प्रसारमाध्यमातील वृत्तपत्रलेखनाचे महत्व


समाजात घडणाऱ्या अनेक अनुचित, अन्यायकारक व नियमबाह्य गोष्टींबाबत प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात प्रचंड चीड असते. ती व्यक्त करण्याचे कोणतेही साधन वा व्यासपीठ समान्यजनांकडे उपलब्ध नसते ही वस्तुस्थिती आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकाने उचललेली लेखणी व त्यातून मांडलेले विचार नागरिकांच्या नजरेतून प्रशासनाला भेदणारे ठरू शकतात याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. वृत्तपत्रातून सातत्याने विविध विषयांवर निस्वार्थीपणे लेखन करणारे वृत्तपत्रलेखक ही भूमिका चोख बजावत असतात. आज पत्रकारितेमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन अधिक प्रमाणात वास करत असल्याचे पाहायला मिळते, नेतेमंडळी व व्यावसायिकांकडून रक्कमा उकळून बातम्या लावणाऱ्या दलालांचा शिडकाव ह्या क्षेत्रातदेखील पाहायला मिळतो. मात्र अत्यंत प्रामाणिकपणे व सामाजिक जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडणारे पत्रकारदेखील कार्यरत आहेत ज्यांच्यामुळे लोकांचा व राजकारण्यांचा थोडाफार विश्वास व त्यांना भीतीयुक्त दरारा पत्रकारितेबाबत आजदेखील टिकून आहे. मात्र प्रत्येक वृत्तपत्राचा अविभाज्य भाग असणाऱ्या वृत्तपत्रलेखकाला मात्र उपेक्षित ठेवून चालणार नाही. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींचे जनसामान्यांना पटणारे मत तो वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडत असतो. वृत्तपत्रलेखनाच्या माध्यमातून पत्रकारितेचं दुसरं रूप लोकांसमोर ठेवण्याचे काम तो इमाने इतबारे करत आहे. वृत्तपत्रलेखक हा समाजमनाचा खरा आरसा आहे. वर्तमानपत्रांत छापून येणाऱ्या घटनांवर सडेतोड व लोकांना पटणारे  मत तो व्यक्त करत असतो. आज अनेक वृत्तपत्रांचे संपादक वृत्तपत्राचे व संपादकीय रकान्याचे काम सुरू करण्यापूर्वी वाचकांची पत्रे  वाचत असतात. जनसामान्यांचे मत या पत्रांमधून प्रातिनिधिक स्वरूपात प्रकट होत असल्यामुळे त्याची वेगळी जागा आज सर्वच वृत्तपत्रांमध्ये आपले अढळ स्थान टिकवून आहे. पण आजवर त्याला पत्रकार, साहित्य वा सेवा क्षेत्रातील कोणत्याही सोयी सुविधा, सन्मान देण्यासाठी कुणाकडूनही जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसत नाहीत हि शोकांतिका आहे. आज अनेक वृत्तपत्रलेखक नियमित लिखाण करत असताना वयाची सत्तरी ओलांडले आहेत. निदान त्यांच्या इतक्या वर्षांच्या वृत्तपत्रलेखन सेवेची तरी कदर झालीच पाहिजे. जात-पक्ष-धर्मनिरपेक्षपणे आपली परखड मते कोणत्याही बंधनाशिवाय मांडताना वृत्तपत्रलेखक आपल्या मताशी स्वतः सहमत असतोच त्यामुळे त्यांच्या रकाण्याचे एक वेगळे अस्तित्व, महत्व व वैशिष्ट्य प्रत्येक वृत्तपत्रात टिकून आहे. 



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त