मुंबईवर आदळणारे लोंढे थोपवा
मुंबईवर आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे पहायचे असतील तर रोज सकाळी मुंबईबाहेरून भरभरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या पहाव्यात. इतक्या अतिप्रचंड संख्येत मुंबईत होत असलेले स्थलांतर भविष्याच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. याचा थेट परिणाम उद्या येथील नागरी सुविधांवर होणार आहे. हजारोंच्या संख्येने बाहेरील राज्यांमधील लोक आज मुंबई शहरात नोकरी धंद्यांच्या शोधात येत आहेत ज्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. मुंबई हे सर्वधर्मीय लोकांचे वास्तव्य असलेले शहर आहे असे अनेकदा अभिमानाने म्हटले जाते मात्र मूळचे महाराष्ट्रातील व मराठी नागरीकांच्या या शहरात इतर भाषिकांचे अतिक्रमण तरी कीती व्हावे याला काही मर्यादा असाव्यात की नाही? साहजिकच या गर्दीचा सर्वात जास्त भार रेल्वेसेवेवर पडतो जी मुंबईत सर्वात स्वस्त व जलद वाहतुकीचा मार्ग समजली जाते. पूर्वी केवळ नऊ डब्यांच्या चालवल्या जाणाऱ्या लोकल वाढती गर्दी पाहता कालांतराने बारा डब्यांच्या झाल्या व आता तर पंधरा डब्यांच्या लोकलदेखील वाढत्या गर्दीला कमी पडू लागल्या आहेत. इतकी गर्दी या शहरात स्थलांतरित होतेय पण कुणालाही त्याची तमा नाही. लोंढे थोपवण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना नाहीत. भविष्यात या गर्दीचा आगडोंब उसळणार व सुरक्षित समजले जाणारे हे शहर अराजकतेकडे झुकत जाणार हे माहीत असतानादेखील त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कुणी पुढाकार घ्यायला तयार नाही. नायजेरियन व बांग्लादेशीना ज्याप्रमाणे शोधून काढण्यासाठी मोहीम राबवली जाते त्याप्रमाणे परप्रांतीयाना या शहरात वास्तव्यासाठी अधिकृत परवाना देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आज या शहरात कुणीही येते व कुठेही बिनदिक्कत वास्तव्य करतेय. यामुळे स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पपीडित हे देखील हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबईसारख्या जवळच्या शहरात राहायला व नोकरी धंद्यासाठी वाव मिळत नाही ही परिस्थिती विदारक अशीच आहे. परप्रांतीयांचे मुंबईवर दररोज आदळणारे लोंढे थोपवण्यासाठी ठोस प्रयत्न कधी होणार ?

Comments
Post a Comment