आरोग्यमंथन - प्रवासातील प्रसूती
सरकारी कर्मचा-यांच्या संवेदनशिलतेची आणखी एक घटना नुकतीच समोर आली आहे. कर्मचारी आहेत यवतमाळ जिल्हयातील एसटी महामंडळाचे. अकोट ते यवतमाळ या बस वर चालक श्री. व्ही. ए. इंगळे आणि वाहक श्री ए. के. जाधव कर्तव्यावर असताना राजापेठ अमरावती वरुन यवतमाळ येथे जाण्याकरीता बस निघाली. त्या वेळी गरोदर महिला यवतमाळला जाण्याकरिता सदरील अकोट यवतमाळ बसमध्ये बसली. त्यानंतर धानोरा थांब्याच्या समोरुन बस निघाल्यावर सदर महिलेला प्रसव कळा येऊ लागल्या. अचानक सुरु या परिस्थीतीने काय करावे हे सहप्रवाशांना सुचेना. मात्र परिस्थीतीचे गांभीर्य पाहुन कामगिरीवरील चालक वाहकांनी बस रस्त्याच्या बाजुला उभी केली. बसमधील इतर महिला प्रवाशांच्या मदतीने बसमध्येच महिलेची प्रसुती करण्यात आली आणि कन्यारत्न जन्माला आले. प्रसुती झाल्याबरोबर तात्काळ कर्तव्यावरील चालक वाहकांनी प्रसुती झालेल्या महिलेसह व नवजात बाळासह थेट बस नांदगाव खांडेश्वर येथिल शासकीय रुग्णालयाकडे नेली. आई व बाळाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. आई व नवजात बाळ दोन्हीही सुखरुप असुन दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. अशा प्रकारे अकोट आगारातील चालक श्री. व्ही. ए. इंगळे व वाहक श्री. ए. के. जाधव यांनी दाखविलेली समयसुचकता व कर्तव्यनिष्ठतेने माणुसकी व संवेदनशिलतेचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर आणले आहे. या घटनेने एसटी महामंडळाची प्रतिमा देखील जनमानसात नक्कीच उंचविली आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना समाजात घडत असतात. सरकारी सेवा व सरकारी कर्मचारी यांचेबददलचा जनतेत निर्माण झालेला दुषित ग्रह अशा घटनांनी बदलण्यास कारणीभुत ठरणारा आहे. आरोग्य ही आज सर्वांच्या दृष्टीने महत्वाची गरज आहे. आरोग्याच्या तक्रारी कधीही, कुठेही उदभवू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची व सार्वजनिक व्यवस्थेत काम करणा-या कर्मचा-यांची संवेदनशिलता अशा वेळी फार कामी येते. नोकरदार महिला आज गरोदरपणात देखील कामानिमित्त सर्रास प्रवास करत असतात. बस, लोकल प्रवासात गरोदर महिला आपल्याला नेहमी दृष्टीपथास पडतात. प्रत्येकीची गरोदरपणातील स्थिती व प्रसुतीचा कालावधी भिन्न असतो ज्याची कल्पना सहप्रवाशांना नसल्याने आपात्कालीन परिस्थतीत गोंधळ उडतो. अशा वेळी सार्वजनिक सेवेत काम करणा-या व्यक्तींचे महत्वपूर्ण ठरते. प्रवासामध्ये प्रसुती होण्याच्या अनेक घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. मागिल महिन्यात मुंबईमध्ये लोकल मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने प्रवासादरम्यान बाळाला जन्म दिला. ही महिला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ठाणे (Thane) येथे जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी तिच्या पोटात अचानक दुखू लागले. परंतु प्रवासादरम्यानच तिची प्रसुती झाली आहे. रेल्वे ठाणेच्या दिशेने जाण्यासाठी निघाली असता गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या होत्या. तेव्हाच महिलेने चालत्या रेल्वेत मुलाला जन्म दिला. त्यानंतर महिलेला आपत्कालीन उपचारासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी महिला आणि मुलाची प्राथमिक स्वरुपात काळजी घेतली. त्यानंतर महिला आणि बाळा एका शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा प्रवासादरम्यान ठाणे स्थानकातच महिलेला प्रसुतीकळा सुरु झाल्याने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली होती. इशरत शेख असे महिलेचे नाव असून ती आंबिवली ते कुर्ला दरम्यान प्रवास करत होती. त्याचवेळी संध्याकाळच्या सुमारास मुलाला महिलेने जन्म दिला होता.

Comments
Post a Comment