यंत त्रासदायक व असहाय जिवन जगत आहेत. यावर उपाय म्हणून अवयव प्रत्यारोपण ही संकल्पना अस्तित्वात आली ज्यायोगे एका व्यक्तीचे अवयव दुस-या गरजवंत व्यक्तीस दान करुन त्याला जीवनदान देणे शक्य होते. कायदयानुसार मानवी अवयवांची विक्री करता येत नाही मात्र त्यांचे दान करता येते. आजदेखील आपल्या महाराष्ट्रात विविध अवयव निकामी झाल्याने हजारो लोक अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांना अवयव दानाद्वारे जगण्याची नवसंजीवनी मिळू शकते. अवयवदानानंतर मिळालेल्या अवयवाचे व्यवस्थीत प्रत्यारोपण व्हावे व त्यादरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून शासनाने त्यासाठी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आणला आहे. सन १९९४ साली 'मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा' आपल्या देशात अस्तित्वात आला व अवयव प्रत्यारोपणास कायदेशिर मान्यता मिळाली. जिवंतपणी अथवा मृत्यूनंतर अवयवदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण कायदयाने प्रतिबंधित आहे. कायदयाचे उल्लंघन झाल्यास मोठी शिक्षादेखील होते. त्यामुळे अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया कायदेशिररित्या पार पाडावी लागते. त्यामुळेच ह्या सर्व प्रक्रियेवर शासकीय नियंत्रण स्थापित आहे. शासनाचा आरोग्य विभाग अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेत व कायदयाची अमंलबजावणी करण्यात मोठी भूमिका बजावत आहे. याच अवयवदान प्रक्रियेत उत्तुंग कामगिरी केल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अवयवदानाच्या चळवळीला राज्यात मोठे यश मिळत असून राज्याने यावर्षी अवयवदानामध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेने (नोटो) १० व्या भारतीय अवयदान दिनानिमित्ताने शनिवार, ३० नोव्हेंबर २०१९ रोजी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याला अवयवदानामध्ये ‘उत्कृष्ट राज्य’ पुरस्काराने सन्मानित केले. याप्रसंगी राज्यातील 'रोटो-सोटो'च्या (पश्चिम विभागीय) संचालक डॉ. लोबो गाजिवाला आणि राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सहाय्यक संचालक डॉ अरुण दिनकरराव यादव हे अधिकारी उपस्थित होते. राज्यभरात सर्वाधिक अवयवदान मुंबईमध्ये होत असून त्याखालोखाल पुण्यामध्ये केले जाते. त्यामुळे अवयवदानात राज्यात मुंबई प्रथम तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील या विशेष कार्यक्रमाप्रसंगी १९९७ पासून अवयवदानासाठी काम करणाऱ्या पुण्याच्या अवयव प्रत्यारोपण समन्वयिका सुरेखा जोशी यांचादेखील बेस्ट ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर म्हणून गौरव करण्यात आला. नोव्हेंबर २०१८ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीतील आकडेवारीनुसार केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राला हा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्यानुसार शरीरातून एकूण ४४६ अवयव प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. इतर राज्यांतून प्रत्यारोपणासाठी आलेले अवयव धरून एकूण ४४९ अवयव या कालावधीत प्रत्यारोपित करण्यात आले. यात ब्रेनडेड झालेल्या १५३ रुग्णांनी अवयवदान केलेले आहे. गेल्या वर्षभरात अवयवदान जनजागृतीसाठी १५३ कार्यक्रम विविध संस्थांच्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत. राज्यातील अवयवदात्यांच्या संख्येमध्ये गेल्या पाच वर्षांत ६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यात मुंबईचा मोलाचा वाटा असून शहरात यावर्षी ७० हून अधिक दात्यांनी अवयवदान केले आहे. राज्यात अवयवदानाच्या जनजागृतीची मोहीम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अवयवदात्यांची संख्या वाढली असल्याने अवयवप्रत्यारोपणाच्या संख्येतही नोंद घेण्याइतपत वाढ झाली आहे. राज्यात सन २०१५ मध्ये ५८ दात्यांनी अवयवदान केले होते. या आलेख वर्षांनुगणिक उंचावत गेला असून नोव्हेंबर २०१९ पर्यत १४५ दात्यांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला आहे. या वर्षभरात दात्यांकडून प्राप्त झालेल्या ४०० हून अधिक अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची संख्या सर्वाधिक असून त्याखालोखाल यकृत, हृदय आणि फुप्फुस यांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. दिल्लीत झालेल्या ह्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात नागपूरच्या रिवयानी रहांदळे या सहा वर्षांच्या मुलीच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. अपघातामध्ये रिवयानीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. मुंबईतील ३ वर्षांच्या मुलीमध्ये रिवयानीचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले. तिचे मूत्रपिंड नागपूरमधील १४ वर्षांच्या मुलामध्ये प्रत्यारोपित केले आहे. यकृतही नागपूरच्या एका गरजू रुग्णाला दान केले आहे. तिच्या चिमुकल्या डोळ्यांनी दोन जीव हे जग पाहू शकतात. रिवयानीच्या पालकांनी जगापुढे आदर्श निर्माण केला असून त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. आपल्या समाजात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहन वा दफन विधींची परंपरा असून अवयवांशिवाय हे विधी अनिष्ट मानण्याची प्रथा आजही काही ठिकाणी मानली जाते. पण मृत्यूनंतर मानवासाठी निरुपयोगी ठरणारे हे अवयव अनेकांना जगण्याचे बळ व संजीवनी देऊ शकतात हि गोष्ट समाजमनात रुजवणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन ठिकठिकाणी अवयवदानाबद्दल लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. एकेकाळी 'रक्तदान केल्याने शरीरातील रक्त कमी होते, अशक्तपणा येतो' हा समज होता. कालांतराने लोकांच्या मनातून हा गैरसमज निघून गेला व रक्तदानाने निर्माण झालेली रक्ताची उणीव मानवी शरीरात अल्पावधीतच भरून निघते हि समज आल्यामुळे आज अनेक रक्तदाते पुढे येतात. त्याचप्रमाणे अवयवदानांबद्दल समाजात असलेले गैरसमज दूर झाले पाहिजेत व अवयव दानासाठी लोक स्वतःहून पुढे आले पाहिजेत. कारण आज विविध मानवी अवयवांची गरज असलेले व अनेक व्यंग असलेले रुग्ण अवयवांविना समाजात वावरू शकत नाहीत, गरज आहे ती त्यांना जगण्याचे शारीरिक बळ देण्याची. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानाचा वसा स्वीकारणे गरजेचे आहे. अनेक गरजू रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत असून एका व्यक्तीच्या अवयवदानाच्या निर्णयाने अनेकांच्या जीवनात पालवी फुटू शकते. त्यामुळेच अवयवदान हे जीवनदानच आहे. माणसाचे अनेक अवयव मेल्यानंतरही इतरांच्या कमी येतात. 'मरावे परी अवयवरूपी उरावे' ही उक्ती म्हणूनच माणसाला दानाकडून कृतज्ञतेकडे घेऊन जाणारी आहे. त्यामुळेच मेल्यावरही जिवंत राहायचे असेल तर अवयवदानासारखा श्रेष्ठ निर्णय नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment