चिन्मय मिशनची गीता चांटिंग स्पर्धा
गीतेच्या प्रसारासाठी चिन्मय मिशनचे कार्य कौतुकास्पद
आज ८ डिसेंबर, गीता जयंती. श्रीमदभगवतगीतेचा प्रसार सर्वदूर व्हावा व शालेय मुलांमध्ये गीतेबद्दल रुची निर्माण व्हावी म्हणून गेल्या काही वर्षांपासून अध्यात्मिक सेवेतील 'चिन्मय मिशन' ही अग्रगण्य संस्था विविध उपक्रम राबवित आहे. सन 2001 सालापासून शालेय मुलांच्या गीता पठणाच्या स्पर्धा ह्या संस्थेमार्फत घेण्यात येतात. दरवर्षी साधारणतः जून महिन्यामध्ये गीतेचा एक अध्याय निवडून मुलांच्या इयत्तांनुसार व वयोगटानुसार त्यातील श्लोक पाठांतरासाठी पुस्तकासह देण्यात येतात. सप्टेंबर महिन्यात स्पर्धेचा प्रथम राऊंड शाळांमध्येच घेण्यात येतो व फायनल राऊंडसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर अंतिम स्पर्धा नोव्हेंबर - डिसेंम्बर महिन्यात चिन्मय मिशन केंद्रांवर घेतल्या जातात. नवी मुंबई विभागासाठी यंदा पहिलीत शिकणारी माझी मुलगी तनिषा हिचादेखील प्रथमच सहभाग नोंदवला होता व काही दिवसांतच ती गीतेच्या अठराव्या अध्यायातील दहा श्लोक ती आम्हालाही न जमतील अशा उच्चारांत अगदी अस्खलितपणे बोलू लागली. अपेक्षेप्रमाणे तिची फायनलसाठी निवडदेखील झाली आणि काल शनिवार ७ डिसेंबर रोजी खारघर येथील चिन्मय मिशनच्या केंद्रावर या अंतिम स्पर्धा पार पडल्या ज्यात विविध वयोगटातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील लहानग्या मुलांची गीता पाठांतर व ती बोलण्याची कला थक्क करणारीच होती. वयाची मर्यादा नसलेल्या खुल्या गटातील स्पर्धकांसाठीदेखील गीतेचे श्लोक सादर करण्याची संधी दिली गेली. चिन्मय मिशनच्या हा उपक्रम निश्चितच अत्यंत कौतुकास्पद असून मुलांमध्ये श्रीमदभगवतगीतेची आवड जोपासन्यासाठी असे उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरतील असे मत आहे. आज गीतेचे अध्याय पाठांतर करणाऱ्या शालेय मुलांना एक ना एक दिवस त्यातील वचनांचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होईल असा आशावाद पालकांसमोर मिशनचे अनुयायी व्यक्त करतात. सन 1953 साली स्वामी चिन्मयानंद यांनी स्थापन केलेल्या चिन्मय मिशनचा आज वटवृक्ष झालेला असून विविध ठिकाणी या मिशनच्या स्थापित शेकडो शाखा, समाजातील सर्व स्तरांतील आबालवृद्धांसाठी धार्मिक व समाजोपयोगी उपक्रमात व्यस्त आहेत. मुलीच्या गीता चांटिंग स्पर्धेच्या निमित्ताने आज चिन्मय मिशनचे कार्य जवळून अनुभवता, पाहता आले. मुलांची स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी पालकांचा देखील स्वतंत्र वर्ग घेत अनेक उपयुक्त टिप्स दिल्या. आज विविध राष्ट्रीय - आंतराष्ट्रीय बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमातील व्यस्ततेमध्येदेखील गीतेसारख्या जीवनाचे सार सांगणाऱ्या विषयाकडे मुलांचे लक्ष केंद्रित करू पाहणाऱ्या चिन्मय मिशनच्या कार्यास प्रणाम व मनःपूर्वक शुभेच्छा ||
वैभव मोहन पाटील








Comments
Post a Comment