आरोग्यमंथन - शुध्द पाणी ही मुलभूत गरज
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
शुध्द पाणी ही मुलभूत गरज
मनुष्य आणि प्राणी जातीमध्ये पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. पाणी म्हणजेच जीवन. म्हणूनच मानवी जीवनात स्वच्छ व शुद्ध पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. विविध आजारांची उत्पत्ती ही दुषीत पाण्यामुळेच होते. दुषीत पाणी प्यायल्यामुळे शरीरातील क्रिया बिघडतात व परिणामी आजारपण गाठते. त्यामुळेच जलजन्य आजार व त्याला प्रतिबंध करण्यासाठी शुध्द पाणी व पाणी गुणवत्तेबाबत माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता म्हणजे पाण्यातील भौतिक, जैविक व रासायनिक घटकांची तपासणी करून त्याची योग्यता पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगधंद्यासाठी ठरविणे होय. पाणी गुणवत्ता, स्वच्छता आणि आरोग्य यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. स्वच्छता असेल तेथे आरोग्य नांदेल, आरोग्य नांदेल तेथे भरभराट होईल, असे म्हटले जाते. आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराबरोबर स्वच्छ मोकळी हवा, आसपासचा स्वच्छ परिसर आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी यांची आवश्यकता असते. त्यातील शुध्द पाणी हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सर्व समाज आरोग्य संपन्न हवा, त्यासाठी भरपूर व बारमाही शुद्ध पाण्याचा साठा आपल्याकडे उपलब्ध असायला हवा. आपण वापरत असलेले पाणी स्वच्छ दिसत असले तरी शुध्द असतेच असे नाही. कारण पाण्याची गढुळता मोजणारे मापक सर्वत्र उपलब्ध असतेच नाही. त्यामुळे पाण्यात मिसळलेले आरोग्याला अपायकारक घटक सामान्य दृष्टीव्दारे सहजासहजी दिसून येत नाहीत. असे पाणी सेवन केल्याने आजारासाठी पोषक जंतु शरीरात जाण्याची शक्यता आहे. स्वच्छ व निर्मळ दिसणाऱ्या पाण्यामध्ये मानवास हानिकारक ठरू शकणारे कोट्यावधी रोगजंतू असू शकतात. पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरावयाचे पाणी नियमितपणे निर्जुंतूक करणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी पाणी शुध्दीकरण करणारी नानाविध यंत्रे व उपाय उपलब्ध असुन ते अंमलात आणता येतील. ग्रामीण भागात पाणी दुषीत होण्याची अनेक कारणे असतात. नदी पात्र, धरणे व इतर जलाशयातील पाणी पात्रात किंवा काठावर शौचास बसल्याने, आंघोळ केल्याने, पोहल्याने, कपडे धुतल्याने, गुरे - जनावरे धुतल्याने, वाहन - गाडी धुतल्याने, कारखान्यातील टाकाऊ, रासानिक द्रव्ये नदीत सोडल्याने, गावातील सांडपाणी, मलमूत्र व गटारातील पाणी नदीत सोडल्याने, मानव - पशु - पक्षी यांचे मृतदेह पाण्यात सोडल्याने, धार्मिक विधीस मूर्ती विसर्जन, पूजेचे साहित्य, फुले (निर्माल्य) नदीत टाकल्याने, नदीच्या किंवा कॅनालच्या काठावर वस्ती किंवा जनावरांचे गोठे असल्यास अशुद्ध होते. ही सर्व मानवनिर्मित कारणे टाळता आली पाण्याची शुध्दता टिकुन राहील. माणसाच्या शारीरीक वजनाच्या ५५ ते ६५ टक्के वजन हे पाण्याचे असते. पाण्याविना शरीर फार गुंतागुंतीचे होते. २० ते २५ टक्के पाणी जर शरीरातले कमी झाले तर जिवन जगणे जवळ जवळ अशक्य होते. अन्नपदार्थ ग्रहण करणे व बाहेर टाकणे ह्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. सर्वसाधारणपणे १ मिली पाणी अन्नाच्या उष्मांकाला आवश्यक असते. म्हणजे दररोज ६ ते ८ ग्लास पाणी प्रत्येक दिवसाला पाणी आवश्यक असते. पाण्यात विरघळणार्या जीवनसत्वांचा शरीरात साठा होउ शकत नाही जास्त प्रमाणात असणारी शरीरातील अशा प्रकारची जीवनसत्वे मुत्राद्वारे शरीराबाहेर निघून जातात. यामुळे अशा जीवनसत्वांचा रोजच्या रोज पुरवठा तोटे टाळण्यासाठी आवश्यक असतो. योग्य प्रकारच्या आहाराच्या सेवनामुळे अशी जीवनसत्वे शरीराला मिळू शकतात, औषधाद्वारे अशा प्रकारची जीवनसत्वे घेणे योग्य नाही कारण त्यामुळे अधीक काहीच फायदा होत नाही. नागरीकांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. शासनाचे विविध विभाग हे यासाठी प्रयत्नशिल आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्राम विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागांचा हातभार पाण्याच्या गुणवत्ता संतुलनासाठी महत्वाची कामगिरी पार पाडत आहे. राज्यातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी असून त्याकरिता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येणारी कार्यवाही ही अधिक परिणामकारक व नियोजनबध्द व्हावी व जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा याकरिता शासन प्रयत्नशिल आहे. पाणी गुणवत्ता व साथरोग नियंत्रणासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका यांना शासनाने पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या ब्लिचिंग पावडरची, सोडियम हायपोक्लोराईड, क्लोरिन व इतर द्रावणांचा वापर स्थानिक गरजा लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर करण्यात येत आहे. प्रतिवर्षी पावसाळ्यापूर्वी जनतेस शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी व साथरोगास प्रतिबंध करण्यासाठी शासनस्तरावरून आवश्यक त्या सूचना जिल्हास्तरीय यंत्रणांना देण्यात येतात. पाण्याची व ब्लिचिंग पावडर यांची वारंवार तपासणी करून गुणवत्ता संनियंत्रण केले जाते. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करून दूषित पाण्याची टक्केवारी कमी करण्याबाबत व राज्यातील जनतेस जलजन्य साथरोगापासून परावृत्त करण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. उपरोक्त उपाययोजना व्यतिरिक्त लोकांमध्ये पाण्याच्या वापराबाबत जनजागृती गरजेची असुन त्या दृष्टीने सातत्याने उपक्रम हाती घेण्यात येतात. एकंदरीत शुध्द पाणी उपलब्ध होणे हा नागरीकांचा अधिकार असुन ती सर्वांची मुलभूत जबाबदारीदेखील आहे. दुषित पाण्याने जलजन्य आजारांची लागण आपल्याला होऊ नये म्हणून दैनंदिन जिवनात शुध्द पाण्याचाच वापर केला पाहिजे.
जल है तो जिवन है
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
जल है तो जिवन है
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment