आरोग्यमंथन - सर्दी

सर्दी
वातावरणात झालेले बदल, संसर्ग अथवा दुषीत पाणी प्‍यायलाने उदभवणा-या नि‍रनिराळया त्रासांपैकी एक म्‍हणजे सर्दी. सर्दी हा नाक, घसा, श्वासनलिका ह्या सर्वांवर परिणाम करणारा एक सर्वसामान्य संसर्गजन्य विषाणू आहे. मात्र सर्दीने डोके वर काढले की हळूहळू इतर विकारदेखील शरीरात घर करु लागतात. ज्या विषाणूंमुळे सर्दी होते त्‍याला आपण व्हायरल इन्फेक्शन असे म्‍हणतो असे २०० पेक्षा जास्त विषाणू असतात. सर्दीचे जंतू खूपच संसर्गजन्य असतात. जेव्हा सर्दी झालेला एखादा माणूस खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ह्या जंतूंचा हवेतून प्रादुर्भाव होतो. हा प्रादुर्भाव सर्दी झालेल्या माणसाचा रुमाल, टॉवेल वापरल्याने आणि त्या माणसाच्या जवळपास वावरल्याने सुद्धा होतो. सर्दी ही कुणालाही कुठल्याही वयात होऊ शकते. परंतु लहान मुलांमधे त्याचे प्रमाण जास्त दिसते. ह्याचे कारण म्हणजे मोठ्या माणसांची प्रतिकार शक्ती ही लहान मुलांपेक्षा प्रबळ असते. 
धूर, धूळ, फुलांचे परागकण, डस्ट इत्यादींच्या अ‍ॅलर्जीमुळे शिंका येतात व सर्दी होते. यावेळी शिंकांचा त्रास फार होतो. नंतर नाक वाहायला म्हणजे सर्दीची सुरुवात होते. पुढे चालून डोकेदुखी होते. काही रुग्णांमध्ये श्वास घ्यायला त्रास होतो. नाक ब्लॉक होते व श्वास घेता येत नाही. अशी लक्षणे उत्पन्न होतात. वारंवार सर्दी होऊन याचेच रूपांतर भयानक अशा ‘दमा’ या आजारात होऊ शकते. 
सर्दी, या जास्तीत जास्त आढळणा-या आजाराने प्रत्येक मानवाला कधी ना कधी, कमी जास्त प्रमाणात ग्रासलेलं असतंच. सर्दी झाली की आपण त्‍यावर वेगवेगळे उपाय शोधू लागतो. अगदी डॉक्‍टरी इलाजापासुन ते घरगुती उपाय करण्‍यापर्यंत आपण सर्व पर्याय वापरतो. मग त्‍यावरील औषधे, गोळया, काढे, विक्‍स यासारखे उपचार आपल्‍या आयुष्‍यात अगदी सर्वसामान्‍य होऊन गेलेत. सर्दी झाली की काढा करुन पिणे  सर्वात सोपा व सोयीस्‍कर उपाय. या काढ्याचं स्वरूप साधारण असं असतं की,पाणी घेऊन त्यात धने, जिरे, पाती चहा, थोडी मिरी या गोष्टी उकळवायच्या आणि गरम गरम प्यायचा. या उपायानंतर फरक पडायला दोन दिवस जातात पण सर्दी प्रदीर्घ काळासाठी बरी होते. गरम पाणी विथ लिंबू - हे सतत, म्हणजे अक्षरशः कंटाळा आला की घेत रहावं. लिंबू सी विटॅमिन पुरवतं, प्रतिकारशक्ती वाढते, सर्दी बरी होते. 
सर्दीमुळे डोकं धरलं की कपाळालं वेखंड लावणे हा उपायदेखील ब-याचदा केला जातो. कपाळाला, छातीला गरम गरम चटके लागत वेखंड लावावं. सर्दी पूर्णपणे खेचून घेतं. आराम मिळतो. सर्दी ज्या जंतुंमुळे होते त्याला हायनोव्हायरस म्हणतात. हा जंतु श्वासातून आणि हवेतूनच पसरत असल्यामुळे सर्दीची लागण गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त होते. गर्दीतून लोकल मधून किंवा बस मधून प्रवास करत असताना, किंवा लहान मुलांच्या प्ले-ग्रूप सेंटरमधे, शाळांमधे, पाळणाघरांमधे जास्तीत जास्त लागण होताना दिसते. सर्दी झालेल्या व्यक्तीने वापरलेला नॅपकिन, टॉवेल, पाण्याचा ग्लास ह्या गोष्टीतून हा जंतु पसरतो. तसेच सर्दी झालेली व्यक्ती फोनवर खूप वेळ बोलत असेल आणि आपण त्याच फोन वर लगेच बोलायला लागलो तरीही सर्दीचा प्रसार होऊ शकतो. त्‍यामुळे हा संसर्ग टाळण्‍यासाठी आवश्‍यक प्रतिबंधात्‍मक काळजी आपण घेतलीच पाहीजे. एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीला सर्दी होऊ नये ह्यासाठी काळजी घ्यायचे अनेक मार्ग असतात. डॉक्टर्स असेही सांगतात ’क’(सी) जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे सुद्धा सर्दीची लागण लवकर होते. ’क’(सी) जीवनसत्त्व सर्दीची लागण होण्यापासून आपल्याला दूर ठेऊ शकते. आपल्याला झालेली सर्दी इतरांपर्यन्त न जाण्यासाठी शिंकताना वा खोकताना तोंडासमोर रुमाल धरा. अधुन मधुन साबणाने स्वत:चे हात धुवा. दुस-या व्यक्तीशी खूप जवळून बोलायचे टाळा. निरोगी माणसांनीसुद्धा सर्दीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काळजी घ्यायला हवी. घरातल्या कुणाला जर सर्दी झाली असेल तर त्याच्या पासून थोडे अंतर ठेवलेलेच बरे. तसेच अशा घरातल्या निरोगी माणसांनी सुद्धा सर्दीची लागण न होण्यासाठी अधुन मधुन स्वत:ची हात साबणाने धुवावेत. सर्दीची लागण लहान मुलांना होऊ नये म्‍हणून विशेष दक्षता घेणे गरजेचे असते. कारण लहान मुलांना संसर्ग लगेच पकडतो व बरा होण्‍यास फार विलंब लागतो. सर्दी झाल्यास रात्री झोपण्यापुर्वी गरम दूधात हळद घालून प्या. सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. मात्र त्यानंतर थंड पाणी पिऊ नका. सर्दीत वेलचीच्या सेवनानेदेखील  आराम मिळतो. लसुणदेखील खुप आरोग्‍यवर्धक आहे. लसणाच्या पाकळ्यांची साल काढून त्या बारीक करून घ्या. त्यानंतर त्या पाण्यात घालून उकळा. पाणी नीट उकळल्यानंतर ते गाळून प्या. आलं आणि लिंबाचा चहादेखील सर्दीवर गुणकारी आहे. एक कप पाण्यात आलं, काळीमिरी, लवंग घालून उकळा. त्यात अर्धा लिंबू पिळा. हा चहा दिवसातून कमीत कमी तीनदा घ्या. पुदीना आणि तुळस घालून चहा प्यायल्‍यानेदेखील फायदा होतो. त्यात काळीमिरी, लवंग घालु शकता. सर्दीमुळे नाक बंद झालं असेल तर गरम पाणी करून वाफ घ्या. यामुळे लवकर आराम पडतो. गरम पाण्यात आयोडिनचे काही थेंब किंवा व्हिक्सची कॅप्सुलही टाकता येते. वाफ घेतांना स्वच्छ कपड्याचा वापर करा. नारळाचं तेल बोटाला लावून नाकाच्या आतील भागात लावल्‍यानेदेखील आराम मिळतो. टोमॅटो सूप घेतल्यास तुम्हाला लवकर आराम पडेल. गरम टोमॅटो सूप नाकाला आराम देवू शकतं. 
हे झाले सर्दीवरचे काही साधे सोपे उपाय जे आपल्‍या घरात नेहमी वापरले जातात. मात्र सर्दी चिरकाल राहत असेल व ब-याच दिवसांपासुन बरी होत नसेल डॉक्‍टरी सल्‍ला मात्र अवश्‍य घ्‍यायला हवा. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर