करोना व्हायरस
सध्या जगभरामध्ये वैदयकीय क्षेत्रात एका विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूचे आहे कोरोना. या विषाणूने चीनमध्ये अनेकांना बाधित केले आहे. चीनमध्ये पसरलेल्या या कोरोना विषाणूने आातपर्यंत १७ जणांचा बळी घेतला आहे. 31 डिसेंबर २०१९ रोजी चीनमधील वुहान शहरात नवीन करोना विषाणूचा उद्रेक घोषित करण्यात आला. त्यानंतर चीनच्या इतर शहरातदेखील या आजाराचे रुग्ण आढळले असून जपान, थायलंड, दक्षिण कोरिया, अमेरिका अशा इतर ११ देशांनीही या आजाराचे रुग्ण नोंदविले आहेत. हा विषाणू वेगाने पसरत आहे. चीनमधील ५७१ लोकांना याची लागण झाल्याची आकडेवारी आहे तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील वुहानसह काही शहरे बंद करण्यात आली असुन त्यांच्या इतर भागाशी संपर्कावर निर्बंध आणण्यात आले आहे. सिनेमागृहे बंद ठेवण्यात आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेची स्थानिक टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थानिक प्रतिनिधी गौडेन गालिया यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय पथकाने चीनच्या रोग नियंत्रण केंद्राची स्थानिक जैव सुरक्षा प्रयोगशाळा, रुग्णालये आणि विमानतळांचा दौरा केला. अत्यंत धोकादायक समजल्या जाणा-या हया करोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव भारतात होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातदेखील विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. करोना बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबईसह देशातील सात विमानतळांवर सुरू करण्यात आले आहे. या स्क्रिनिंगमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलीनीकरण कक्षामध्ये भरती करण्याची सुविधा कस्तुरबा रुग्णालय मुंबई तसेच नायडू रुग्णालय पुणे येथे करण्यात आली आहे. २९ जानेवारी २०२० पर्यंत मुंबई विमानतळावर ४५९६ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. या मध्ये १८ प्रवासी हे महाराष्ट्रातील आहेत. यातील मुंबईतील ५ प्रवाशांना सौम्य सर्दी व ताप असल्याने खबरदारी म्हणून कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यापैकी ३ प्रवाशांचे प्रयोगशालेय नमुने निगेटिव्ह आल्याचे एन आय व्ही पुणे यांनी कळविले आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात २ प्रवाशांना तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे एका प्रवाशास भरती करण्यात आले आहे. या सर्व संशयित रुग्णांचे नमुने एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. जे प्रवासी करोना बाधित देशातून भारतामध्ये येत आहेत त्यांची माहिती दैनंदिन स्वरूपामध्ये विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत राज्य आरोग्य विभागास कळविली जाते. या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील २८ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात आले आहे. या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले आहे. नवीन करोना विषाणु आजाराच्या रुग्ण निदानाची व्यवस्था राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एन आय व्ही), पुणे येथे करण्यात आली आहे. संशयित रुग्ण कोणास म्हणावे, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सुस्पष्ट सूचना दिलेल्या असून त्याचे पालन करण्यात येत आहे. कोणत्याही संशयित रुग्णाचे प्रयोगशाळा नमुना एन आय व्ही पुणे यांना पाठविताना तो एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम महाराष्ट्र यांच्या अनुमतीने पाठविणे आवश्यक आहे. संशयित करोना आजारी रुग्णांना भरती करण्यासाठी सध्या मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यात नायडू रुग्णालय येथे आवश्यक विलगीकरण व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या शिवाय प्रत्येक जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरु करण्यास सांगण्यात आले आहे. करोना आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये आंतर विभागीय समन्वयाची आत्यंतिक आवश्यकता आहे. नागरी विमान वाहतूक विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य या सर्व विभागांचा नियमित समन्वय साधून या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. नवीन करोना विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

Comments
Post a Comment