आज शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती
महाराजांचे कार्य व शिकवण जगाला अनुकरणीय
शिवछत्रपती जयंती. मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी ज्या दिवशी एका तेजस्वी सूर्याने जन्म घेतला तो दिवस. ज्या काळात मुघल सम्राज्यविरुद्ध मुखातून ब्र काढण्याची सोय नव्हती त्या काळात मराठी मुलखाची शान असणारा भगवा हातात घेऊन मुघलांच्या ताब्यातील गड, किल्ले व मुलुख परत मिळविण्यासाठी जीवाचे रान करणारा स्वाभिमानी राजा म्हणजे शिवछत्रपती. मर्दमराठी मावळ्यांना मातृभूमी व स्वतःच्या ताबेदारीबाबत जाणीव करून देऊन त्यांना सोबत घेऊन मुघलांना सळो कि पळो करून सोडणारा आमचा शिवाजी. ज्याचे नाव मराठी माणसाच्या हृदयात व मनात कायमचे कोरले गेले आहे व ज्याच्या वंदनाशिवाय आज कोणत्याही क्रांतिकारी कामाची सुरुवात करता येत नाही तो तमाम मराठ्यांचा व हिंदूंचा आदर्श म्हणजे शिवछत्रपती. मराठी माणसाला स्वाभिमानाने व ताठ मानेने आपल्या न्याय व हक्कांसाठी जगायला शिकवणारे आमचे शिवाजी महाराज आज देशातच नव्हे तर जगात आदर्श व्यक्तिमत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्ा रत्नपारखी राजा होणे नाही. राजांनी मवाळ्यांमधून स्वराज्यासाठी रत्ने घडविली. महाराज इतिहासाचे महानायक होते तर मावळे इतिहासाचे आधारस्तंभ. मुघलांच्या पाशवी साम्राज्याला, सर्वच बाबतीत मग ते तिन्ही दलांचे सैन्य, शस्त्रसाठा या बाबतीत उजवे असणाऱ्याना मोजक्या मावळ्यांच्या जोरावर आपल्या गनिमी काव्याच्या आधारावर लढा देऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी झटणारे छत्रपती पुन्हा होणे नाही. शत्रूची प्रत्येक चाल अत्यंत दक्षपणे हेरून त्यांना आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देणारा आमचा राजा आज आम्हाला अनेक उदाहरणााांवरून वारंवार आठवला जातो. अफजलखानाचा वध असो कि शाहिस्तेखानानाची फजिती यासारख्या अनेक घटनांतून शिवाजी महाराजांचा परिचय आम्हाला व येणाऱ्या अनेक पिढ्यांना उद्बोधकच राहील. शिवाजी महाराजांनी त्यांच्या अचाट बुद्धिमतेच्या व युद्धकौशल्याच्या जोरावर गड, किल्ले, सुभेदार्या शत्रूच्या ताब्यातून परत मिळवून मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली व पारतंत्रयाविरुद्ध आवाज उठविण्याची ताकत सामाजात निर्माण केली. कर्तबगारी, स्वाभिमान, मातृभूमीप्रेम, विधायक दृष्टिकोन, अन्यायाविरुद्ध उठाव, परस्त्रीबद्दलचा आदर, मराठी अस्मितेचा पुरस्कार, कुशल नेतृत्व या बाबी आजच्या पिढीला छत्रपतींकडूनच अनुकरणीय आहेत. इतिहास लिहिणारे अनेक झाले पण इतिहास घडविणारे फक्त आमचे शिवछत्रपतीच. संपूर्ण जगाला स्फूर्ती देणारे व्यक्तिमत्व असलेल्या शिवाजी राजांचा जुलमी सत्तेला संपविण्याचा कित्ता अनेकांनी गिरवला. महाराजांच्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीतून धडे घऊन चीन, व्हिएतनाम सारखे असंख्य देश जुलमी दोरखंडातून मुक्त झाले.परन्तु दुर्दैवाने आजच्या काळात आपल्या देशातिलच अनेक लोकांना त्यांच्या पराक्रमाबद्दल व शोर्याबद्दल पुरेशी माहितीच नाही याबद्दल खेद वाटतो. शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्व जन्माला घालणाऱ्या जिजाउंसारख्या मातेला, शहाजींसारख्या पित्याला, त्यांना युद्धकौशल्याचे धडे देणाऱ्या दादोजी कोंडदेव व त्यांच्यामागे सर्वस्व अर्पण करून उभे ठाकणाऱ्या बाजीप्रभु, येसाजी, संभाजी कावजी, रामजी पांगेरा, भंडारी, जीवा महाला, रायबा यासारख्या अनेक मावळ्यांना देखील या निमित्ताने मानवंदना. शिवरयांसोबत मराठी साम्राज्याचा विस्तार अटकेपार करताना अनेक मावळे धारातीर्थी पडले. सह्याद्रीच्या गडकिल्यावरील बुरजांसारखी अभेद्य निष्ठा असलेल्या मावळ्यांनी महाराजांवरील श्रद्धा व स्वराज्य प्रेमापोटी जीवाची पर्वा केली नाही. त्यांचे बलिदान, पराक्रम व स्वराज्यासाठी त्याग आजही सर्वांसाठी स्फूर्तिदायक आहे.




Comments
Post a Comment