एक धाव स्वच्छतेसाठी - नवी मुंबई महापौर मॅरेथॉन

नवी मुंबई महापौर मॅरेथॉन

नवी मुंबई महापौर मॅरेथॉन आज रविवार ६ जानेवारी रोजी पहाटेच्या गार व स्वच्छ वातावरणात प्रचंड उत्साहात पार पडली. नवी मुंबईचा रत्नहार समजल्या जाणाऱ्या पाम बीच रोडवर आयोजित करण्यात आलेल्या ह्या मॅरेथॉनमध्ये हजारो नवी मुंबईकर व विद्यार्थी स्वच्छतेचा संदेश देत धावले. नवी मुंबई महानगरपालिका व एनसीआरडी स्टार्लिंग इन्स्टिट्यूट तसेच स्मार्ट कन्सेप्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही मॅरेथॉन भरवण्यात आली. एक पाऊल स्वच्छतेकडे ही संकल्पना घेऊन नवी मुंबई नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये धाव घेतली. महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई सातत्याने अग्रस्थानी राहत आहे. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या वर्षी देशातील सातव्या क्रमांकाचे शहर राहिलेल्या नवी मुंबईने यंदा थेट देशातील तिसऱ्या क्रमांकावरील स्वच्छ शहर म्हणून झेप घेतली आहे. हाच संदेश घेऊन यंदाची महापौर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. यात २१, १०, ५, ३, २ किलोमीटरसाठी आयोजित स्पर्धेत विविध स्तरांतील व वयोगटातील हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला ज्यात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. वयोवृद्ध, महिला तसेच तरुणांनीदेखील या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळी साडेपाच वाजताच नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर हजेरी लावली होती. जयश्री शिंदे ह्या अपंग महिलेने १० किलोमीटरची मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करत शारीरिक व्यंगावर मात करत कोणतेही उद्दिष्ट गाठता येणे शक्य असल्याचा अनोखा संदेश दिला. सहाच्या सुमारास पालिका मुख्यालयापासून वाशीकडे पाम बीच रोड ह्या स्वच्छ वातावरणातील, निसर्गरम्य, सुंदर व एकही खचखळगा नसलेल्या रस्त्यावर विविध टप्प्यांत ही स्पर्धा आयोजित केली गेली. मीदेखील ५ किलोमीटरची मॅरेथॉन ३० मिनिटांत पार करत मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर श्री जयवंत सुतार, आयुक्त श्री आप्पासाहेब मिसाळ व काही पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. त्यांनीदेखील मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आपला फिटनेस आजमावला. यावेळी पालिका आयुक्तांना भेटण्याचा योग आला. महेंद्र कोंडे यांनी नेहमीप्रमाणे खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी २ ते ८ जानेवारी दरम्यान राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र पोलीस रेजिंग विक निमित्ताने पोलीस विभागाच्या वतीने बँड पथकावर देशभक्तीपर गीते सादर करण्यात येत होती. स्वच्छतेत देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेले नवी मुंबई शहर येत्या काळात पहिल्या स्थानावर आणण्याचा संकल्प सोडत मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला.

वैभव मोहन पाटील

















Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त