गार नको गर्दी आवरा
३१ जानेवारीपासुन ट्रान्स हार्बर मार्गावर मोठा गाजावाजा करत एसी लोकल सुरु करण्यात आली. गेली अनेक वर्षे प्रतिक्षा असलेली एसी लोकल अखेर ठाणे - पनवेल मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशाांच्या सेवेत रुजू झाली. मात्र ही लोकल सुरु होऊन दोनच दिवसांनी प्रवाशांना कधी नव्हे इतका त्रास सहन करावा लागत आहे. ट्रान्स हार्बरवरील १६ फे-या रदद करुन त्याऐवजी एसी लोकल चालवण्यात येत आहेत. आधीच या मार्गावर दोन गाडयांमध्ये १० ते १५ मिनिटांचे अंतर असलेल्या दोन गाडयांंमधील एक लोकल एसी चालवण्यात येते. संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या लोकलमध्ये सामान्य प्रवाशांंसाठी व पास धारकांसाठी एकही डबा राखीव नाही. त्यामुळे एकतर एसीचे महागडे तिकीट काढा किंवा लोकल सोडुन दया हे दोनच पर्याय प्रवाशांसमोर आहेत. बहुतांंश स्थानकांवर हया एसी लोकलचे डबेच उघडत नाहीत त्यामुळे एसीचे तिकीट काढुनही प्रवाशांना गाडीत चढता येत नाहीत असे प्रकारदेखील घडलेत. गर्दीच्या वेळेत या लोकल चालवण्यात येत असल्याने एकीकडे हया एसी लोकल रिकाम्या धावताना दिसत आहेत तर दुसरीकडे इतर लोकल नेहमीपेक्षा दुप्पट क्षमतेने प्रवाशांनी खचाखच भरुन धावत आहेत. परवा मी घणसोली रेल्वे स्थानकावर सकाळी नेहमीची लोकल पकडण्यासाठी पोहोचलो तर ती १० मिनिटे उशीराने आली. आलेली लोकल नेमकी एसी लोकल होती व ती ही दोन चार प्रवाशांंचा अपवाद वगळता पूर्णतः रिकामी होती. त्यानंतर तब्बल १५ मिनिटांनी दुसरी लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशीरा आली. त्यावेळी त्या लोकलमध्ये चढायलाही जागा नव्हती इतकी गच्च भरलेली होती. ठाणे स्थानकात ९ क्रमांकाच्या फलाटावर गाडी पोहोचल्यावर फलाट क्रमांक १० वर रिकामी एसी लोकल तर फलाट क्रमांक ९ प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेला, अगदी जिन्यांवरही प्रवाशी दाटीवाटीने उभे होते अशी भयानक परिस्थीती होती. गाडी आल्याआल्या फुल्ल झाली आणि आणखी तेव्हढीच गर्दी पुन्हा फलाटावर उभी होती जी क्षणाक्षणाला वाढत होती. अगोदरच लोकलच्या कमी फे-या व त्यात एसी लोकल दाखल झाल्यामुळे प्रवाशांना अगदी जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. एसी लोकलचा फायदा या मार्गावरील सर्वसामान्य प्रवाशांना अजिबात होत नाही ही वस्तुस्थिती एव्हाना लपुन राहिलेली नाही. त्यामुळे एसी लोकलचा हा प्रयोग पुर्णतः फसवा निघाला अशीच भावना प्रवाशांंची आहे. गारेगार प्रवास नको पण गर्दी आवरा अशीच परिस्थीती सध्या ट्रान्स हार्बर मार्गाची झाली आहे. यावर रेल्वे प्रशासनाने तातडीने काही उपाय करायला हवेत अन्यथा प्रवाशांच्या ह्या वाढत्या गर्दीचे असंतोषमध्ये रूपांतर होईल. प्रथमतः या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवायला हवी. एसी लोकलमधील निम्मे डबे सामान्य प्रवाशांसाठी खुले करायला हवेत. तसेच एसी डब्यांचे तिकीट दरदेखील कमी करायला हवेत जेणेकरून त्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशीदेखील घेऊ शकतील. ट्रान्सहार्बर वर डोकेदुखी ठरत असलेला एसी लोकलचा दुःखकर प्रवास आता नकोसा झालाय एव्हढे नक्की.


Comments
Post a Comment