आरोग्यमंथन पाठदुखी
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
पाठदुखी
सध्या आपली जीवनशैली फारच व्यस्त होत चाललेली आहे. करिअर व प्रापंचिक कर्तव्ये पार पाडण्याच्या धावपळीत प्रत्येकाला आपल्या शारीरीक व्याधींविषयी विचार करण्यास वेळच राहिलेला नाही. यामुळे निरनिराळी शारीरीक दुखणी डोके वर काढू लागली आहेत. त्यातलेच एक सर्वश्रुत दुखणे म्हणजे पाठदुखी. पाठदुखीचा त्रास झाला नाही अशी व्यक्ती सापडणे फार कठीण आहे. अनियमित व धवपळीच्या आयुष्यामुळे आजकाल फार कमी वयातच ही पाठदुखी सुरु होते. अपघात, व्यायामाचा अभाव, ताठ न बसण्याची सवय, बैठया स्वरुपाचे कामकाज, मऊ गादीवर झोपण्याची सवय, जढ वस्तू उचलणे, उंच टाचेच्या चपला घालणे यासारख्या कारणांमुळे आजकाल पाठदुखीसाठी वयाचे बंधन राहिलेले नाही. आरामदायी जिवनामूळे शारीरीक हालचाल कमी झाल्याने कोणत्याही वयात पाठदुखीचा त्रास जाणवू लागलेला आहे. तरीही आपण सर्वच पाठदुखीविषयी फारच बेफिकीर राहतो. पाठदुखीची तीव्रता सौम्य असेल, तर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र नंतर तिचा त्रास जास्त होतो. कधी एखादी वस्तू उचलताना पाठ सणकन भरुन येते, कमरेत लचक भरते, तर कधी सकाळी झोपेतून उठतानाच पाठीने बंड पुकारल्याचे लक्षात येते. पाठीला आधार देणारे स्नायू, हाडे, सांधे यांना त्रास झाला की पाठीचा खालचा भाग दुखायला लागतो. हे दुखणे म्हणजे शरीराने दिलेली धोक्याची सूचना असते. ती वेळीच ओळखली तर पुढचा त्रास वाचतो. मात्र अनेकदा या सूचनेलाच दुखणे समजून दुर्लक्ष केले जाते. वाढलेले वजन, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होण्यासारखे जडलेले आजार, शारीरिक काम यामुळेदेखील पाठदुखी वाढते. पाठदुखी होण्यामागे काही वेळा गंभीर कारणेही असतात. मणक्याला फ्रॅक्चर झाल्यास, स्लिप डिस्क, संधिवात, सांधेदुखी, मणक्यांमध्ये गाठ आल्यास, मूतखडे यामुळेही पाठदुखी होऊ शकते. अशा गंभीर कारणांवेळी थेट डॉक्टरकडे जायला हवे. मात्र रोजच्या चुकीच्या सवयींमुळे पाठीचा खालचा भाग दुखत असेल तर घरच्या घरी उपाय करता येतात. मात्र वेळीच उपचार केले नाहीत आणि हे दुखणे मांडय़ा, पाय, पावले इथपर्यंत पोहोचले की वैद्यकीय उपचारांची गरज पडते. मात्र एमआरआय, एक्स रे, सीटी स्कॅन, फीजीओ थेरपी अशा महागडया उपचारापर्यंत पोहोचायचे नसेल तर वेळीच उपचार घेणे केव्हाही चांगले असते. खूर्चीत बसताना आपल्या शरीराचे वजन पाठीवर येते. कंबरेत वाकून बसण्याची सवय असल्यास किंवा खुर्ची योग्य नसल्यास पाठदुखी नक्की होते. तसेच मोटारसायकल चालवताना पाठीला कोणताही आधार नसतो. रोज लांबचा प्रवास करणाऱ्या तसेच खड्डे असलेल्या रस्त्यांवरून गाडी हाकणाऱ्यांना हमखास पाठदुखी सतावते. वाकून उभे राहण्याची सवय पाठदुखीला निमंत्रण देते. अयोग्यपणे जड वस्तू उचलल्याने, ढोपरात न वाकता वस्तू उचलल्यामुळे, पाठीवर भार आल्याने, अयोग्य गादीवर आखडलेल्या स्थितीत झोपल्याने किंवा फार मऊ बिच्छान्यावर झोपल्याने पाठदुखी सतावते. एखदया अपघातातदेखील मणक्याला इजा झाल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होते. सांध्याना संरक्षण देणारे कार्टलेजिचे आवरण वयोमानानुसार झिजते. त्यामुळे उतारवयात मणका दुखायला लागतो. शरीरासोबतच मनावरील ताण-तणाव अनेक आजारांना निमंत्रण देतात. निराशा, अस्वस्थता, असमाधान यामुळेही पाठदुखी होऊ शकते. अनेक तास खुर्चीत बसून किंवा मोटारसायकल चालवून पाठीत दुखत असल्याची त्यांची तक्रार असते, पण बऱ्याचदा या तक्रारीचे कारण हे ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे असते. स्नायू कमकुवत झाल्याने जरा अधिक ताण पडला तरी पाठदुखी होते. एक्स-रे तसेच जीवनसत्त्व ‘ड’ची चाचणी केल्यावर नेमके कारण समजू शकते. त्यानंतर प्रत्येकाच्या स्नायूच्या विशिष्ट गरजांप्रमाणे फिजीओथेरपिस्ट त्यांना व्यायाम सांगतात. यावर उपाय म्हणजे वस्तू उचलताना गुडघ्यात वाका, पाठ सरळ ठेवा व वस्तू शरीराजवळून उचला. एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. नियमित वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरळ करा किंवा फिरून या. गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल याप्रकारे सीट ठेवा, झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा, आखडलेल्या स्थितीत झोपू नका, कुशीवर झोपताना कंबरेला आधार मिळेल, अशा पद्धतीने पातळ उशीचा उपयोग करा, पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपला टाळायला हव्यात. अशी काहीवेळा गंभीर स्थिती असते जेव्हा पाठदुखी मानसिक ताणामुळे नसते, पूर्णपणे शारिरीक असते आणि भयंकर वेदना देणारी असते; तेव्हा मात्र ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे जरुरी असते. आजारपणात म्हणजे कर्करोग, ताप, संसर्ग, वजन उतरणे, अशक्तपणा ह्या सर्व समस्यांमुळे होणा-या पाठदुखी बद्दल आपण आपल्या डॉक्टरांना सांगणे अत्यंत गरजेचे असते. खालच्या बाजूची पाठदुखी (Lower Back Pain) सुरू असेल आणि त्यावर आपण काहीच उपचार घेतले नाहीत तर त्याचे रुपांतर भयानक होऊ शकते. त्यामुळे पुढचे दुखणे टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य उपचार सुरू करणे अत्यंतिक गरजेचे असते. पाठदुखीची लक्षणे जर दुखणे विकोपाला नेणारी असतील तर तत्काळ उपचार सुरू करावा. बरेच जण पाठ दुखत असेल तर झोपून रहातात, पण तसे करणे उचित नाही. शारीरीक हालचाल ही फार गरजेची असते. मानसिक ताणामुळे आलेल्या पाठदुखीची काळजी आणि दुखापतीमुळे झालेल्या पाठदुखीची काळजी ही वेगळी असते. त्यावरील उपचारांची प्रक्रियादेखील भिन्न असते. त्यामुळे वैदयकीय सल्ल्यानेच पाठदुखीवर उपचार घेणे हितावह आहे. पाठीच्या कण्याचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्यावर उत्तम इलाज म्हणजे नियमित व्यायाम. चालणे अथवा विविध व्यायामाचे प्रकार किंवा योगाचे प्रकार पाठदुखीपासुन आपल्याला दुर ठेवु शकतात. पाठदुखी ही कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच असते. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये अन्यथा ती गंभीर स्वरुप धारण करु शकते. आपण सर्वांनीदेखील याविषयी जागरुक राहावे यासाठीच आजचे हे आरोग्यमंथन.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment