स्वागत नव वर्षाचे
इंग्रजी नववर्षाच्या स्वागताला सर्वत्र मोठ्या जोशात तयारी सुरू झाली आहे. समुद्रकिनारे व महत्वाची देवस्थाने- पर्यटनस्थळे ऍडव्हान्स बुकिंगने हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरेतर लोकांना नववर्षाच्या स्वागतापेक्षा मौज मजा व पर्यटनासाठी 31 दिसेम्बर म्हणजे एक हक्काचा उत्सव आहे असेच वाटत असल्याचे दिसून येत आहे. एरव्ही हिंदू नववर्ष सुरू होणाऱ्या दिवशी इतका उत्साह न दाखवणाऱ्या मुंबई महाराष्ट्रातील हौशी मंडळींचा अत्यानंद 31 डिसेंम्बरचे निमित्त साधून मात्र ओसंडून वाहताना दिसतो. अनेक पर्यटन स्थळे व हॉटेल्समध्ये तर मद्यपान करणाऱ्यांसाठी विशेष सरबराई असते. दारू व जेवणासाठी अनेक आकर्षक ऑफर्स देऊन लोकांना आकर्षित करण्यामागे सर्व हॉटेल व्यावसायिक व इव्हेंट मॅनेजर आघाडीवर आहेत. 31 डिसेंम्बरच्या मागेपुढे दोनचार दिवस पोलीस व सुरक्षा यंत्रणांना अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून खडा पहारा द्यायला लावण्यात कोणता शहाणपणा आहे समजत नाही. गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी नववर्षाची ही सुरुवात केवळ नशाबाजी, धांगडधिंगा व गुन्हेगारीचे स्वरूप असलेली बनत चालल्याने सुसंस्कृत मंडळी यापासून चार हात लांबच राहणे पसंद करतात. ख्रिसमस व 31 डिसेंबरला शिगेला पोहोचलेला हा उत्साह हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला मात्र कुठे असतो कुणास ठावूक ? रात्रभर मद्यपान करून नवीन वर्षाच्या पहाटे धुंद अवस्थेत उशिरापर्यंत कोलमडून राहणे हे कसले स्वागत ? आजकालचे लोक पुढारलेत पण सुसंस्कृतपणा लोप पावत चाललाय हेच खरे !!

Comments
Post a Comment