उर्वरित साडेतीन लाख खातेदारांचे काय?
आर्थिक घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या पीएमसी बँकेचा मुद्दा सोमवारी लोकसभेत चर्चिला गेला. पैसे बुडतील या मानसिक धक्क्याने बँकेतील डझनभर खातेदारकांचे झालेले मृत्यू व इतर खातेधारकांच्या अडचणीत होत असलेली वाढ पाहता खासदारांनी त्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. त्यावर उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या बँकेतील खात्यातून प्रति खातेधारकास 50 हजार रुपयांपर्यंत काढण्याची मर्यादा वाढवली असून त्याद्वारे बँकेतील 78 टक्के खातेदार स्वतःची पूर्ण रक्कम काढू शकणार असल्याचे स्पष्टीकरण दिले ते सध्याच्या विपरीत परिस्थितीला अनुरूप नाही. 50 हजारांच्या आत 78 टक्के खातेधारकांच्या ठेवी बँकेत जमा असल्या तरी बँकेतील एकूण ठेवींच्या 90 टक्क्यांपर्यंत ठेवी ह्या उर्वरित 22 टक्के लोकांच्या आहेत ज्यामध्ये सर्व स्तरांतील ठेवीदारांचा समावेश आहे हे वास्तव सोयिस्कररित्या लपवण्यात येत आहे. आज शहरी भागात वास्तव्य करणारे अगदीच सर्वसामान्य लोकदेखील किमान लाखभर रुपये तरी बचतीच्या रुपात बँकेत गुंतवतात. त्यामुळे सोळा लाख खातेधारक असलेल्या ह्या बँकेतील जवळपास साडेतीन लाख खातेदारांची स्वकष्टाची कमाई आज या बँकेत अडकून आहे याचा विचार व उल्लेख अर्थमंत्र्यांनी करायला हवा होता. टक्केवारीचे गणित समजावून त्यांनी लोकसभेचे समाधान केले खरे पण खरे वास्तव नाकारून सत्य लपत नाही. मानसिक धक्क्याने मृत्युमुखी पडलेले या बँकेचे खातेधारक आपल्या आयुष्यभराची लाखो रुपयांची कमाई या बँकेत गुंतवलेले ग्राहक होते. पाच पन्नास हजारांची ठेव असणारे खातेदार आज या बँकेतून आपली रक्कम काढून मुक्त होतीलही पण मानसिक तणावात वावरत असलेल्या इतर लाखो ठेवीदारांचे काय ? या प्रश्नाचे उत्तर अर्थमंत्र्यांनी दिले तर बरे होईल. लाखो - कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवणाऱ्या लोकांबद्दल सरकार संवेदनशील आहे का हाच मुद्दा आहे. पैसे कितीही असो, सहकारी बँकेतील ठेवी हा काही काळा पैसा नाही, ती सर्वसामान्यांची गरजेच्या वेळेस उपयोगी पडणारी पुंजी असते. त्यावर डल्ला मारणाऱ्या बँकांना धडा शिकवणे सरकारचे काम असून सामान्य खातेधारकांना त्यांची मिळकत मिळवून देणे देखील सरकारचेच काम आहे. बँकेत गुंतवलेल्या कमाईवर आयकर व इतर कर भरणाऱ्या खातेधारकांना बँकेच्या चुकीची शिक्षा भोगायला लावणे कितपत योग्य आहे याचा विचार अर्थमंत्र्यांनी करायला हवा. जी तत्परता त्यांनी लोकसभेत यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना दाखवली तितकीच संवेदनशीलता या बँकेतील उर्वरित साडेतीन लाख खातेधारकांच्या बाबतीत दाखवली तर बरे होईल.


Comments
Post a Comment