महत्व नाताळचे
नाताळ अर्थात ख्रिसमस हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिन म्हणून २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. भारतातदेखील या सणाचा उत्साह अगदी शिगेला असतो. शाळा महाविदयालयांना या काळात अल्पकालीन सुटटया जाहीर केल्या जातात. बहुतांश शाळांमध्ये तर विदयार्थ्यांसह हा सण मोठया जल्लोशात साजरा केला जातो. वेगवेगळी शुभेच्छापत्रे, भेटवस्तू एकमेकांना देऊन या सणात परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. रोषणाई करून या काळात आपापल्या घरांना सजवण्याची प्रथा आहे. सूचिपर्णी हे झाड ख्रिसमस वृक्ष म्हणून सजवले जाते. रात्री सांताक्लॉज ही काल्पनिक व्यक्तीरेखा याच दिवशी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू वाटत असतो असा जनमानसात समाज प्रस्थापित आहे. यामुळेच लहान मुलांना या काळात भेटवस्तुंचे विशेष आकर्षण असते. शहरातील मॉल, बाजारपेठांमध्ये ख्रिसमस काळात सजावट, सेल व विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. असे असताना बहुतेक जण हा येशू नावाचा व्यक्ती कोण आहे आणि त्याचा जन्मदिन का साजरा केला जातो याबाबत अनभिज्ञ असतात. काहींच्या मते येशू हे एक समाजसुधारक होते, ते एक तत्त्वज्ञानी होते, ते एक यहूदी शिक्षक होते, किंवा येशू हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक आहेत इत्यादी मते समाजात आहेत. या जगाला पापमुक्त करण्यासाठी परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगात पाठवले त्या पुत्राचे नाव होते येशू . याबाबत अनेक आख्ख्यायिका प्रसिध्द आहेत. बायबलमध्ये ख्रिस्ती लूक आणि संत माँथु दोन्ही येशू ख्रिस्ताच्या जन्माचे संदेश देतात. बायबल नुसार जुडियाच्या बेथलेव्हेंम या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. एका गोठयात येशूख्रिस्ताचा जन्म झाला. संत माँथु यांच्या मतानुसार तीन महाराज येशूला ख्रिस्ताला भेटायला गेले होते. तसेच त्यांनी येशूला भेटवस्तू दिल्या. त्यावेळीच्या राजा हेरॉडने मात्र येशूच्या जन्माचा संदेश मिळताच सगळ्याच दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. या आदेशामुळे येशूचे कुटुंबिय ईजिप्तला गेले होते. प्रभू येशू यांचा जन्म योगायोगाने झाला नसून त्याचे पूर्व भाकीत करण्यात आले होते. मरिया नामक एका इस्त्राएली कुमारिकेच्या पोटी येशूचा जन्म झाला. आणि या जन्मामुळेच आपली दिनदर्शिका इसविसन आणि इसविसनपूर्व अशी दोनभागात विभागलेली आहे. येशूने दिलेली शिकवण अद्वितीय होती. त्या दिवसांतील लोक त्यांची शिकवण ऐकून आश्चर्यचकित झाले होते आणि आजही होत आहे. तेव्हापासून आजतागायत अनेकजण त्यांच्या शिकवणीमुळे प्रेरणा घेत आनंदी जिवन जगत आहेत. इतरांना क्षमा करा, जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल करा. तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रेम करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका ही शिकवण येशुंनी दिली. प्रभू येशूने त्यांच्या सेवाकार्याच्या दरम्यान अनेक आजारी लोकांना बरे केले, नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पीडलेले, भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती, अशा सर्वांना त्यांनी बरे केले. असे असताना प्रभू येशूला नैसर्गिक मरण आले नाही. इझ्राएल देशातील यहूदी पुढाऱ्यांनी त्यांच्यावर चुकीचे आरोप ठेऊन रोमी शासकातर्फे वधस्तंभावरचे क्रूर मरण सोसण्यासाठी रोमन सैनिकांकडे सोपवून दिले. वधस्तंभावार मरण पावल्यावर त्यांचा देह एका कबरेत ठेवण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी ते मरणातून उठले. मरण सोसल्यानंतरही त्यांनी त्यांच्या शिष्यांना आपण जिवंत आहोत हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत ते त्यांना दर्शन देत राहिले व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. ते मरणातून उठल्यानंतर पाचशे पेक्षा अधिक लोकांना दिसले, आणि मग त्यांच्या अनुयांच्या डोळ्यांदेखत स्वर्गात गेले. आजच्या काळात नाताळच्या सणाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. नाताळ च्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. दुकानदारांच्या व अन्य विक्रेत्यांच्या दृष्टीने या काळात व्यावसायिक पर्वणी असते. लहान मुलांना हा सण खूप आनंद देऊन जातो. शाळा, मॉलसारख्या ठिकाणी लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेशात भेटवस्तू दिल्या जातात. या दिवशी भारतात शाळा, कार्यालयांना सुट्टी दिली जाते. ख्रिस्ती बांधव आपापली घरे सजवतात आणि गोड पदार्थ आणि खाण्याच्या पदार्थांच गरिबांना वाटप करतात. या दिवसाला भारतात बिग डे असेही संबोधले जाते. इंग्रजी कॅलेंडर नुसार २१ डिसेंबर हा दिवस संपूर्ण वर्षातील सर्वांत छोटा दिवस असतो. तसेच रात्र मात्र मोठी असते. त्यानुसारच नाताळ म्हणजेच २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने बरीच मोठी असते. हि रात्र मोठी असल्यामुळे या रात्री मेणबत्त्या पेटवून, आनंदोत्सव साजरा केला जातो. ख्रिसमसचा सण जगात बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही अनुयायी व काही पंथ हा आनंदोत्सव मात्र २५ डिसेंबरच्या सायंकाळी साजरा करतात. काळोख म्हणजे अंधार हा माणसाला भीतीदायक वाटत असतो जसं काही तो आपला शत्रू आहे. अशा अंधाराला दूर करण्यासाठीच मेणबत्या लावण्याची प्रथा आहे. नाताळला आजकाल धार्मिकते सोबत सामाजिक महत्वही प्राप्त झाले आहे. नाताळच्या दिवशी गोड पदार्थ बनवून वाटले जातात. विविध सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमांची रेलचेल सर्वत्र असते. ज्या प्रमाणे दिवाळी, दसरा, होळी, गणेश उत्सव इत्यादी सणांचे महत्व हिंदू धर्मात आहे त्याच प्रमाणे नाताळ व ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा मुख्य सण आहे. म्हणूनच भगवान येशुंचे अव्दितीय कार्य व जीवन अधोरेखीत करणारा नाताळ हा सण पवित्र व आनंदाचा आहे.

Comments
Post a Comment