नवी मुंबई पालिकेची एसी बस सेवा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाद्वारे मोठा गाजावाजा करत काही मार्गांवर एसी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. लोकांना चांगली, किफायतशीर व आरामदायक सेवा उपलब्ध करून देणे हे त्यामागील उद्दिष्ट आहे. मात्र मागच्या रविवारी एक वेगळाच अनुभव मला ह्या सार्वजनिक परिवहन सेवेचा आला. रविवार सुट्टीचे निमित्त साधत मी कुटुंबासह दादर येथील सिद्धीविनायकाच्या दर्शनास गेलो होतो. येताना एनएमएमटीची 121 क्रमांकाची एसी बस पकडली. मंदिर बस स्टॉप पासून घणसोलीपर्यंत तिकीट प्रतिप्रवाशी 90 रुपये. सोबत पाच वर्षांची मुलगी असल्याचे वाहकास सांगीतल्यानंतरदेखील त्यांनी अर्धे तिकीट न देता तीन व्यक्तींचे 270 रुपयांचे तिकीट दिले. याबाबत विचारणा केल्यानंतर या बसमध्ये लहान मुलांना अर्ध्या तिकिटाची व्यवस्था नसल्याचे वाहकाने सांगितले. अगोदरच या बसचे तिकीट खूपच जास्त असल्यामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. वृद्ध, महिला, गरोदर स्त्रिया, अपंग यांना बसण्याची अपुरी व्यवस्था व तिकीटाचे दर ऐकूनच अनेक प्रवाशी बसमधून उतरत असल्याचे दिसून येत होते. त्यातच लहान मुलांनादेखील तिकिटातून सूट मिळत नसेल तर ही सेवा नेमकी कुणासाठी आहे असा प्रश्न मनात येतो. दिल्ली सरकार एकीकडे महिलांना बस प्रवास मोफत करत असताना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तरी त्याचा आदर्श घेऊन वाहतूक दरात सुधारणा करायला हवी. एखाद्या सर्वजनिक उपक्रमाच्या बसमध्ये लहान मुलांसाठी पूर्ण तिकीट आकारणे म्हणजे त्यांना विमानप्रवासच घडवण्यासारखे आहे. बरं, पूर्ण तिकीट घेतल्यानंतरदेखील त्यांना बसमध्ये मांडीवर घेऊन बसावे लागते. याबाबत तक्रारी करण्यासाठी फार नागरिक पुढे येत नसले तरी याचा थोडा विचार पालिकेच्या परिवहन सेवेने करावा, बाकी नागरिक सुज्ञ आहेत !
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment