आरोग्य अधिकारी - कर्मचारी "योग"मय

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयुष विभागामार्फत आरोग्य भवनमध्ये योग प्रशिक्षण वर्ग




                                  प्राचीन काळी ऋषी मुनींनी अध्‍यात्मिक व आरोग्‍यविषयक संशोधनाचे एक शास्‍त्र निर्माण करुन त्‍याला योगशास्‍त्र हे नाव दिले. योग ही शरीराला संतुलित व प्रसन्‍न ठेवण्‍यासाठीची एक क्रिया आहे. आपण आपल्‍या शरीराकडे वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. हे टाळून निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग्य व्यायाम व आहार महत्वाचा ठरतो. योग ही क्रिया शरीराचे व मनाचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळेच सुदृढ आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने योगाचे महत्‍व आपल्‍या जिवनात अनन्‍यसाधारण आहे असे म्हटल्यास ते अजिबात वावगे नाही. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे असे म्‍हटले जाते. जागतिक स्तरावर योगाचा प्रसार अधिक वेगाने फोफावल्याने अनेक परदेशी नागरिक या क्रियेकडे वळू लागले आहेत. आपल्‍याला जडणा-या बहुतांशी व्‍याधींवर एकमेव, प्रतिबंधात्‍मक, कमी खर्चिक, घरात कार्यालयात बसल्‍याबसल्‍या करता येण्‍याजोगा, मनोबल-आत्‍मविश्‍वास-व्‍यक्‍तीमत्‍व विकास वृध्‍दंगत करणारा इलाज म्‍हणजे योग. यासाठीच आरोग्य विभागाचे राज्यस्तरीय मुख्यालय असलेल्या आरोग्‍य भवन मधील अधिकारी कर्मचा-यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुष विभागाच्या माध्यमातून योग प्रशिक्षण वर्ग सुरु करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला व गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2019 रोजी याचे औपचारिक उदघाटन आरोग्य भवनच्या टेरेसवरील सायंकाळच्या आल्हाददायक वातावरणात मान्यवरांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी आरोग्य सेवा आयुक्त डॉ अनुप कुमार यादव, आरोग्य संचालिका डॉ साधना तायडे, डॉ अर्चना पाटील, अतिरिक्त अभियान संचालक डॉ सतीश पवार, सहसंचालक डॉ विजय कंदेवाड, डॉ नितीन अंबाडेकर, श्री संजय पतंगे, अधीक्षक अभियंता श्री विलास कांबळे, कैवल्यधाम ह्या जगप्रसिद्ध योग प्रशिक्षण संस्थेच्या संशोधन विभागाचे सहाय्यक संचालक व योग सल्लागार डॉ सतीश पाठक, सहायक संचालक डॉ सुभाष घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी योगाच्या माध्यमातून अनेक व्याधींवर मात करणे शक्य असून अधिकाअधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी ह्या योग प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन मा डॉ अनूप कुमार यादव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधीक्षक श्री विजय बोरसे यांनी केले. पहिल्याच दिवशी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्यासाठी आरोग्य भवन मधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेत्रस्‍नान, ब्रम्‍हमुद्रा, नमनमुद्रा, योगमुद्रा, जलनेती, जलधौती, कपालभाती, उज्‍जायी , शीतली, वायुसार, अग्‍नीसार, उछदीयान, नौली, नौलीचालन, शंखप्रक्षालन, प्राणधारणा, क्रियायोग, ओम, गायत्री, आसन, षटच्रक्र, शवासन, त्राटक, वज्रासन, पदमासन ह्या योगशास्त्रीय प्रकरांची माहिती या प्रशिक्षनादरम्यान प्रात्यक्षिकांसह मिळू शकणार आहे. ह्रदयरोग, अॅसीडीटी, मनोविकार, जडत्‍व, मुतखडा, असथमा, उच्‍चरक्‍तदाब, बध्‍दकोष्‍ठता, मधुमेह, सर्दीपडसे, पाठदुखी यांसारख्‍या आजारांवर योगाचे उपयुक्‍त प्रकार प्रशिक्षणार्थींना शिकायला मिळतील. मुंबईसारख्या शहरात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे योग प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. योगासनांसारख्‍या सोप्‍या व कधीही - कुठेही करता येणा-या उपायांनी औषधोपचारावरील बराचसा खर्च टाळता येतो व मनशांतीदेखील प्राप्‍त होते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी योगाच्या माध्यमातून आपले शरीर व मन संतुलित राखण्याचा प्रयत्न करायला हवा. 


वैभव मोहन पाटील
















Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा