सावधान, इंटरनेटचे व्यसन वाढतेय
आज आपल्या अवतीभवती जर आपण पाहिले लहान मुलांपासुन जेष्ठांच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याचे दिसुन येते. इंटरनेटच्या मायाजालात अवघा देश गुंतला असल्याचे आपणास पाहायला मिळते. दररोज मोफत इंटरनेट सेवा पुरविणा-या कंपन्यांमधील चढाओढ व ते इंटरनेट वापरण्यामधील लोकांची चढाओढ यातच सर्वांचा अधिक वेळ खर्ची होत आहे. मात्र वेळ वाया जाण्याव्यतिरीक्त मोबाईल व इंटरनेटचा सर्वात जास्त परिणाम लोकांच्या मानसिक व शारीरीक आरोग्यावर होत आहे. मोबाईल व घरगुती इंटरनेटच्या वाढत्या प्रमाणामुळे 'इंटरनेट अॅडिक्शन' अर्थात 'इंटरनेट'चे व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे. या व्यसनाधीनतेचा प्रत्यक्ष संबंध मेंदूमधील रसायनांचे प्रमाण बिघडण्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंटरनेट सायबर कॅफेच्या मर्यादीत वापराऐवजी मोबाईलमध्ये व घरोघरी इंटरनेट घेण्याचा कल वाढत आहे. इंटरनेटचा वाढता वापर चिंतेत भर घालणारा असून, कम्प्युटर, मोबाईल अथवा तत्सम इंटरनेट पाहण्याच्या साधनांच्या प्रमाणाबाहेर वापराने चिडचिड, अतिताण आदी विकार जडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन चार वर्षांपुर्वी प्रतिदिन तीन चार तास ब्राउजिंग करणारी शाळा, महाविदयालयीन मुले आज इंटरनेटच्या चक्रव्युहात पुरती अडकली असुन त्यांना आज 'इंटरनेट'चे व्यसन लागले आहे. या व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ती पुरती अडकली आहेत. जिज्ञासेपोटी लागलेल्या आवडीचे रूपांतर हळूहळू व्यसनात झाल्याने अनेक तरुण मानसिक आजरांकडे झुकत असल्याचे चिंताजनक चित्र सर्वत्र आहे. सामान्यत: प्रत्येकाला 'इंटरनेट'ची गरज भासते. मात्र, नोकरी अथवा उद्योगधंद्याच्या निमित्ताने वयाच्या विशीत अथवा तिशीत हे व्यसन लागण्याचे प्रमाण अधिक आहे.


Comments
Post a Comment